पोटात आग होणे –
पोटात आग होणे ही पचनासंबंधित एक सामान्य समस्या आहे. आपल्या पोटामध्ये अन्न पचनासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असते. पोटात या हायड्रोक्लोरिक acid चे प्रमाण वाढल्यास पोटात आग होऊ लागते. याशिवाय खालील कारणेही यासाठी जबाबदार असतात.
पोटात आग कशामुळे होते ..?
- मसालेदार, तिखट, तेलकट पदार्थ अधिक खाण्यामुळे पोटात आग होते.
- वारंवार चहा-कॉफी पिण्यामुळे,
- अपचन झाल्याने,
- दुधाचे पदार्थ, ग्लूटेनयुक्त पदार्थ पचत नसल्यास त्यामुळेही पोटात आग होऊ शकते,
- GERD समस्या असल्यास, यामध्ये पोटातील acid अन्ननलिकेत गेल्याने छातीत तसेच पोटातही आग होऊ लागते,
- इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) समस्येमुळे,
- पेप्टिक अल्सरचा त्रास असल्यास,
- धूम्रपान, मद्यपान यासारखी व्यसने,
- मानसिक ताणतणाव,
- अपुरी झोप,
- डोकेदुखी व अंगदुखीच्या ऍस्पिरिन, ibuprofen सारख्या वेदनाशामक गोळ्या वरचेवर घेत राहिल्यामुळे,
- पोटाचा कर्करोग,
- पोटात एच. पायलोरी या बॅक्टरियाचे इन्फेक्शन झाल्याने, पोटातील आम्लाचे प्रमाण वाढून पोटात आग होत असते.
पोटात आग होत असल्यास जाणवणारी लक्षणे –
यावेळी पोटामध्ये आग होणे हे मुख्य लक्षण यात असते. याशिवाय पोट दुखणे, मळमळ व उलट्या, आंबट ढेकर येणे, छातीत आग होणे अशी लक्षणे यामध्ये जाणवू शकतात.
नेमकी कशामुळे पोटात आग होत आहे हे तपासण्यासाठी आपले डॉक्टर अल्ट्रासाऊंड किंवा एंडोस्कोपीद्वारे पोटाची तपासणी करू शकतात.
पोटात आग होणे यावरील उपचार –
पोटातील वाढलेले Hcl ऍसिड कमी करण्यासाठी Antacid औषधे उपयोगी पडतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण योग्य ती Antacid औषधे घेऊ शकता. यामुळे पोटात होणारी आग कमी होण्यास मदत होते.
तसेच जर पोटात एच. पायलोरी या बॅक्टरियाचे इन्फेक्शन झाल्याने आग होत असल्यास आपले डॉक्टर अँटिबायोटिक्स औषधे देतील. आणि जर वेदनाशामक औषधामुळे पोटात आग होत असेल तर आपले डॉक्टर, दुसरे औषध बदलून देऊ शकतात. अशाप्रकारे पोटात आग होणे यावर उपचार केले जातात.
पोटात आग होणे यावर घरगुती उपाय –
पोटामध्ये आग होत असल्यास खालील उपाय उपयोगी पडतात.
उपाय क्रमांक 1 –
पोटात आग होत असेल तर भोजनानंतर गुळाचा खडा तोंडात ठेवून चगळत रहावा. यामुळे पोटात आग होत नाही.
उपाय क्रमांक 2 –
ग्लासभर पाण्यात चमचाभर मध आणि आल्याचा रस मिसळून ते पाणी प्यावे. यामुळेही पोटात होणारी आग कमी होते.
उपाय क्रमांक 3 –
दुधाचे पदार्थ पचत असल्यास पोटात आग होणे यावर आपण ग्लासभर थंड दुध पिऊ शकता.
उपाय क्रमांक 4 –
पोटात आग होत असल्यास केळे खावे. केळ्यात नैसर्गिक Antacids असतात. त्यामुळे पोटातील आग केळे खाल्याने कमी होते.
उपाय क्रमांक 5 –
जेवणानंतर बडीशेप चावून खाल्यामुळेही पोटात आग होण्यापासून दूर राहण्यास मदत होते. यामुळे अन्नपचनही व्यवस्थित होते.
पोटात आग होऊ नये म्हणून अशी घ्यावी काळजी :
- उपाशीपोटी फार वेळ न राहू नये.
- वेळेवर जेवण घ्यावे. रात्री खूप उशिरा जेवू नये.
- रोज सकाळी नाश्ता (ब्रेकफास्ट) जरूर करावा.
- चमचमीत मसालेदार पदार्थ, आंबट पदार्थ, आंबवलेले पदार्थ, जास्त तिखट पदार्थ, लोणची, कच्चा टोमॅटो, ओलं खोबरं, पापड, अति मांसाहार, हरभऱ्याची डाळ या गोष्टी शक्यतो टाळाव्यात.
- वारंवार चहा-कॉफी पिणे टाळावे.
- स्मोकिंग, मद्यपान ह्या व्यसनांपासून दूर राहावे.
- पुरेसे पाणी म्हणजे दिवसभरात साधारण आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
- नियमित व्यायाम व योगासने करावे.
- राग-चिंता-काळजी यावर नियंत्रण
ठेवावे. यासाठी मानसिक ताणतणावांचे नियोजन करावे. - रात्री न जागणे व दिवसा न झोपणे.
- वारंवार वेदनाशामक गोळ्या औषधे खाणे टाळावे.
हे सुद्धा वाचा – पोटात अल्सर होण्याची कारणे, लक्षणे व उपचार याविषयी माहिती जाणून घ्या..
Read Marathi language article about stomach burning causes, symptoms and home remedies. Last Medically Reviewed on February 28, 2024 By Dr. Satish Upalkar.