पोट फुगणे – Abdominal Bloating :
काहीवेळा अचानक पोट हे वायू व गॅसमुळे गच्च झाल्याने फुगते. अशावेळी पोटात दुखणे, पोट गच्च होणे, ढेकर येणे, गॅस होणे, अस्वस्थ वाटणे, मळमळणे असे त्रास होऊ लागतात.
पोट अचानक कशामुळे फुगते..?
प्रामुख्याने पचनास जड असणारे पदार्थ, तेलकट, खारट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे अपचन होऊन गॅसेस झाल्यामुळे अचानक पोट फुगत असते. तसेच,
- एकाचवेळी भरपेट जेवल्यामुळे,
- घाईघाईत जेवण जेवल्यामुळे,
- सिगारेटच्या स्मोकिंगमुळे,
- याशिवाय जठराला सूज आल्यामुळे किंवा अल्सर, अन्न विषबाधा, एसिडिटी, बद्धकोष्ठता, यकृत आजार, मानसिक ताण अशा अनेक कारणांमुळेही पोट फुगते.
अचानक पोट फुगणे यावरील घरगुती उपाय :
- पोट फुगल्यास ग्लासभर गरम पाणी प्यावे. यामुळे पोटातील गॅस निघून जाण्यास मदत होते.
- अचानक पोट फुगल्यावर एक चमचा ओवा आणि चिमुटभर सैंधव मीठ खावे.
- आल्याच्या तुकड्यास थोडेसे सैंधव मीठ लावून खावे.
- एक चमचा आल्याचा आणि एक चमचा लिंबू रस एकत्रित करून प्यावे. पोट फुगल्यास वरील घरगुती उपाय उपयोगी पडतात.
वारंवार पोट फुगत असल्यास अशी घ्यावी काळजी –
1) पचनास जड पदार्थ खाणे टाळावे –
तळलेले पदार्थ, मैदायुक्त पदार्थ, खारट पदार्थ, मसालेदार पदार्थ, मांसाहार, हरबरा, वाटाणा, बटाटा, कोबी, शिळे आणि बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे. यामुळे पोट साफ होत नाही, अपचन होते त्यामुळे पोट फुगण्याची समस्या होते. यासाठी असे पदार्थ सतत खाणे टाळावे. तसेच सोडा किंवा कार्बोनेटेड कोल्ड्रिंक्स पिणे देखील टाळावे.
2) हलका आहार घ्यावा –
सहजतेने पचणारा, हलका आहार घ्यावा. तूप घालून वरणभात खाऊ शकता. आयुर्वेदिक ‘हिंग्वाष्टक चूर्ण’ हे औषध पोट फुगण्याच्या समस्येवर खूप उपयुक्त ठरते. जेवताना चमचाभर चूर्ण सुरवातीच्या गरम भातात मिसळावे व ते खावे, त्यामुळे पचन व्यवस्थित होते.
याशिवाय आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, फळभाज्या, दही यांचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्यांमध्ये, फळांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असून ते पोट साफ होण्यास मदत करते त्यामुळे पोट फुगणे, गॅसेस होणे अशा समस्या होत नाहीत. तसेच पाणी पिताना कोमट पाणी प्यावे.
3) सवयी बदला –
एकाचवेळी भरपेट जेवणे टाळावे. त्यापेक्षा दिवसातून तीन ते चार वेळा थोडे थोडे खावे. जेवताना सावकाश व प्रत्येक घास चावून खावावा. गडबडीत, पटपट खाणे टाळावे. जेवणानंतर लगेच झोपू नये. दिवसा झोपू नये आणि रात्री जागरण करू नये. तंबाखू, सिगारेट, मद्यपान अशी सर्व प्रकारची व्यसनेही टाळावीत.
4) नियमित व्यायाम करावा –
बैठी कामे असलेल्या लोकांनी रोज कमीत कमी अर्ध्या तासासाठी चालणे, पायऱ्या चढणे-उतरणे, सायकलिंग यासारखे व्यायाम केल्याने पोटाच्या स्नायूंचा व्यायाम होतो. त्यामुळे घेतलेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते व पोट फुगण्याची समस्या होत नाही. व्यायामात योगासने, प्राणायाम यांचाही समावेश करू शकता.
पोट फुगल्यास डॉक्टरांकडे कधी जाणे गरजेचे असते..?
पोट फुगणे हा एक सामान्य त्रास असला तरी काहीवेळा गंभीर आजारामुळेही हा त्रास होऊ शकतो. यासाठी पोट फुगल्यास खालील लक्षणे जाणवत असल्यास आपल्या डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.
- पोट फुगण्याबरोबरच पोटात प्रचंड दुखणे,
- पोटावर सूज येणे,
- अचानक पोट फुगणे,
- संडासमधून रक्त पडणे,
- जुलाब व अतिसार होणे,
- उलट्या होणे,
- छातीत जळजळ होणे,
- वारंवार पोट फुगणे,
- वजन कमी होत जाणे अशी लक्षणे असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता आपल्या डॉक्टरांकडून तपासणी व योग्य उपचार करून घ्यावेत.
हे सुद्धा वाचा..
बद्धकोष्ठता असल्यास पोट साफ न झाल्यानेही पोट फुगत असते. यासाठी नियमित पोट साफ होण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घ्या.
Read Marathi language article about Abdominal Bloating Causes and Home remedies. Last Medically Reviewed on February 22, 2024 By Dr. Satish Upalkar.