पाइल्स आणि घरगुती उपाय :

बदललेली जीवनशैली, तिखट मसालेदार पदार्थ खाण्याची सवय, बैठे काम, सततचा प्रवास, वाढलेले वजन अशा अनेक कारणांमुळे आज अनेकांना पाईल्स होत आहे. पाइल्समध्ये गुदाच्या ठिकाणच्या नसा सुजतात, त्याठिकाणी अतिशय वेदना, खाज आणि जळजळ होत असते. त्रास अधिक वाढल्यास शौचावाटे रक्तही पडत असते. त्यामुळे पाइल्सवर वेळीच योग्य उपाय करणे गरजेचे असते. यासाठी याठिकाणी पाईल्सवरील घरगुती उपाय याविषयी माहिती दिली आहे.

पाइल्सवरील हे करा घरगुती उपाय :

लिंबू आणि सैंधव मीठ –
पाइल्सवर सकाळ व सायंकाळी जेवणापूर्वी सैंधव मीठ लावून लिंबू चोखून खाणे खूप फायदेशीर ठरते. याशिवाय ग्लासभर कोमट पाण्यात लिंबू पिळून त्यात चिमूटभर सैंधव मीठ टाकून ते मिश्रण सकाळी उटल्यावर उपाशीपोटी प्यावे. 15 दिवस हा घरगुती उपाय केल्यास पाईल्सचा त्रास कमी होण्यास मदत होईल.

कोरपड –
कोरपडीच्या गरात सूज कमी करणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. त्यामुळे पाईल्समध्ये गुदाच्या ठिकाणी आलेली सूज व जळजळ कमी होण्यास मदत होते. यासाठी गुदाच्या ठिकाणी थोडासा कोरपडीचा गर लावून हळूवारपणे मालिश करावी.

जिरेपूड –
जिरे भाजून त्याची बारीक पूड करावी. एक चमचा बारीक केलेली जिरेपूड ग्लासभर कोमट पाण्यात घालून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण रोज सकाळी उपाशीपोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी प्यावे. सकाळी हे मिश्रण पिल्यानंतर कमीत कमी एक तास तरी काही खाऊ नये. पाइल्ससाठी हा घरगुती उपायही खुप उपयुक्त ठरतो.

कच्चा मुळा –
कच्चा मुळा खाणे पाईल्समध्ये फायदेशीर असते. यासाठी मुळ्याचा रस काढून त्यात थोडेसे सैंधव मीठ घालून ते मिश्रण दिवसातून दोन वेळेस प्यावे. याशिवाय किसलेला मुळा आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट करावी. ही पेस्ट पाईल्स वर लावल्यास सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होईल.

सुरण कंदमुळ –
पाईल्स असल्यास सुरण हे कंदमुळ अत्यंत उपयुक्त ठरते. सुरण वाफवून केलेली भाजी व ताक असा आहार काही दिवस घेतल्यास उत्तम फायदा होतो. सुरण कंदमुळ उकडून खाण्यात ठेवावे. हा घरगुती उपाय पाईल्ससाठी खूप उपयोगी ठरतो.

दुर्वा –
दुर्वा बारीक कुटून त्या गायीच्या एक कप दुधात उकळाव्यात. त्यानंतर मिश्रण गाळून घेऊन थोडे थंड झाल्यावर प्यावे. पाइल्सवर हा उपायही लाभदायक ठरतो.

कांदा –
पाईल्समध्ये रक्त पडत असल्यास 30 ग्रॅम कांद्याचा रस व 60 ग्रॅम साखर एकत्र करून ते मिश्रण काही दिवसांसाठी दिवसातून दोनदा घ्यावे.

एरंडेल तेल –
पाईल्समध्ये बद्धकोष्ठता असल्यास पोट साफ न होण्याच्या त्रासावर एरंडेल तेल उपयुक्त ठरते. यासाठी 5 ml एरंडेल तेल ग्लासभर दुधात मिसळून रोजरात्री झोपण्यापूर्वी प्यावे. एरंडेल तेल गुदभागी लावल्याने त्याठिकाणी आलेली सूज कमी होण्यास मदत होते.

त्रिफळा चूर्ण –
पाईल्समध्ये पोट साफ न होत असल्यास त्रिफळा चूर्णही खूप उपयोगी ठरते. अर्धा कप कोमट पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण कालवून ते मिश्रण रोज रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे. यामुळे सकाळी व्यवस्थित पोट साफ होण्यास मदत होते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

ताक –
जिरेपूड घालून ताक पिण्यामुळेही पाईल्सचा त्रास लवकर कमी होतो.

कोल्ड कॉम्प्रेस –
पाईल्समधील वेदना कमी करण्यासाठी आईस पॅक वापरणे हा एक चांगला घरगुती उपाय आहे. यामुळे वेदना आणि जळजळ कमी होते.

Information about Piles home remedies in Marathi.