रक्तदाब कमी होणे (Low Blood Pressure) :
रक्तवाहिन्यांमधून वाहणाऱ्या रक्ताचा दाब जेंव्हा असामान्यपणे कमी होतो तेंव्हा रक्तदाब कमी होतो. या स्थितीला लो ब्लडप्रेशर, अल्प रक्तदाब, हायपोटेन्शन (hypotension) किंवा लो बीपी असेही म्हणतात. बीपी कमी होणे ही हाय ब्लडप्रेशर इतकीच गंभीर समस्या ठरू शकते त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका.
रक्तदाबाचे नॉर्मल प्रमाण म्हणजे 120/80 इतके असते आणि जर रक्तदाब हा 90/60 किंवा त्यापेक्षा कमी भरत असल्यास कमी रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. रक्तदाब कमी झाल्यास मेंदूला आणि इतर अवयवांना रक्ताचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नाही त्यामुळे चक्कर येणे, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षण आढळतात.
रक्तदाब कमी होण्याची कारणे (Low BP Causes) :
रक्तदाब असामान्यपणे कमी होण्यासाठी अनेक कारणे जबाबदार असतात.
- उच्चरक्तदाब किंवा डिप्रेशनसाठी घेत असेलेल्या औषधांमुळे रक्तदाब कमी येऊ शकतो.
- भरपूर उलट्या, जुलाब, अतिसार किंवा भरपूर घाम आल्याने शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो.
- जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे.
- भरपूर घाम आल्याने.
- हृदयविकाराचा झटका, हृदय बंद पडणं, arrhythmias यासारख्या हृदयविकारामुळे रक्तदाब कमी होतो.
- रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने, दमा, न्युमोनिया यासारख्या विकारांमध्ये रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेले आढळते.
- हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. गर्भावस्थेत अशाप्रकारे रक्तदाब कमी होऊ शकतो.
- मज्जासंस्थेच्या विकारांमुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. जसे डायबेटिक न्युरोपॅथी, मेंदु आणि मज्जासंस्थेस आघात (Injury) झाल्याने रक्तदाब असामान्यपणे कमी झालेला आढळतो.
- किडन्यांच्या विकारांमुळे,
- तीव्र जंतुसंसर्ग, गंभीर स्वरुपातील डेंग्युचा तापामुळे,
- शारीरीक दुर्बलता, अशक्तपणामुळे,
- कुपोषण, उपवास, अन्न आणि पाण्याच्या कमतरतेमुळे,
- शारीरिक अतिपरिश्रमामुळे,
- मानसिक तणाव, भय, शोक, मानसिक आघातामुळेही रक्तदाब कमी होऊ शकतो.
लो ब्लडप्रेशरचे प्रकार :
1) ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन (Orthostatic hypotension) – बसलेल्या किंवा झोपलेल्या स्थितीतून अचानक उठून उभे राहिल्याने रक्तदाब घसरतो. यावेळी चक्कर येणे, डोके गरगरणे असे त्रास यावेळी होऊ शकतात. गर्भधारणा, वृद्धावस्था, पार्किन्सन डिसिज आणि मधुमेह अशा कारणांमुळे ही ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन होऊ शकते.
2) पोस्टप्रॅन्डियल हायपोटेन्शन (Postprandial) – या प्रकारात जेवल्यानंतर रक्तदाब कमी होत असतो. वृध्द लोकांमध्ये ही समस्या अधिक असते.
3) Severe – तीव्र जंतुसंसर्ग (इन्फेक्शन) किंवा गंभीर दुखापत यामुळे ह्यामुळे रक्तदाब कमी होत असतो.
लो ब्लड प्रेशरची लक्षणे (Low BP Symptoms) :
- चक्कर येणे,
- डोके हलके होणे, डोके गरगरणे,
- बैचेन होणे व अस्वस्थ वाटणे,
- अशक्तपणा व थकवा जाणविणे,
- हात-पाय थंड पडणे व थरथरणे,
- डोळ्यासमोर अंधारी येणे, दृष्टी कमजोर होणे,
- हृद्य स्पंदने असामन्यपणे होणे, छातीत धडधडणे ही लक्षणे रक्तदाब कमी झाल्यामुळे जाणवू लागतात.
अल्प रक्तदाबामुळे शरीरातील मेंदू, हृदय, किडन्या यासारख्या महत्वाच्या अवयवांना पुरेशा प्रमाणात रक्त पुरवठा होत नाही. त्यामुळे जास्त प्रमाणात रक्तदाब कमी झाल्यास पक्षाघात, हार्ट अटॅक, किडन्या निकामी होण्याचा धोका असतो. प्रसंगी रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.
ब्लड प्रेशर कमी होणे यावरील उपचार :
कोणत्या कारणामुळे रक्तदाब कमी झाला आहे त्यानुसार यावरील उपचार ठरतात. जसे जुलाब, उलट्या यामुळे शरीरातील पाणी कमी झाल्याने रक्तदाब कमी झाला असल्यास जुलाब, उलट्या यावर सलाईन वैगेरे उपचार केले जातात. अचानक उठून उभे राहिल्याने रक्तदाब कमी होत असल्यास उठताना सावकाश उठावे. यावेळी उभे राहिल्यावर खोल श्वास घ्यावा. आणि जर जेवल्यानंतर ब्लड प्रेशर कमी होत असल्यास दिवसातून 3 ते 4 वेळा थोडे थोडे खावे.
रक्तदाब कमी झाल्यास हे करा उपाय :
- अचानक डोळ्यांसमोर अंधार येणे, गरगरल्या सारखे वाटल्यास ताबडतोब पाठीवर झोपावे. काहीवेळ डोळे बंद करून शांत पडून रहावे.
- चिमूटभर मीठ आणि साखर घालून पाणी प्यावे. ओआरएस पावडरही पाण्यात मिसळून पिऊ शकता.
- यानंतर थोडे बरे वाटल्यानंतरही या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांकडे जाऊन योग्य निदान आणि उपचार करून घ्यावे.
लो ब्लड प्रेशर ची समस्या असल्यास घ्यायचा आहार :
- पुरेसे पाणी व पातळ द्रवपदार्थ प्यावे. यामुळे शरीरात डिहायड्रेशन होत नाही.
- व्हिटॅमिन बी -12 घटक असणारे पदार्थ म्हणजे अंडी, मांस यांचा आहारात समावेश करावा.
- हिरव्या पालेभाज्या, लिंबूवर्गीय फळे खावीत.
- खारट पदार्थ, मासे, लोणचे यांचा आहारात समावेश करावा.
हे सुद्धा वाचा..
Read Marathi language article about Hypotension or Low Blood Pressure Causes, Symptoms, Normal Ranges and Treatments. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on February 14, 2024.