चरबीच्या गाठी होणे – Lipoma :

शरीराच्या त्वचेवर होणाऱ्या चरबीच्या गाठींना लिपोमा (Lipoma) असे म्हणतात. त्वचेवर चरबीच्या गाठी होण्याची समस्या अनेकांना असते. शरीराच्या कोणत्याही भागावर अशा चरबीच्या गाठी होऊ शकतात. प्रामुख्याने मान, खांदा, हात, मांडी, पोट आणि पाटीवर अशा गाठी होत असतात.

ह्या चरबीच्या गाठी benign ट्युमर प्रकारच्या असतात. त्यामुळे त्या गाठी कॅन्सरच्या नसतात. चरबीच्या गाठी ह्या धोकादायक ठरत नसल्याने त्यावर उपचार करण्याचीही फार आवश्यकता नसते.

चरबीच्या गाठी होण्याची कारणे :

चरबीच्या गाठी नेमक्या कशामुळे होतात याची ठोस कारणे अद्यापही माहीत झालेली नाही. 40 ते 60 वर्षाच्या व्यक्तींमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात आढळतो. कुटुंबात चरबीच्या गाठी होण्याची अनुवांशिकता असणे, जेनेटिक फॅक्टर, हार्मोन्समधील बदल यांमुळे हा त्रास होऊ शकतो.

याशिवाय Madelung’s आजार, काउडन सिंड्रोम, गार्डनर सिंड्रोम, एडीपोसिस डोलोरोसा यासारख्या आजारातही चरबीच्या गाठी होत असतात.

लिपोमाची लक्षणे :

अनेक प्रकारच्या गाठी त्वचेवर होऊ शकतात. त्यापैकी चरबीच्या गाठी ह्या त्यांच्या विशिष्ट लक्षणांवरून ओळखता येतात.
• अशा गाठींना स्पर्श केल्यास त्या मऊ जाणवतात.
• बोटांनी दाबल्यास ती गाठ आजूबाजूला हलत असते.
• त्या गाठीमुळे कोणत्याही वेदना होत नाहीत.
• त्वचेच्या रंगासारख्याचं त्या गाठी असतात.
• गाठींची वाढ अगदी सावकाशपणे होत असते.
• चरबीच्या गाठी ह्या मान, खांदा, हात, मांडी, पोट आणि पाटीवर होत असतात.

सामान्यपणे चरबीच्या गाठी दुखत नसतात, त्यात कोणत्याही वेदना नसतात. पण ह्या सारख्याच गाठी angiolipoma ह्या स्थितीमध्येही असतात. मात्र  angiolipoma मधील गाठी ह्या अधिकप्रमाणात दुखत असतात.

अंगावर चरबीच्या गाठी झाल्यास डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक असेल..?

जर त्वचेवरील गाठी ह्या एकाएकी मोठ्या होत असल्यास किंवा त्यांच्या रंगामध्ये फरक जाणवत असल्यास किंवा गाठींच्या ठिकाणी वेदना अधिक होत असल्यास डॉक्टरांकडे जाऊन निदान व उपचार करणे आवश्यक आहे.

लिपोमाचे निदान :

त्वचेवरील गाठींच्या स्वरूपावरून चरबीच्या गाठी ओळखणे सोपे असते. तर काही वेळा बायोप्सी, MRI स्कॅन किंवा CT स्कॅनद्वारे गाठेची तपासणी केली जाऊ शकते.

चरबीच्या गाठींवर हे आहेत उपचार – Lipoma Treatment :

चरबीच्या गाठी ह्या धोकादायक नसतात. त्यामुळे त्यावर उपचार करण्याची विशेष गरज नसते. मात्र जर गाठी मोठ्या असतील, त्यामुळे वेदना होत असल्यास उपचार करावे लागू शकतात.

सर्जरी –
चरबीची गाठ मोठी असल्यास सर्जरी करून ती गाठ काढून टाकली जाते.

लिपोसक्शन (Liposuction) –
यामध्ये सुई व सिरिंज यांचा वापर करून चरबीच्या गाठीचा आकार कमी केला जातो.

चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी हे करा घरगुती उपाय :

उटण्याचा मसाज –
दिवाळीत आपण जे उटणे वापरतो ते चरबीच्या गाठींवर खूप उपयुक्त असते. केवळ दिवाळीपुरता उटणं मर्यादीत न ठेवता त्याचा वापर वर्षभर करणे हे आपल्या त्वचेसाठी उपयुक्त आहे. त्वचेसाठी उटणं हे एक उत्तम प्रकारचे स्क्रबर आहे.

चरबीच्या गाठी असल्यास थोड्या खोबरेल किंवा एरंडेल तेलात उटणे मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट रोज अंघोळीपूर्वी चरबीच्या गाठींना लावावी व हाताने मसाज करावा. उटण्यातील उपयुक्त आयुर्वेदिक घटकांमुळे चरबीच्या गाठी कमी होण्यास खूप मदत होते.

एरंडेल तेलाचा मसाज –
चरबीच्या गाठी असणाऱ्या ठिकाणी एरंडेल तेल लावून मसाज करावा. यामुळेही चरबीच्या गाठी कमी होण्यास मदत होते.

लिंबूपाणी –
लिंबू रस पिण्यामुळे शरीरातील फॅटी टिश्यूज कमी होण्यास मदत होते. त्यामुळे लिपोमा (Lipoma) चा आकार कमी होण्यासाठी ग्लासभर पाण्यात लिंबू रस मिसळून प्यावे.

त्वचेवर खाज होत असल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Information about Lipoma causes, symptoms and treatments in Marathi.

© लेखक - डॉ. सतीश उपळकर
(महत्वाची सूचना - ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये.)