गरोदर न राहण्याचे हे आहेत उपाय – गरोदर राहू नये यासाठी हे करा उपाय..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

प्रेग्नंट होऊ नये यासाठी काय करावे..?

लैंगिक संबंधानंतर गरोदर (Pregnant) राहू नये यासाठी आज अनेक सुरक्षित उपाय उपलब्ध आहेत. कंडोम, कॉपर टी, व्हजायनल रिंग, नियमित घेण्याच्या हार्मोनल गर्भनिरोधक गोळ्या अशा अनेक पर्यायांद्वारे गरोदर राहण्यापासून टाळता येणे शक्य आहे.

मात्र काही वेळा कंडोमचा वापर न करता सेक्स करणे किंवा सेक्सवेळी कंडोम फाटणे, गर्भाशयात बसवलेली कॉपर टी गळून पडणे किंवा नियमित घेण्याच्या गर्भनिरोधक गोळ्या खाणे विसरणे यामुळे सेक्सनंतर गरोदर राहण्याची शक्यता असते. अशावेळी गरोदर न राहण्यासाठी काय करावे, कोणते उपाय करावेत असा प्रश्न अनेकांना पडत असतो.

गरोदर न राहण्यासाठी हे आहेत उपाय :

गरोदर राहू नये यासाठी इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्यांचा उपयोग होतो. मात्र ह्या गोळ्या सेक्सनंतर 72 तासाच्या आत घेणे आवश्यक असते. या गोळीमुळे गरोदर न राहण्यास मदत होते. ‎इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्यांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

गरोदर न राहण्याचे अन्य उपाय कोणते आहेत..?

कंडोम –
पुरुषांनी सेक्सच्यावेळी कंडोमचा वापर करणे हा गरोदर न राहण्यासाठी सर्वात सोपा व सुरक्षित पर्याय आहे. सेक्समध्ये पुरुषाचे वीर्य या कंडोममध्ये जमा होते. त्यामुळे सेक्समध्ये पुरुष बीज हे स्त्रीच्या योनीमार्गात जात नाही. त्यामुळे ती स्त्री गरोदर होत नाही. याशिवाय लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या अनेक आजारांपासून बचाव होण्यासही कंडोममुळे मदत होते.

गर्भनिरोधक गोळ्या –
गरोदर राहू नये यासाठी गर्भनिरोधक गोळ्या घेता येतात. गर्भनिरोधक गोळ्या नियमित घेण्यामुळे स्त्रीबीज निर्मिती होणे रोखले जाते यामुळे गरोदर न राहण्यासाठी मदत होते. ह्या गर्भनिरोधक गोळ्या पाळीच्या पाचव्या दिवसापासून रोज एक गोळी याप्रमाणे 28 दिवस घ्यायच्या असतात. या गोळ्यांतील 21 गोळ्या ह्या हॉर्मोन्स असणाऱ्या आणि 7 गोळ्या लोहाच्या असतात.

28 दिवसाच्या गोळ्या संपल्या की 1 ते 2 दिवसात पाळी येते. मात्र या गोळ्या रोज न विसरता नियमित घेणे आवश्यक असते. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या गोळ्यांचा वापर करणे गरजेचे असते. या गोळ्यांचा अतिवापर करणे टाळावे. तीन महिने गोळ्या सलग घेतल्यानंतर पुढील एक महिना गोळ्या घेऊ नयेत.

कॉपर टी –
स्त्रियांच्या गर्भाशयात कॉपर टी (तांबी बसवणे) हे साधन बसवले जाते. त्यामुळे सेक्सनंतर स्त्रिबीजाचे पुरुष शुक्राणुशी मिलन होत नाही. त्यामुळे गरोदर न राहण्यास मदत होते. कॉपर टीच्या वापरामुळे 5 वर्षापर्यंत गरोदर होण्यापासून दूर राहता येऊ शकते. मात्र काही स्त्रियांना तांबी बसवल्यानंतर खूप जास्त रक्तस्राव किंवा पोटात वेदना होऊ शकतात. अशावेळी कॉपर टी काढून टाकावा लागू शकतो.

स्त्रियांसाठी कंडोम –
पुरुषांप्रमाणेच स्त्रियांसाठीदेखील कंडोम उपलब्ध असतात. सेक्स करण्यापूर्वी स्त्रीयांनी हे कंडोम योनीमार्गात घालावेत. यामुळे पुरुष शुक्राणू आणि स्त्रीबीज यांचे मिलन रोखले जाते. त्यामुळे स्त्री गरोदर होत नाही. याशिवाय लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या अनेक आजारांपासून बचाव होण्यासही कंडोममुळे मदत होते.

ऑपरेशन –
स्त्रियांमध्ये प्रजोत्पादन कायमस्वरूपी थांबावण्यासाठी स्त्रीमध्ये टाक्याचे किंवा बिनटाक्याचे ऑपरेशन केले जाते. यापुढे मूल नको असेल तर या कायमस्वरूपी गर्भनिरोधक पद्धतीचा वापर केला जातो.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

नसबंदी –
नसबंदी शस्त्रक्रिया पुरुषांमध्ये केली जाते. यामुळे शुक्राणू पुरुषाच्या विर्यामध्ये येत नाहीत. त्यामुळे गरोदरपण रोखले जाते. ही शस्त्रक्रिया सुरक्षित असून शस्त्रक्रियेनंतर पुरुषांच्या लैंगिक जीवनात कोणतीही बाधा यामुळे निर्माण होत नाही.

गर्भपात –
गर्भपात ही कायदेशीर बाब आहे. सुधारित कायद्याने 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याला मान्यता आहे. त्यामुळे अनावश्यक गर्भधारणा असल्यास 24 आठवड्यापूर्वी दवाखान्यात जाणे आवश्यक आहे.

Information about Preventing an unintended pregnancy in Marathi.