लघवीचा वास येणे (Smelly Urine) :
लघवीला एक विशिष्ट असा वास असतोच. मात्र काहीवेळा लघवीला जास्त उग्र असा वास येऊ लागतो. लघवीला असा उग्र वास येणे हे काहीवेळा एखाद्या वैद्यकीय समस्येचे लक्षणसुध्दा असू शकते.
लघवीला वास येणे याची कारणे –
- शरीरातील पाणी कमी झाल्याने लघवीतील अमोनिया अधिक कॉन्सन्ट्रेटेड होतो. त्यामुळे लघवीचा उग्र वास येत असतो.
- याशिवाय मूत्रमार्गात बॅक्टेरियाचे इन्फेक्शन झाल्याने लघवीचा वास येतो. अशावेळी लघवीच्या वेळी जळजळ होणे, आग होणे असे त्रासही असतात.
- व्हिटॅमिन-B, व्हिटॅमिन-D, sulfonamide अँटीबायोटिक आणि मधुमेह व आमवात यावरील काही औषधांनी सुध्दा लघवीला वास येऊ शकतो.
- डायबेटिस असल्यास त्यामुळे लघवीचा गोडसर असा वास येऊ शकतो. यावेळी वारंवार लघवी होते तसेच तहान अधिक लागत असते.
- कावीळ सारखे यकृताचे आजार झाल्यास लघवीला उग्र वास येऊ शकतो.
- हार्मोन्समधील बदलांमुळे गरोदरपणात लघवीला दुर्गंधीयुक्त वास येऊ शकतो. अशा विविध कारणांमुळे लघवीला वास येतो.
लघवीला वास येणे यावर घरगुती उपाय –
लघवीला घाण वास येत असल्यास पुरेसे पाणी प्यावे. लघवीचा वास दूर करण्यासाठी पुरेसे पाणी पिणे हा उपाय सगळ्यात चांगला आहे. याशिवाय तुम्ही शहाळ्याचे पाणी, ताज्या फळांचा रस, सरबत, उसाचा रस असे द्रवपदार्थ देखील पिऊ शकता.
लघवीला वास येऊ नये यासाठी घ्यायची काळजी –
- दररोज किमान सात ते आठ ग्लास पाणी प्यावे.
- जास्त वेळ लघवी रोखून ठेऊ नका.
- वेळच्यावेळी लघवीला जावे. किमान दर 3 ते 4 तासांनी लघवीला जावे.
- सोडायुक्त कोल्ड्रिंक्स, कॅफिन आणि अल्कोहोल पिणे टाळा.
अशी खबरदारी घेतल्यास लघवीचा वास येणे कमी होते.
डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे ..?
लघवीला दुर्गंधीयुक्त वास येत असल्यास व लघवीला जळजळ होणे, ताप येणे, मळमळ व उलट्या होणे असे त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. लघवीला गोडसर वास येत असल्यास त्यावेळीही डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. कारण हे मधुमेहाचे लक्षण असू शकते.
निदान व तपासणी –
लघवीचा वास का येतो याचे निदान करण्यासाठी लघवीच्या चाचण्या केल्या जातात. याशिवाय काहीवेळा सिस्टोस्कोपी, एक्स-रे, MRI scan किंवा अल्ट्रासाऊंड तपासणी केली जाते.
लघवीचा वास येणे यावर उपचार –
जर मूत्रमार्गात इन्फेक्शन झाल्याने लघवीचा वास येत असल्यास, त्यावरील उपचारासाठी अँटीबायोटिक औषधे डॉक्टर लिहून देतील. तसेच ताप किंवा लघवीच्या जागी होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी सुध्दा औषधे दिली जातात.
हे सुध्दा वाचा – लघवीला जळजळ होणे याची कारणे व उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Smelly Urine Causes, Symptoms, Treatment and Home remedies. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on March 7, 2024.