केस विरळ होणे – Hair loss :
अनेक कारणांनी केस गळती होऊन केस विरळ होत असतात. केस गळण्याच्या समस्यांमध्ये केस पातळ होणे ते पूर्ण टक्कल पडणे यांचा समावेश असतो. त्यामुळे केस विरळ होत असल्यास त्यावर वेळीच योग्य उपाय करणे आवश्यक असते.
केस विरळ होण्याची कारणे :
केस गळती होऊन केस विरळ व पातळ होण्यासाठी अनेक कारणे जबाबदार असतात. यामध्ये,
• हार्मोन्समध्ये अचानक बदल झाल्यामुळे,
• कुटुंबात टक्कल पडण्याची आनुवंशिकता असल्यामुळे,
• केसात कोंडा होण्याची समस्या असल्यामुळे,
• थायरॉइडची समस्या,
• रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे,
• आहारातील प्रोटिन्स व बायोटिन यांची कमतरता झाल्यामुळे,
• अपुरी झोप व मानसिक ताणतणाव,
• केमिकलयुक्त हेअर प्रोडक्टचा अतिवापर करणे,
• काही औषधांच्या दुष्परिणामामुळेही केस अधिक प्रमाणात गळू लागतात.
याशिवाय महिलांमध्ये विशेषतः प्रेग्नन्सीनंतर केसगळती जास्त प्रमाणात होत असते.
केस पातळ होऊ नये यासाठी अशी घ्यावी केसांची काळजी :
• केस धुताना जास्त गरम पाण्याचा वापर करू नये.
• ओल्या केसांना रगडून पुसू नये.
• अस्वच्छ केस अधिक गळतात, त्यामुळे केसांच्या हायजिनकडे लक्ष द्यावे.
• दिवसातून तीन ते चार वेळा केस विंचरावे, त्यामुळे केसातील कचरा निघून जातो व केसांच्या मुळांशी रक्त संचरण योग्यरीत्या होऊन केसांची मुळे घट्ट होतात.
• कोमट केलेले तेल केसांना लावावे. मात्र जास्त गरम तेल केसांना लावू नका.
• केस धुण्यासाठी तीव्र शैम्पू वापरू नका.
• रोज व्यायाम व मेडिटेशन करा. व्यायामामुळे संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित होण्यास मदत होईल.
• सकाळच्या कोवळ्या उन्हात बसावे. त्यामुळे शरीरास आणि केसांनाही व्हिटॅमिन-D मुबलक प्रमाणात मिळते.
• मानसिक ताणतणाव, डिप्रेशन यापासून दूर राहावे.
आणि शेवटचे महत्त्वाचे म्हणजे, जाहिरात पाहून बाजारातील नवनवीन हेअर प्रोड्क्टसचा आपल्या केसांवर प्रयोग करणे टाळावे.
विरळ झालेल्या केसांसाठी असा घ्यावा आहार :
काय खावे..?
आहारात हिरव्या भाज्या, मोड आलेली कडधान्ये, सुकामेवा, दूध, अंडी, मांसाहार, मासे, विविध फळे यांचा समावेश असावा. यामुळे केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारे प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आपल्या शरीराला मिळेल.
तसेच दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. यांमुळे शरीरातील अशुद्ध घटक लघवीवाटे निघून जातील, शरीर हायड्रेट राहील. तसेच पुरेसे पाणी पिण्यामुळे शरीरातील रक्तसंचरण (Blood circulation) योग्यरीत्या होण्यास मदत होऊन केसांची मुळेही घट्ट होतात.
काय खाणे टाळावे..?
अयोग्य आहार खाणे म्हणजे फास्टफूड, जंकफूड, तेलकट पदार्थ, खारट पदार्थ, कोल्ड्रिंक्स यासारखे पदार्थ वारंवार खाणे टाळावे. चहा आणि कॉफी जास्त प्रमाणात पिणे टाळावे. धुम्रपान, सिगारेट, तंबाखू यासारख्या व्यसनांपासून दूर राहावे.
विरळ केस दाट व मजबूत होण्यासाठी हे करा घरगुती उपाय :
कांदा –
मिक्सरमधून कांद्याची बारीक पातळ पेस्ट तयार करावी. ही पेस्ट पंधरा मिनिटे केसांना लावावी त्यानंतर केस स्वच्छ धुवावेत. यांमुळे केसांची मुळे घट्ट होऊन केस गळणे थांबते. तसेच विरळ झालेले केस वाढण्यासही मदत होते. हा उपाय आठवड्यातून दोनवेळा करू शकता.
लसूण –
लसूण पाकळ्या बारीक ठेचून खोबरेल तेलात घालून मिश्रण गरम करून घ्यावे. हे तेल थोडे थंड झाल्यावर केसांच्या मुळांशी लावावे व अर्ध्या तासाने केस धुवावेत. यामुळे केस गळती थांबते व केसांची नवीन वाढ होऊन पातळ झालेले केस दाट होतात.
मेथी बिया –
मेथीचे बी रात्रभर पाण्यात भिजत घालावे. त्यानंतर सकाळी ते भिजलेले बी बारीक वाटावे व त्याचा लेप केसांना लावून एक तासानंतर केस धुवावेत.
जास्वंद –
जास्वंदाची फुले कुटून खोबऱ्याच्या तेलात घालून मिश्रण एकत्र करावे. त्यानंतर हे तेल काही तासांसाठी केसांना लावावे त्यानंतर केस धुवावेत. जास्वंद केसांना पोषण देतात, केसगळती थांबवतात व केस दाट बनवते.
खोबरेल तेल आणि कापूर –
खोबरेल तेलात कापूर मिसळून केसांना लावावे यामुळेही केस गळायचे थांबतात व केसांची नवीन वाढ होऊन पातळ झालेले केस दाट होतात.
टक्कल पडल्यास नवीन केस येण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.