केस गळण्याची समस्या :

पुरुष आणि महिला दोघेही केस गळण्याच्या समस्येने त्रस्त असतात. अधिक प्रमाणात केस झडल्यामुळे टक्कल पडण्याचीही शक्यता अधिक असते. टक्कल पडण्याच्या समस्येची अनुवांशिकता, वाढते वय, हार्मोनल असंतुलन, मानसिक ताणतणाव आणि असंतुलित आहार ही प्रमुख कारणे आहेत.

गेलेले केस उगवण्यासाठी उपाय म्हणून अनेकजण केमिकल्सयुक्त हेअर प्रोडक्टचा वापर, हेअर-प्लगचा उपयोग किंवा खर्चिक सर्जरीचा पर्यायही निवडत असतात. मात्र केसांची योग्य निगा राखायची असेल तर कृत्रिम गोष्टींच्या मागे धावण्यापेक्षा नैसर्गिक गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे. यासाठी याठिकाणी गेलेल्या केसांना पुन्हा लवकर उगवण्यासाठी काही नैसर्गिक उपयुक्त उपायांची माहिती दिली आहे.

गेलेले केस टकलावर परत येण्यासाठी हे करा उपाय :

दररोज स्कैल्पची मालिश करावी..
स्कैल्प (scalp) ची मालिश व मसाज केल्यामुळे गेलेल्या केसांच्या रोमछिद्र (folicles) मध्ये योग्यप्रकारे रक्तसंचार होते. त्यामुळे नवीन केस लवकर उगण्यास मदत होते. यासाठी स्कैल्पवर गोलाकार दिशेमध्ये बोटे फिरवत मालिश करावी.

तेल मालिश करावी..
नुसतीच मालिश करण्यापेक्षा केसांच्या मुळांशी तेल मालिश केल्याने रक्तप्रवाह व्यवस्थित होण्यास खूप मदत होते. तेलामुळे केसांना आवश्यक पोषकघटक मिळतात आणि केसांचं खोलवर पोषण होऊन केसांचे आरोग्य सुधारते. तेल मालिशमुळे केसांची रोमछिद्र (folicles) मोकळी होतात त्यामुळे नवीन केस उगवण्यास मदत होते. केसांची तेल मालिश करण्यासाठी खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल किंवा बदाम तेलाचा वापर करावा. नवीन केस उगण्यासाठी बदाम तेल जास्त उपयुक्त आहे. कारण बदाम तेलात व्हिटॅमिन-E चे प्रमाण अधिक असते.

दररोज तेलाचा मसाज केल्यानं केसांच्या मुळाशी असलेल्या रक्तवाहिन्या जोमाने कामाला लागतात. ते शक्य नसल्यास आठवड्यातून किमान दोन ते तीनवेळा स्कैल्पची तेल मालिश जरूर करावी. केसांच्या मुळाशी कोमट तेलानं मालिश करावी. केसांमध्ये जवळपास एक तास तेल मुरलं पाहिजे, त्यामुळे केसांच्या मूळापर्यंत तेल जाते. उन्हाळ्याच्या दिवसात केसांना तेल शक्यतो रात्री झोपताना लावावे. रात्रभर जर तेल ठेवायचं नसेल तर मग आंघोळीच्या एक तास आधी तेल मसाज करू शकता.

अंड्याचा हेअरमास्क..
अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये प्रोटीन, जस्त, सल्फर, लोह, फॉस्फरस और आयोडीन यासारखी केसांसाठी उपयुक्त असणारी पोषकतत्वे असतात. केस अधिक प्रमाणात गळत असल्यास किंवा टक्कल पडण्याची शक्यता असल्यास अंड्याच्या हेअर मास्कचा वापर आठवड्यातून एकदा करावा. यासाठी दोन अंडे फोडून त्यातील पिवळा भाग काढून टाकावा. अंड्यातील पांढऱ्या भागाचा थर केसांना लावावा. 15 मिनिटांनी केस धुवून घ्यावेत यामुळे केस मजबूत, घनदाट होण्यास व गेलेले केस पुन्हा येण्यासही मदत होते.

कांद्याचा रस..
नवीन केस येण्यासाठी कांद्याचा रस खूप उपयुक्त ठरतो. कांद्याचा रस केस गेलेल्या ठिकाणी लावल्याने त्याठिकाणचे रक्तसंचरण (circulation) सुधारण्यास मदत होते. यासाठी कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावून 15 मिनिटांनी केस धुवून घ्यावेत.

खोबरेल तेल, लसूण व कांदा..
वाटीभर खोबरेल तेलात तीन चमचे एरंडेल तेल मिसळून त्यात 4-5 लसूण पाकळ्या व थोडा कांदा बारीक करून घालावा. हे मिश्रण मंद आचेवर पाच मिनिटे गरम करून घ्यावे. तेलाचे हे मिश्रण थोडे कोमट झाल्यावर केसांच्या मुळाशी लावावे. या तेलाच्या नियमित वापराने केस गळणे कमी होते, केस घनदाट होतात तसेच गळलेले केस नवीन येण्यास मदत होते.

कोरपडीचा गर..
केस गळतीवर कोरपडीचा (Aloe vera) खूप चांगला फायदा होतो. त्याचप्रमाणे नवीन केस येण्यासाठी, केस मजबूत व घनदाट होण्यासाठी कोरपडीचा गर उपयुक्त ठरतो. केस गेलेल्या ठिकाणी नविन केस उगवण्यासाठी त्याठिकाणी कोरपडीचा गर आठवड्यातून 2-3 वेळा लावावा.

योग्य आहार घ्यावा..
केसांच्या आरोग्यासाठी योग्य आणि हेल्दी आहार घेणेही आवश्यक असते. यासाठी प्रोटिन्स, ओमेगा 3 फैटी एसिड, व्हिटॅमिन्स, खनिजे यांनी भरपूर असणारा आहार घ्यावा. विशेषतः पुरेसा प्रोटीनयुक्त आहार न खाल्यामुळे केस गळण्याच्या तक्रारी अधिक वाढतात. यासाठी प्रोटीनयुक्त आहार म्हणजे दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे, सुखामेवा, मोड आलेली कडधान्ये खावीत. याशिवाय आहारात पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे यांचाही समावेश असावा.

नवीन केस येण्यासाठी व्हिटॅमिन-B7 म्हणजेच बायोटिन (Biotin) या घटकाची व ओमेगा-3 फैटी एसिडची आवश्यकता असते. अंड्यातील पिवळा भाग, प्राण्यांचे यकृत, मांस, मासे, मोड आलेली कडधान्ये व सुखामेवा यामध्ये बायोटिन घटक मुबलक असतो. तर बदाम, अक्रोड ह्यासारख्या सुख्यामेव्यात आणि मासे यामध्ये ओमेगा-3 फैटी एसिड मुबलक असते.

केमिकलयुक्त हेअर प्रॉडक्ट्सचा वापर करणे टाळावे..
शॅम्पूमध्ये सल्फेटसारखे रासायनिक घटक असतात. सल्फेटमुळे केसातील प्राकृतिक तेल निघून जाते त्यामुळे केस कोरडे व नाजूक बनतात. त्यामुळे केस अधिक प्रमाणात गळण्याची व केस तुटण्याची समस्या होत असते. यासाठी केमिकलयुक्त हेअर प्रोडक्टचा वापर करणे टाळा. यापेक्षा सौम्य किंवा हर्बल शॅम्पूचा वापर करू शकता.

वरील उपाय सातत्यपूर्ण करणे गरजेचे आहे. कारण गेलेले केस हळूहळू उगवून येत असतात. त्यामुळे नवीन केस येण्यासाठी काही दिवस ते महिन्यांचा कालावधीही लागू शकतो. अशावेळी योग्य आहार, तेल मालिश यासारखे उपाय सातत्यपूर्ण करीत राहिल्यास व मानसिक ताण न घेता, सकारात्मकता बाळगल्यास निश्चितच लवकर नवीन केस येण्यासाठी मदत होईल.

केस गळत असल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Written by - डॉ. सतीश उपळकर
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास येथे क्लिक करून आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल जरूर Subscribe करा.


सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...