आजकाल केस गळणे ही समस्या अगदी सामान्य झाली आहे. स्त्री असो वा पुरुष प्रत्येकजण या समस्येने त्रस्त आहेत. या लेखाच्या माध्यमातून आम्ही केस गळणे कमी करण्यासाठी उपाय सांगितले आहेत. ज्यायोगे आपले केस मजबूत होऊन केस गळणे कमी होईल.

केस गळणे कमी करण्यासाठी उपाय :

कांद्याचा रस..
केस गळणे कमी होण्यासाठी केसांच्या मुळांना कांद्याचा रस लावावा. अर्ध्या तासानंतर केस सौम्य शैम्पूने धुवावेत. कांद्याच्या रसात सल्फरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे केस मजबूत होऊन केस गळणे कमी होते.

मेथीच्या बिया..
मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत घालावेत. दुसर्‍या दिवशी सकाळी या बिया बारीक वाटून त्याची पेस्ट बनवावी. यात थोडे पाणी, दही आणि अंड्याचा पांढरा भाग घालून मिश्रण तयार करावी व ही पेस्ट आपल्या केसांवर लावावी. अर्ध्या तासानंतर केस पाण्याने धुवा. आठवड्यातून एकदा हा उपाय करू शकता.

कोरपड जेल..
केसांच्या मुळांशी एलोवेरा जेल लावून मसाज करावा व अर्ध्या तासानंतर केस धुवावेत. आठवड्यातून एकदा आपण हा उपाय करू शकता.

ऑलिव तेल..
ऑलिव तेलाने केसांना मालिश करणेही केस गळणे कमी होण्यासाठी उपयोगी ठरते. यामुळे केसांच्या मुळात योग्य प्रकारे रक्ताभिसरण होण्यास मदत होते आणि केसांची मुळे अधिक मजबूत होतात व केस गळणे कमी होते. 

जास्वंद..
काही जास्वंदाची फुले कुटून खोबऱ्याच्या तेलात घालून मिश्रण एकत्र करा. त्यानंतर हे तेल काही तासांसाठी केसांना लावावे त्यानंतर केस धुवावेत. जास्वंद केसांना पोषण देतात व केस गळणे कमी होते.

आवळा..
ताजे आवळे आणून ते उकडून त्यातील बिया काढून टाकाव्यात. त्यानंतर उरलेला आवळ्याचा गर खोबरेल तेलात घालून मिश्रण गरम करून घ्यावे. दररोज आपण हे आवळ्याचे गुणकारी तेल केसांना लावावे.

खोबरेल तेल आणि कापूर..
नारळाच्या तेलात कापूर मिसळून केसांना लावणे उपयोगी ठरते. यासाठी केस धुण्याआधी एक तास हे कापूर मिसळलेले तेल केसांना लावावे त्यामुळे केस गळणे कमी होते.

भृंगराज तेल..
हे आयुर्वेदिक तेल केस गळणे कमी करण्यासाठी खूप गुणकारी असते. यासाठी दररोज भृंगराज तेलाची मालिश केसांना करावी.

केस गळणे कमी होण्यासाठी काय काळजी घ्यावी..?

योग्य आहार घ्यावा..
अयोग्य आहारामुळेही केस गळतात. यासाठी योग्य संतुलित आहार घ्यावा. केसांच्या आरोग्यासाठी प्रोट्रीनयुक्त आहार खावा. आहारात दूध, दुधाचे पदार्थ, कडधान्ये, बदाम, हिरव्या पालेभाज्या, विविध फळे, मासे यांचा समावेश करावा.

पुरेसे पाणी प्या..
दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होऊन केसांची मुळे घट्ट होण्यास मदत होईल.

केसांची काळजी घ्या..
ओल्या केसांना रगडून पुसू नका. केस सुकल्यानंतर त्यावर कंगवा फिरवा. तसेच केसांमधून सतत हात फिरवू नये. जास्त गरम पाण्याने केस धुवू नये. कोमट केलेले तेल केसांना लावावे. मात्र जास्त गरम तेल केसांना लावू नका. मुख्य म्हणजे जाहिरात पाहून बाजारातील नवनवीन हेअर प्रोड्क्टसचा आपल्या केसांवर प्रयोग करणे टाळा.

नियमित व्यायाम करा..
व्यायामामुळे संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित होण्यास मदत होईल. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसावे. असे केल्याने शरीरास आणि केसांनाही व्हिटॅमिन-D मुबलक मिळेल. तसेच मानसिक ताणतणाव, डिप्रेशन यापासून दूर राहावे. यासाठी ध्यानधारणा करावी. नियमित व्यायाम करण्याचे फायदे जाणून घ्या..

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...