हाय ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी असा घ्यावा आहार – High blood pressure diet in Marathi

उच्च रक्तदाब आणि आहार – High BP diet plan :

उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लडप्रेशरची समस्या असल्यास योग्य आहार घेणे आवश्यक असते. येथे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी काय खावे, ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी कोणता आहार घ्यावा, काय खाऊ नये याविषयी माहिती खाली दिली आहे.

रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी असा घ्यावा आहार :

आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे यांचा समावेश असावा. रक्तदाब कमी करणारे लसूण, कांदा, आले, लिंबू, बदाम यांचा समावेश आहारात करावा. दररोज दोन लसूण पाकळ्या चावून खाव्यात. अशाप्रकारे आपण आल्याचा तुकडाही चावून खाऊ शकता.

हाय ब्लडप्रेशरचा त्रास असल्यास सोडिअमचे प्रमाण कमी करून तर पोटॅशियम असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. दूध, दही, केळी , जर्दाळू, एवोकॅडो, संत्री, मनुका, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या, पालक, मासे अशा अनेक पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे उच्च रक्तदाब असल्यास वरील पदार्थ आहारात असावेत.

तसेच दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होतो, रक्तातील अशुद्धी दूर होते, लघवीस साफ होऊन किडनीचे आरोग्यही चांगले राहते पर्यायाने रक्तदाब आटोक्यात राहतो.

हाय ब्लड प्रेशर असल्यास खालील पदार्थ खाणे टाळावे :

हाय ब्लड प्रेशरमध्ये चरबीजन्य पदार्थ, तेला-तुपाचे पदार्थ, फास्टफूड, जंकफूड, खारट पदार्थ, लोणची, पापड, मैद्याचे पदार्थ, साखरेचे पदार्थ खाणे टाळावे. चहा, कॉफीही वारंवार पिणे टाळावे. वरील पदार्थांमुळे अधिक वजन वाढत असते.

उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास मीठाचे प्रमाण कमी करावे. एका दिवसामध्ये 2.5 gm (2500 mg) पेक्षा अधिक मिठाचे सेवन करू नये. यासाठी जेवनाव्यतिरिक्त खाद्य पदार्थांच्या पाकीटावरील सोडियमचे प्रमाण तपासावे.

हाय बीपी असल्यास विविध प्रकारच्या व्यसनांपासूनही दूर राहावे. कारण मद्यपान, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांमुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्याबरोबरच हाय ब्लडप्रेशरची समस्याही होत असते. हाय ब्लडप्रेशर असल्यास सिगारेटचे व्यसन करणे अत्यंत धोकादायक असून यामुळे हार्ट अटॅक, लकवा याचा धोका वाढतो. यासाठी ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी व्यसन करणे ठाळावे.
© लेखक- डॉ. सतीश उपळकर
(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

हे सुद्धा वाचा..
हार्ट अटॅकपासून दूर राहण्यासाठी कोणती काळजी घ्यावी ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.