हाय ब्लड प्रेशर म्हणजे काय..?

हाय ब्लडप्रेशर किंवा हायपरटेन्शन (Hypertension) याला “साइलेंट किलर” असेही म्हणतात. कारण हाय ब्लडप्रेशर हा शरीरात छुप्या शत्रूप्रमाणे राहतो आणि त्यामुळे हार्ट अटॅक, लकवा (स्ट्रोक) किंवा किडन्या निकामी होण्याचा धोका निर्माण होत असतो. अनेक लोकांना हाय ब्लडप्रेशरची समस्या असते.

नॉर्मल ब्लडप्रेशर हे 120/80 mm hg इतके असून त्यापेक्षा अधिक BP असल्यास त्याला हाय ब्लडप्रेशर असे म्हणतात. हाय ब्लडप्रेशर वर वेळीच योग्य उपचार करणे गरजेचे असते. निरोगी जीवनशैली, योग्य आहार, व्यायाम यांचा अवलंब करून अगदी सहजरीत्या ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवता येणे शक्य आहे.

बी पी कमी करण्यासाठी हे करा उपाय :

नियमित व्यायाम करा –
नियमित व्यायामाने शरीरात रक्तसंचारण व्यवस्थित होते, आपले हृदय मजबूत होते आणि कमी प्रयत्नांनीही हृदय रक्त पंप करू लागते. त्यामुळे आपल्या रक्तवाहिन्यावर कमी दबाव येतो त्यामुळे ब्लडप्रेशर आटोक्यात राहण्यास मदत होते. यासाठी दररोज 40 मिनिटे व्यायामासाठी द्यावीत. व्यायामात चालणे, पळणे, पायऱ्या चढणे, सायकलिंग, स्विमिंग, मैदानी खेळ असे व्यायाम करावेत.

वजन आटोक्यात ठेवा –
वजन जास्त असल्यामुळेही ब्लडप्रेशर वाढत असते. यासाठी वजन जास्त असल्यास ते कमी करावे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करावा, योग्य आहार घ्यावा.

योग्य आहार घ्यावा –
आहारातील तेला-तुपाचे पदार्थ, फास्टफूड, जंकफूड, खारट पदार्थ, लोणची, पापड, चरबीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ खाणे टाळावे. चहा, कॉफीही वारंवार पिणे टाळावे.

आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे यांचा समावेश असावा. केळी, मनुका, पालक भाजी यासारख्या पोटॅशियम मुबलक असणाऱ्या आहाराचा समावेश करावा.

मीठाचे प्रमाण कमी करा –
हाय ब्लड प्रेशराचा त्रास असल्यास आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे. एका दिवसामध्ये 2.5 gm (2500 mg) पेक्षा अधिक मिठाचे सेवन करू नये. यासाठी जेवनाव्यतिरिक्त खाद्य पदार्थांच्या पाकीटावरील सोडियमचे प्रमाणही तपासावे.

पुरेसे पाणी प्यावे..
दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होतो, रक्तातील अशुद्धी दूर होते, लघवीस साफ होऊन किडनीचे आरोग्यही चांगले राहते पर्यायाने ब्लडप्रेशर आटोक्यात राहतो.

तणावापासून दूर राहा –
मानसिक तणाव, राग, क्रोध यामूळे ब्लड प्रेशरमध्ये 20 ते 30 mm Hg पर्यंत वाढ होते. यासाठी नियमित तणाव रहित राहावे. मानसिक तणावापासून दूर राहाण्यासाठी ध्यान-धारणा करावे. तसेच पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी. जागरण करणे टाळावे.

व्यसनांपासून दूर राहा –
धूम्रपान, सिगारेट, तंबाखू, मद्यपान अशा घातक व्यसनांमुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्याबरोबरच हाय ब्लड प्रेशराची समस्याही होत असते. ब्लडप्रेशर अधिक असल्यास सिगारेटचे व्यसन करणे अत्यंत धोकादायक असून यामुळे हार्ट अटॅक, लकवा याचा धोका वाढतो. यासाठी ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी व्यसन करणे ठाळावे.

ब्लडप्रेशर कमी करण्याचे हे आहेत घरगुती आयुर्वेदिक उपाय :

लसूण –
ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज सकाळी लसणीच्या दोन पाकळ्या चावून खाव्यात. लसणीमुळे रक्तातील बॅड कोलेस्टेरॉल कमी होते व धमनीकठिण्यता हा विकार होत नाही. आहारातही लसूणचा वापर वाढवावा. लसूण पाकळ्यांचे बारीक तुकडे करून 5 मिनिटे तशाच ठेवाव्यात त्यानंतरचं ते तुकडे खावेत. असे करण्याने लसूण मधील ब्लडप्रेशर नियंत्रित करणारा Alliinase हा उपयुक्त घटक त्यामधून मिळतो.

कांदा –
अर्धा चमचा कांद्याचा रसात अर्धा चमचा मध मिसळावे. हे मिश्रण सकाळी व रात्री या मिश्रणाचे चाटण करावे. कांद्याच्या रसात Quercetin हे अँटीऑक्सिडंट असते त्यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रित होण्यास मदत होते.

आले –
ब्लडप्रेशर कमी करण्यासाठी दररोज आल्ल्याचा छोटासा तुकडाही खाऊ शकता.

लिंबू रस –
कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळून ते पाणी सकाळी उपाशीपोटी प्यावे. यामुळे रक्तवाहिन्या लवचिक होतात आणि ब्लडप्रेशर कमी होण्यास मदत होते.

बदाम –
ब्लडप्रेशर नियंत्रित करण्यासाठी रात्रभर भिजवलेले बदाम सकाळी सोलून खाऊ शकता. यामुळे वाईट कोलेस्टेरॉल कमी होतो आणि हाय ब्लड प्रेशरही आटोक्यात राहते.

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुद्धा वाचा..
हार्ट अटॅकपासून दूर राहण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...