गरोदरपणात रक्त का वाढले पाहिजे?
गरोदरपणामध्ये रक्ताल्पता (ऍनिमिया) होण्याची संभावना असते. रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी झाल्याने रक्ताल्पता होत असते. गरोदरपणात रक्ताचे खूप महत्वाचे कार्य असते. गर्भाचे पोषण आईच्या रक्तातूनच नाळेमधून होत असते. त्यामुळे गरोदरपणात आईच्या शरीरात पुरेसे रक्त वाढणे आवश्यक असते.
प्रेग्नन्सीत रक्त कमी असल्यास होणाऱ्या समस्या :
प्रेग्नन्सीमध्ये रक्त किंवा हिमोग्लोबिन कमी असल्यास अनेक गुंतागुंत होत असते. यामुळे ऍनिमियाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे गरोदर स्त्रीला गर्भारपणात जास्त थकवा जाणवतो, चक्कर येऊ शकते तसेच मुदतपूर्व प्रसुती होणे, बाळाची वाढ कमी होणे, अशक्त बाळ जन्माला येणे, बाळाची जन्मानंतरची वाढ मंदगतीने होणे अशा समस्या होत असतात.
याशिवाय प्रसुतीदरम्यान अतिजास्त रक्तस्राव होऊन स्त्रीला अपाय होऊ शकतो. प्रसुतीनंतर नैराश्य येते. अपंग, मतिमंद बाळ जन्माला येऊ शकते. त्यामुळे रक्त वाढीचे खूप महत्त्व गर्भावस्थेत असते.
गरोदरपणात रक्त वाढीसाठी घ्यायचा आहार :
गरोदरपणात रक्त वाढवण्यासाठी लोहयुक्त आहार घेणे आवश्यक असते. लोहाच्या कमतरतेमुळे रक्ताल्पता किंवा रक्तपांढरी (अॅनिमिया) होत असतो. त्यामुळे गरोदरपणात लोहयुक्त आहार घेतल्यास हिमोग्लोबिन आणि रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होत असते.
गरोदरपणात रक्त व हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काय खावे?
गरोदरपणात पालक, ब्रोकोली ह्या हिरव्या पालेभाज्या तसेच मटण, अंडी, मासे, तीळ, खजूर, गूळ यांचा आहारात समावेश करावा. यामध्ये लोहाचे (आयर्नचे) मुबलक प्रमाण असते. त्याबरोबरच व्हिटॅमिन-C असणारी संत्री, मोसंबी, आवळा अशी फळे खावीत. व्हिटॅमिन-C मुळे आहारातील लोह शरीरात अवशोषित होण्यास मदत होते.
डॉक्टरांनी दिलेल्या लोह आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या घ्या.
गरोदरपणात लोह आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या डॉकटर देत असतात. गरोदर स्त्रीने त्या गोळ्या खाल्या पाहिजेत. त्यामुळे रक्त आणि Hb वाढण्यास मदत होते.
योग्य आहार आणि डॉक्टरांनी दिलेली औषधे घेतल्यास गरोदरपणात रक्त वाढण्यास मदत होते.
हे सुद्धा वाचा – गरोदरपणात कोणता आहार घ्यावा ते जाणून घ्या.
Read Marathi language article about Hemoglobin (Hb) and Blood increase food during pregnancy. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.