गरोदरपणात आई जो आहार घेत असते त्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे गरोदरपणात बाळाच्या आरोग्याचा विचार करून काळजीपूर्वक योग्य आहार घेणे गरजेचे असते.
प्रेग्नन्सीत गरोदर स्त्रीने हे पदार्थ काय खाऊ नयेत :
चरबी वाढवणारे पदार्थ खाणे टाळा..
तेलकट, तुपकट पदार्थ, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, साखरेचे पदार्थ, केक, चॉकलेट, मिठाई, फास्टफूड, जंकफूड असे चरबी व अनावश्यक वजन वाढवणारे पदार्थ प्रेग्नन्सीत खाणे टाळले पाहिजेत. यामुळे गरोदरपणात अनावश्यक वजन वाढत असते तसेच त्यामुळे गरोदरपणातील मधुमेह होण्याचा धोकाही वाढतो. गरोदरपणातील मधुमेहाविषयी अधिक माहिती जाणून घ्या..
दूषित पदार्थ खाणे टाळा..
बाहेरील उघड्यावरील, माशा बसलेले पदार्थ जसे बटाटेवडा, भजी, पुरीभाजी, पाणीपुरी, शेवपुरी, चायनीज पदार्थ असे दूषित पदार्थ खाणे टाळावे. गरोदरपणात फिल्टरचे पाणी किंवा उकळवून गार केलेले पाणी प्यावे. बाहेर पाणी पिऊ नये. दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार होण्याचा धोका असतो.
स्वच्छ धुतल्याशिवाय फळे, भाज्या खाऊ नये..
बाजारातील फळे, भाज्या यांच्यावर हानिकारक केमिकल, कीटकनाशके फवारलेली असतात. त्यामुळे फळे, भाज्या स्वच्छ धुतल्याशिवाय खाऊ नयेत. मोड आलेली कडधान्येही कच्ची खाऊ नयेत. कारण त्यामध्ये साल्मोनेला, लिस्टेरिया आणि ई-कोलाईसारखे बॅक्टेरिया असू शकतात. त्यामुळे गर्भवतीला उलट्या किंवा अतिसाराची तक्रार होऊ शकते.
कच्चे मांस व कच्चे अंडे खाऊ नये..
कच्चे मांस किंवा अर्धवट शिजलेले मांस खाण्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये कच्चे मांस खाणे टाळा. तसेच कच्ची अंडी खाण्यामुळे साल्मोनेला इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. या इन्फेक्शनमुळे गर्भवती स्त्रीला उलट्या आणि अतिसार असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी कच्ची अंडी खाऊ नयेत.
कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन करू नये..
गरोदरपणात कॅफिनयुक्त पदार्थ कमी प्रमाणात घेण्याची सूचना डॉक्टर करतात. प्रामुख्याने चहा, कॉफी आणि चॉकलेटसारख्या पदार्थांमध्ये कॅफिन आढळते. चहा, कॉफी वारंवार पिण्यामुळे गर्भाची वाढ योग्यरीत्या होत नाही व कमी वजनाचे बाळ जन्माला येऊ शकते. तसेच जास्त प्रमाणात कॅफिन शरीरात गेल्यास गर्भपात होण्याचा धोका वाढतो.
व्यसनी पदार्थांपासून दूर राहा..
गरोदर महिलांनी अल्कोहोल, दारू, बिअर, तंबाखू, सिगारेट, बिडी अशा व्यसनांपासून दूर राहावे. व्यसनांचा गर्भावर खूप वाईट परिणाम होत असतो. यांमुळे गर्भाच्या मेंदू आणि शारीरिक विकासास अडथळा येतो. त्यामुळे गर्भपात होण्याचा धोकाही वाढतो. त्यामुळे प्रेग्नन्सीत व्यसनी पदार्थांपासून दूर राहावे. तसेच ‘सेकंडहँड स्मोक’ म्हणजे दुसरी व्यक्ती सिगारेट धूम्रपान करीत असताना त्या घातक धुराच्या संपर्कात गरोदर स्त्रीने राहू नये.
पाऱ्याचे प्रमाण अधिक असणारे मासे खाणे टाळावे..
गरोदरपणात मासे खाणे खूप फायदेशीर असते. मात्र ज्या माशांमध्ये पारा जास्त असतो अशा प्रकारचे मासे गरोदरपणात खाऊ नयेत. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये स्पॅनिश मॅकेरल, मार्लिन, किंग मॅकेरल आणि टेलिफिश यासारखे मासे खाणे टाळावे. पारा जास्त असणारे मासे खाल्ल्याने गर्भाच्या विकासास बाधा येते.
गरोदरपणात कच्चा पपई खाऊ नये..
गर्भधारणेदरम्यान कच्चा पपई खाणे टाळावे. कारण कच्च्या पपईत असंणारे केमिकल गर्भाला हानी पोहोचवू शकते. म्हणूनच गरोदरपणात कच्चा पपई खाणे टाळा.
Last Medically Reviewed on February 17, 2024 By Dr. Satish Upalkar.