हृदयविकाराचा झटका येणे – Heart attack :

हृदयविकाराचा झटका येणे अर्थात हार्ट अटॅकचे प्रमाण आज सर्वच वयोगटातील लोकांमध्ये प्रचंड वाढलेले आहे. बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, मानसिक तणाव अशा अनेक कारणांनी आज अगदी वयाच्या तिशीमध्येही हार्ट अटॅक आलेला दिसत आहे. त्यामुळे सर्वांनीच हार्ट अटॅक विषयी माहिती जाणून घेऊन त्यापासून दूर राहण्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक बनले आहे.

कोणास येऊ शकतो हार्ट अटॅक (risk factors) :

  • वयाच्या 25 वर्षानंतरच्या व्यक्ती,
  • लठ्ठपणा, डायबेटीसचे रुग्ण, धमनीकाठिन्यता, हाय ब्लडप्रेशर, हाय ब्लड कोलेस्टेरॉल, मानसिक तणाव या समस्या असणाऱ्या लोकांमध्ये,
  • ‎हृद्यविकारासंबंधी अनुवंशिकता असणे, कुटुंबातील आजोबा, आजी, आई, वडील, भाऊ किंवा बहीण यापैकी कोणाला हार्ट अटॅक आलेला असल्यास आपणासही हार्ट अटॅकचा धोका असतो.
  • सिगारेट (धुम्रपान), मद्यपान, तंबाखु, अमली पदार्थ इ. च्या व्यसनाधीन व्यक्तींमध्ये हृद्य विकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो.

हार्ट अटॅक का व कशामुळे येतो..?

कोरोनरी धमनीद्वारे हृद्यास रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. जेंव्हा हृदयाला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणांनी अडथळा निर्माण होऊन हृदयाचा रक्तपुरवठा खंडीत होतो व त्यामुळे हृदयाचे स्नायू (Heart Muscles) निकामी होतात तेंव्हा हार्ट अटॅक म्हणजेच हृद्यविकाराचा झटका येतो.

हार्ट अटैक खालील चार स्थितींमुळे येऊ शकतो..

(1) धमनीकठिण्य किंवा अॅथोरोक्लेरोसिस (Atherosclerosis) –
धमनीकाठीन्यता हे हृद्यविकाराचे प्रमुख कारण बनत आहे. यामध्ये हृदयास रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतीभोवती चरबी, कोलेस्टेरॉल व तत्सम पदार्थांचा संचय होतो व त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद बनतात, त्यातील पोकळी कमी होते. त्यामुळे हृद्यास होणाऱया रक्त आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यास बाधा निर्माण होते त्यामुळे ऑक्सिजन आणि रक्ताच्या कमतरतेमुळे हृद्याचे स्नायुमधील पेशी मृत होऊ लागतात परिणामी हार्ट अटॅक येतो.

उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणाव, धूम्रपान-मद्यपान ह्यासारखी व्यसने यासारखी कारणे धमनीकठिण्यता (अॅथोरोक्लेरोसिस) निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात.

(2) रक्ताची गुठळी होणे –
काहीवेळा हृदयास रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये अचानक रक्ताची गुठळी तयार होते. त्या गुठळीच्या अडथळ्यामुळे हृदयास योग्यरीत्या रक्तपुरवठा होत नाही परिणामी हार्ट अटॅक येतो. अशा प्रकारे झटका येण्याचे प्रमाण तरुण वयामध्ये जास्त आहे.

(3) काहीवेळेस रक्तातील गुठळी रक्तप्रवाहाबरोबर हृदयास रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये जाऊनही अडथळा निर्माण करते.

(4) हृदयास रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी अचानक आंकुचन पावल्यामुळेही हृदयाचा रक्तपुरवठा खंडीत होऊ शकतो.

हार्ट अटॅक येण्याची कारणे (Causes) :

प्रामुख्याने बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, धकाधकीचे जीवन, मानसिक ताणतणाव आणि अयोग्य आहारामुळे आज हृद्यविकार पंचविशीमध्येही आढळत आहे. त्यातही धमनीकाठीन्यता हे हृद्यविकाराचे प्रमुख कारण बनले आहे. यामध्ये हृदयास रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतीभोवती चरबी, कोलेस्टेरॉल व तत्सम पदार्थांचा संचय होतो व त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद बनतात, त्यातील पोकळी कमी होते. त्यामुळे हृद्यास होणाऱया रक्त आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यास बाधा निर्माण होते त्यामुळे ऑक्सिजन आणि रक्ताच्या कमतरतेमुळे हृद्याचे स्नायुमधील पेशी मृत होऊ लागतात परिणामी हार्ट अटॅक येतो.

हार्ट अटॅकला सहाय्यक ठरणारी अन्य कारणे :

  • कुटुंबामध्ये हृद्यविकारासंबंधी अनुवंशिकता असणे,
  • मधुमेह, धमनीकठिण्यता, उच्च रक्तदाब असे आजार असणे,
  • ‎रक्तातील बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असणे,
  • वजन जास्त असणे,,
  • ‎बैठी जीवनशैली,
  • व्यायामाचा व शारीरिक श्रमाचा अभाव,
  • ‎धावपळीचे जीवन, मानसिक ताणतणाव,
  • ‎चरबीयुक्त पदार्थ, तेलकट, खारट, सॅच्युरेटेड फॅट्स असलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ, केक, मिठाई असा चुकीचा आहार वारंवार खाण्यामुळे,
  • ‎जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, तंतूमय पदर्थ, फळे कमी खाण्याची सवय,
  • ‎तंबाखू, सिगारेट, अल्कोहोल यासारखी व्यसने करणे, ही सर्व करणे हार्ट अटॅक येण्यासाठी जबाबदार ठरतात.

हार्ट अटॅकची लक्षणे (Heart attack symptoms) :

अचानक छातीत वेदना सुरु होणे हे हार्ट अटॅकचे प्रमुख लक्षण आहे. छातीत होणाऱ्या त्या वेदनांना Angina (हृद्यशूल) असे म्हणतात. हार्ट अटॅक येण्यापूर्वीची संकेत व लक्षणे खालील खालीलप्रमाणे असतात.

  • छातीत दडपल्यासारखे वाटते,
  • ‎छातीत दुखायला लागते,
  • ‎छातीच्या मध्यभागापासून वेदनांची सुरवात होते. नंतर त्या वेदना मान, खांदा, हनुवटी, डावा हात यांपर्यंत पोहचतात.
  • ‎बैचेन व अस्वस्थ होणे, भीती वाटणे,
  • ‎अचानक जास्त प्रमाणात घाम येणे.
  • ‎अशक्तपणा जाणवणे,
  • ‎उलटी किंवा मळमळ होणे,
  • ‎चक्कर येणे,
  • ‎दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे,
  • ‎श्वास जोरजोरात घ्यावा लागणे ही लक्षणे हार्ट अटॅकमध्ये जाणवतात.

हार्ट अटॅक आल्यावर काय करावे?

  • धावपळ व जास्त हालचाल करू नका.
  • ‎आपल्या मदतीसाठी कोणाला तरी बोलावून घ्यावे.
  • ‎अॅस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट ही गोळी जवळ असतील तर ती गोळी घेऊन जिभेखाली ठेवावी. या गोळ्यांमुळे रक्त पातळ होते व रक्तवाहिन्यातील अडथळा दूर होतो. त्यामुळे ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा हृद्याच्या स्नायुंना होतो.
  • ‎तातडीने 108 ह्या नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी.

जर पेशंट बेशुद्ध असल्यास तातडीने 108 ह्या नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी आणि रुग्णावर सीपीआर उपाय करावेत. यामध्ये पेशंटला दुसरी एखादी व्यक्ती आपल्या तोंडाने कृत्रिम श्वासोच्छवास देते व बाहेरून हृदयाला छातीवर दाब दिला जातो. रुग्णवाहिका येइपर्यंत हे उपाय करत राहावेत. त्यामुळे पेशंटला जीवदान मिळू शकते. प्रत्येकाने CPR उपाय कशाप्रकारे करावेत हे डॉक्टरांकडून समजून घ्यावेत.

हार्ट अटॅकमुळे होणारे दुष्परीणाम (complications) :

हार्ट अटॅकमुळे अकाली मृत्यु होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच हार्ट अटॅक आल्याने उपद्रव स्वरुपात अनेक गंभीर विकार उद्भवतात. यांमध्ये,

हृदयाचे आरोग्य तपासण्यासाठी खालील तपासण्या करतात :

  • इलेक्ट्रोकार्डीयोग्राम ECG किंवा EKG
  • ‎स्ट्रेस टेस्ट
  • ‎2D इकोकार्डिओग्राफी
  • अँजिओग्राफी
  • ‎रक्तदाब तपासणी, कोलेस्टेरॉल चाचणी, ब्लड शुगर तपासणी या शिवाय हृदयाला झालेली इजा समजण्यासाठी आता स्ट्रेस थॅलीनम, पेट स्कॅन किंवा MRI सारख्या तपासण्याही कराव्या लागू शकतात.

हार्ट अटॅक आणि उपचार (treatments) :

अँजिओप्लास्टी (स्टेंट बसवून) आणि बायपास सर्जरी ह्या दोन उपचार पध्दती हार्ट अटॅकवर उपलब्ध आहेत.
हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गाठ निर्माण होते किंवा रक्तवाहिन्यांचा मार्ग अरुंद बनल्यामुळे हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्याने रुग्णाला हृदयविकाराचा झटका येतो किंवा येण्याची शक्यता असते.

अशा वेळी तातडीने रक्तवाहिनीतील अडथळा दूर करण्यासाठी आपले डॉक्टर निदान करून रुग्णाची स्थिती, गुंतागुंतीची शक्यता विचारात घेऊन अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करण्याचा निर्णय घेतील. अँजिओप्लास्टी करणे अजिबातच शक्य नसते किंवा धोक्याचे असते तेंव्हा तसेच अनेक ठिकाणी ब्लॉकेज असल्यास त्या रुग्णांमध्ये बायपासचा निर्णय घेतला जातो.

अँजिओप्लास्टी (Angioplasty) –

यामध्ये गुठळी झालेल्या रक्तवाहिनीत एक गाईड वायर ढकलली जाते आणि या वायरवरून एक फुगा जाऊन गुठळी असलेल्या ठिकाणी तो फुगवला जातो त्यामुळे गुठळीच्या ठिकाणी असलेले फॅटी पदार्थ चपटे होऊन रक्तवाहिनीच्या बाजूला सरकतात, रक्तवाहिनीची अरुंद झालेली पोकळी मोठी केली जाते. त्यामुळे धमनीतील अडथळा दूर होऊन हृद्याचा रक्तप्रवाह सुधारतो.

स्टेंट बसविणे –

अरुंद झालेली रक्तवाहिनी केवळ अँजिओप्लास्टी करून बाजुला सारल्यास कालांतराने तेथे पुन्हा फॅटी पदार्थ जमा होण्याचा धोका असतो. त्यामुळे अँजिओप्लास्टी करतानाच रक्तवाहिनीत असलेला अडथळा काढून तेथे स्टेंट टाकावी जाते. स्टेंट म्हणजे एक प्रकारची स्प्रिंग असते. रक्तवाहिनीतील अडथळा किती मोठा आहे, त्यावर स्टेंटची लांबी निश्‍चित केली जाते.

यासाठी एका फुग्याद्वारे अँजिओप्लास्टी करून रक्तवाहिनी फुगवली जाते त्यांनतर दुसऱ्या एका फुग्यावर बसवलेला स्टेंट त्या रक्तवाहिनीत आत ढकलला जातो. हा फुगाही गुठळीच्या जागी फुगवला जातो आणि त्यावरील स्टेंट उघडली जाते. यामुळे रक्तवाहिनीच्या बाजूला सरकवले गेलेले फॅटी पदार्थ रक्तवाहिनीच्या आत जमा होण्यास अटकाव होतो.

बेअर मेटल आणि ड्रग इल्युटिंग असे ‘स्टेंट’चे दोन प्रकार आहेत. बेअर मेटल स्टेंटमुळे रक्तपेशी त्या स्टेंटच्या ठिकाणी जमा होऊन गुठळी बनण्याची शक्यता असते त्यामुळे आजकाल ‘ड्रग इल्युटिंग’ प्रकारचे ‘स्टेंट’ मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतात. ड्रग इल्युटिंग स्टेंटमधील औषधी घटकांमुळे रक्तपेशी या स्टेंटमध्ये जमा होत नाहीत. एकदा बसविलेला स्टेंट हा साधारण दहा ते पंधरा वर्षे चालतो.

अँजिओप्लास्टीसह स्टेंट बसवण्यासाठी रुग्णाला केवळ 3-4 दिवसच हॉस्पिटलमध्ये राहावे लागते. आणि पुढील आठवडा विश्रांती घेऊन रुग्ण पूर्वी प्रमाणे आपली दैनदिन कामे करू शकतो. डॉक्टरांनी दिलेली औषधे चालू ठेवावीत. त्यांच्या सल्ल्यानुसार आहार, विहार, व्यायामाचे नियोजन ठेवावे व नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

बायपास सर्जरी (Bypass surgery) –

अनेक ठिकाणी ब्लॉकेज असल्यास बायपास सर्जरीचा अवलंब केला जातो. यामध्ये हृद्याच्या स्नायुंना रक्तपुरवठा करण्यासाठी नवीन रक्तवाहिन्या जोडल्या (ग्राफ्ट केल्या) जातात. नवीन रक्तवाहिन्या म्हणून छातीच्या आतमधील इंटर्नल मॅमरी ही रक्तवाहिनी ही जास्त प्रमाणात वापरली जाते. याशिवाय हाता किंवा पायातील रक्तवाहिन्यासुद्धा वापरली जाते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज बायपास शस्त्रक्रिया खूप सोपी आणि सहज झाली आहे. पूर्वीइतका वेळ आणि त्रास होत नाही. बायपास सर्जरीच्या ओपन हार्ट सर्जरी आणि बीटिंग हार्ट सर्जरी अशा दोन पद्धती आहेत.

नवीन रक्तवाहिनी जोडण्यासाठी बायपासमध्ये शस्त्रक्रिया करून रुग्णाची छाती उघडी करून तिथले हाड कापले जाते व नवीन रक्तवाहिनी जोडली जाते. किती ग्राफ्ट टाकतो आणि गुंतागुंत किती आहे यावर शस्त्रक्रियेचा वेळ अवलंबून असतो. बायपास सर्जरी साधारण 4-6 तासामध्ये पूर्ण होते. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात दोन ते तीन दिवस ठेवले जाते.

त्यानंतर दहा-बारा दिवस रुग्णाला हॉस्पिटलमध्ये राहावे लागते आणि पुढे महिनाभर रुग्णाने विश्रांती घेणे आवश्यक असते. बायपास शस्त्रक्रियेनंतर हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे रुग्ण जीवन व्यवस्थित जगू शकतो. दीड-दोन महिन्यानंतर आपल्या कामावर, नोकरीवर जाऊ शकतो. त्यानंतर डॉक्टरांनी दिलेली औषधे चालू ठेवावीत. त्यांच्या सल्ल्यानुसार आहार, विहार, व्यायामाचे नियोजन ठेवावे व नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. एकदा केलेली बायपास सर्जरी ही साधारण दहा ते बारा वर्षे व्यवस्थित कार्य करील.

हृदयविकाराचा झटका येऊ नये यासाठी हे करावे उपाय :

निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्यास हार्ट अटॅकपासून बचाव करणे शक्य आहे. यासाठी आपल्या हृदयाची काळजी घेण्यासाठी खालील हेल्दी टिप्सचे पालन करावे.

  • धूम्रपान, मद्यपान करू नका.
  • संतुलित व आरोग्यदायी आहार घ्या.
  • आहारात हिरव्या पालेभाज्या, विविध फळे, कडधान्ये, सुखामेवा यांचा आवर्जून समावेश करा.
  • चरबी व कोलेस्टेरॉल वाढवणारे पदार्थ खाणे टाळा.
  • दररोज व्यायाम करा.
  • सकाळी व संध्याकाळी फिरण्यास जावे.
  • पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी.
  • वजन आटोक्यात ठेवा.
  • मधुमेह असल्यास ब्लडशुगर नियंत्रणात ठेवा.
  • हाय ब्लडप्रेशर असल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेवा.
  • मानसिक ताण घेऊ नका.

अशी काळजी घेतल्यास हार्ट अटॅक येण्यापासून दूर राहता येणे शक्य आहे.

हे सुद्धा वाचा..
मधुमेह होण्याची कारणे लक्षणे व उपचार याविषयी अधिक माहिती जाणून घ्या.

Read Marathi language article about Heart attack Causes, Symptoms, diagnosis and Treatments. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Join the Conversation

6 Comments

  1. Thanks Doctor for Detailed and vary useful information about Heart attack.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *