केस जाड होण्यासाठी हे करा घरगुती उपाय – (Home remedies for Thick Hair in Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

केस जाड का असावे लागतात..?

जर केसांचा आकार पातळ असल्यास केस कमजोर होऊन सहज तुटत असतात. याशिवाय केसांचा आकार पातळ झाल्यामुळे केस गळतीचे प्रमाणही वाढते. अनेक कारणांनी केसांचा आकार पातळ होत असतो. जसे शारीरिक आजार, मानसिक तणाव, हार्मोन्समधील असंतुलन, पोषकतत्वांची कमतरता, प्रदूषण, एलर्जी, हेअर प्रोडक्टचा अतिवापर किंवा केसांची योग्य देखभाल न करणे यांमुळे केसांचा आकार पातळ होऊ शकतो.

अशावेळी पातळ झालेल्या केसांचा आकार जाड होण्यासाठी उपाय करणे आवश्यक असते. यासाठी याठिकाणी आपले केस जाड होण्यासाठी उपाय येथे दिले आहेत. या सोप्या घरगुती उपायांनी आपले केस जाड आणि मजबूत होण्यास मदत होईल.

केस जाड होण्यासाठी हे करा घरगुती उपाय :

अंड्याचा हेअरमास्क –
केसांना जाड, मजबूत आणि घनदाट होण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते. अंडी हे प्रोटिन्सचा उत्तम स्त्रोत असून यासाठी उपयुक्त ठरते. यासाठी दोन अंडे फोडून त्यातील पिवळा भाग काढून टाकावा. अंड्यातील पांढऱ्या भागाचा थर केसांना लावावा. 30 मिनिटांनी केस धुवून घ्यावेत. यामुळे केस जाड, मजबूत व घनदाट ही होतात. अंड्याच्या हेअर मास्कचा वापर आठवड्यातून एकदा करावा.

ऑलिव्ह ऑइल –
ऑलिव्ह ऑइल केसांसाठी हेअर टॉनिक प्रमाणे कार्य करत असून यामुळे केस जाड, मजबूत व घनदाट होतात. रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑइल थोडे कोमट करून ते केसांच्या मुळांशी लावून मसाज करावा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अंघोळ करताना केस धुवावेत. आठवड्यातून एक ते दोनवेळा हा उपाय करू शकता.

मेथीच्या बिया –
रात्रभर मेथीच्या बिया पाण्यात भिजत घालाव्यात. सकाळी उठल्यावर भिजलेल्या मेथी बिया बारीक वाटून त्यांची पातळ पेस्ट करून केसांना लावावी आणि 15 मिनिटांनंतर अंघोळ करताना केस धुवावेत. यांमुळेही केस जाड व मजबूत होण्यास मदत होते. आठवड्यातून एक ते दोनवेळा हा उपाय करू शकता.

आवळा –
आवळा पावडर आणून ती कोमट केलेल्या खोबरेल तेलात मिसळून एका स्टीलच्या डब्यात साठवून ठेवावी. हे आवळा असलेले तेल रोज रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या मुळांशी लावून मसाज करावा. यांमुळेही केस जाड व मजबूत होण्यास मदत होते.

केस जाड होण्यासाठी काय करावे व काय करू नये.?

केसांना तेलाने मालिश करा..
केसांच्या मुळांशी तेल मालिश केल्याने त्याठिकाणी रक्त संचरण (blood circulation) व्यवस्थित होण्यास खूप मदत होते. तेलामुळे केसांना आवश्यक पोषकघटक मिळतात आणि केसांचं खोलवर पोषण होऊन केसांचे आरोग्य सुधारते.

तेल मालिशमुळे केसांची रोमछिद्र (folicles) मोकळी होतात त्यामुळे पातळ झालेले केस जाड होण्यास मदत होते. केसांची तेल मालिश करण्यासाठी खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल किंवा बदाम तेलाचा वापर करावा. यासाठी वरील कोणतेही तेल कोमट करून ते केसांच्या मुळांशी लावून मालीश करावी.

हेअर प्रॉडक्ट्सचा अतिवापर टाळावा..
केमिकलयुक्त हेअर प्रॉडक्ट, स्ट्रेटनर्स, शॅम्पू, कलर्स यांचा अतिवापरामुळे केस डॅमेज होत असतात. दररोज केसांना शॅम्पू केल्यामुळे केसांच्या मुळातील (स्कैल्पमधील) नॅचरल ऑइल निघून जात असते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

वास्तविकता केसांच्या मुळात असणारे ऑइल हे केसांच्या आरोग्यासाठी खूप उपयोगी असते. त्यामुळे दररोज केसांना शॅम्पू करू नये. आठवड्यातून 3 ते 4 वेळाच सौम्य किंवा हर्बल शॅम्पूचा वापर करावा. तसेच शॅम्पू केल्यानंतर केस तुटू नयेत यासाठी कंडिशनर जरूर करावे.

केस धुताना काळजी घ्या..
केस वारंवार धुण्यामुळे केसातील नॅचरल ऑइल निघून जात असते. त्यामुळे केस रुक्ष, कोरडे व कमजोर होत असतात. यासाठी केस दररोज न धुता आठवड्यातून 3 ते 4 वेळाच धुवावेत. केस धुण्यासाठी जास्त गरम पाणी वापरणे टाळावे.

Web title – Natural Home remedies for Thick Hair in Marathi.