
स्थानभ्रष्ट गर्भधारणा म्हणजे काय..?
गरोदरपणात ‘एक्टोपिक प्रेग्नन्सी’ ही एक गंभीर अशी स्थिती असून यामध्ये गर्भधारणा ही गर्भाशयात होण्याऐवजी गर्भनलिकेमध्ये होते. ectopic pregnancy ला मराठीमध्ये स्थानभ्रष्ट गर्भधारणा किंवा अस्थानिक गर्भावस्था असेही म्हणतात.
सामान्यपणे गर्भ हा गर्भाशयात (गर्भ पिशवीत) वाढणे आवश्यक असते. मात्र असे न होता जर गर्भ हा गर्भनलिकेमध्येचं वाढू लागल्यास अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. कारण गर्भनलिकेमध्ये गर्भ वाढण्यास पुरेशी जागा नसते. त्यामुळे काही ठरावीक आकारापर्यंतचं गर्भाची वाढ होते व त्यानंतर गर्भनलिका फुटून गर्भ बाहेर पडतो आणि त्या नलिकेतून प्रचंड प्रमाणात रक्तस्रावही होऊ लागतो. अशावेळी उपचार न झाल्यास गरोदर स्त्रीच्या जीवास धोका निर्माण होतो.
एक्टोपिक प्रेग्नन्सीमध्ये गर्भनलिकेमध्ये (fallopian tube मध्ये) गर्भ वाढण्याचे प्रमाण जास्त असते. याशिवाय गर्भाशयमुख (सर्विक्स) किंवा पोटातील इतर अवयवांमध्येसुद्धा गर्भ वाढू शकतो. साधारण 50 गरोदर स्त्रियांपैकी एका गरोदर स्त्रीमध्ये ही अवस्था निर्माण होऊ शकते.
एक्टोपिक प्रेग्नन्सीची कारणे (Causes of Ectopic pregnancy in Marathi) :
अशा प्रकारचा गर्भ राहण्यास अनेक कारणे असू
शकतात.
• यापूर्वी एकाद्या आजाराने किंवा सर्जरीमध्ये गर्भाशय किंवा गर्भनलिकेत इन्फेक्शन झालेले असल्यास,
• हार्मोन्समधील असंतुलनामुळे,
• जेनेटिक कारणांमुळे,
• यापूर्वी जर गरोदरपणात एक्टोपिक प्रेग्नन्सी झालेली असल्यास पुन्हा होण्याची शक्यता वाढते.
• पूर्वी एखादे ऑपरेशन झालेले असल्यास.
• गर्भनलिकेवर शस्त्रक्रिया झालेली असल्यास एक्टोपिक प्रेग्नन्सी होण्याची अधिक शक्यता असते.
सिगारेट स्मोकिंग करणाऱ्या स्त्रिया किंवा वयाच्या 35 शी नंतर गरोदर झालेल्या स्त्रियामध्ये एक्टोपिक प्रेग्नन्सी होण्याचा धोका अधिक असतो.
अस्थानिक गरोदरपणाची लक्षणे (Ectopic pregnancy symptoms) :
प्रेग्नन्सीमध्ये सुरवातीच्या काही दिवसात वारंवार चक्कर येणे, ओटीपोटात खूप दुखणे, अंगावरून लालसर, काळपट स्त्राव जाणे यासारखी लक्षणे दिसल्यास ताबडतोब आपल्या डॉक्टरांकडे जाऊन पुढील
तपासण्या कराव्यात.
एक्टॉपिक प्रेग्नन्सीचे निदान :
गरोदर स्त्रीची तपासणी करून आणि सोनोग्राफीवरून एक्टॉपिक प्रेग्नन्सी असल्याचे लक्षात येते. तर काही वेळी सोनोग्राफीत खात्रीशीर निदान न झाल्यास रक्ताच्या तपासणीवरूनही निदान केले जाते.
एक्टॉपिक प्रेग्नन्सी उपचार (Ectopic pregnancy Treatment) :
एक्टोपिक प्रेग्नन्सीमुळे गर्भपात होत असतो तसेच गरोदर स्त्रीच्या आरोग्यासाठीही धोका पोहचू शकतो. त्यामुळे एक्टोपिक प्रेग्नन्सीची गंभीरता विचारात घेता याचे वेळीच निदान होणे आवश्यक असते. सुरवातीलाचं निदान झाल्यास औषधांद्वारे गर्भ नष्ट केला जातो.
मात्र, जर वेळीच निदान न झाल्यास गर्भनलिका फुटून पेशंटची स्थिती खूप गंभीर बनते. नलिका फुटून पोटात प्रचंड रक्तस्राव होत असतो, अशावेळी ऑपरेशन हा एकच उपाय असतो आणि तोसुद्धा तातडीने करावा लागतो.
गर्भनलिका फुटून रक्तस्राव होत असल्यास ओपन सर्जरी किंवा दुर्बिणीद्वारेही शस्त्रक्रिया (laparotomy) केली जाते. रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होत असल्याने रुग्णास रक्त देण्याची गरज भासू शकते. ऑपरेशनमध्ये गर्भ काढून टाकला जातो, गर्भनलिकेची दुरुस्ती केली जाते.
Ectopic Pregnancy Meaning, Causes, Symptoms, Diagnosis and Test in Marathi.
ही माहिती आपणास आवडल्यास आमचे Youtube चॅनेल subscribe जरूर करा. असेच उपयुक्त माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपणास मोफत उपलब्ध होतील. यासाठी खालील YouTube subscribe बटनावर क्लिक करा.
यूरिक एसिड कशाने वाढते व शरीरातील यूरिक एसिड कमी करण्याचे उपाय...