केसांची काळजी घेण्यासाठीचे उपाय मराठीत (Hair care tips in Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Ayurvedic hair care tips in Marathi

केसांची काळजी कशी घ्यावी..?

सौंदर्याच्या दृष्टीने केसांचे अत्यंत महत्व आहे. केस गळणे, केसात कोंडा होणे, अकाली केस पांढरे होणे, केस तुटणे यासारख्या केसांच्या समस्या असतात.
केसांची योग्य काळजी न घेणे, केस कापण्याची चुकीची पद्धत आणि विटॅमिन, प्रोटीनचा अभाव यामुळे केस निकृष्ठ बनतात, गळतात आणि निस्तेजही होतात.
केसांच्या समस्यांनी आज अनेक स्त्री आणि पुरुष दोघेही ग्रासलेले आहेत. केसांची समस्या गंभीर असली तरीसुद्धा, आपण जर आपल्या जीवनशैलीमध्ये अगदी थोडासाच बदल केल्यास केसांच्या सर्व समस्यांचे सहजतेने निरसण होईल. यासाठी येथे काही सहज सोपे उपाय दिले आहेत.

केसांचे आरोग्य आपल्या संपूर्ण आरोग्यावरच अवलंबुन असते. जसे जर आपल्या शरीरातील रक्ताभिसरण ( Blood circulation) योग्य प्रकारे होत असल्यास त्यायोगे केसांच्या मुळांचे पोषण योग्य प्रकारे होते. यांमुळे केसांची मुळे घट्ट होतात. परिणामी केस गळणे, तुटणे यासारख्या समस्या होत नाहीत.

केस धुताना कोणती काळजी घ्यावी : केस नियमित म्हणजे आठवड्यातून दोनदा धुवायलाच हवेत. त्यासाठी माइल्ड शॅम्पूचा  वापर करावा. केस धुताना डोक्यावर केस घेऊन ते एकत्र धुवू नयेत. त्यामुळे केसांत गुंता होवू शकतो. केस मोकळे सोडून मगच धुवावेत.
केसांसाठी तुम्ही लिंबाचाही वापर करू शकता. एक मग पाण्यात लिंबू मिसळा आणि शॅम्पू केल्यानंतर केसांना या पाण्यानं धुवून टाका. लिंबूनं केसांची चमक कायम राहते. कोंडा असेल तर त्यापासूनही सुटका होते.

केस धुतल्यानंतर : केस नैसगिर्कपणे कोरडे होवू द्यावेत. केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर कमीतकमी करावा. केस कोरडे करण्यासाठी टॉवेलने घासून केस कोरडे करू नयेत. डोक्याला पाच ते सात मिनिटे टॉवेल बांधावा आणि हलक्या हाताने केस पुसावेत.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

केस विंचरताना : ओले केस कधीही विंचरू नयेत.  केस नियमित विंचरणे फायद्याचे असते. रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यासाठी कमीत कमी 100 वेळा केसांत कंगवा फिरवणे आवश्यक आहे.  केस विंचरताना केसांतील गुंता प्रथम बोटांनी सोडवावा. केस विंचरताना पुढे वाकून केस चेहऱ्यावर आणा आणि मानेपासून केसांच्या टोकापर्यंत केस विंचरा.

कंडिशनर लावताना : कंडिशनरमुळे केस मजबूत, चमकदार होतात.  केस कोरडे असताना कंडिशनर लावावे आणि कोमट पाण्याने ते धुवावे.  शॅम्पू केल्यानंतर प्रोटीनयुक्त कंडिशनर केसांना लावावेत. डोक्यावरील त्वचेला कंडिशनर लावू नये. केसांना सूट होईल असा शॅम्पू वापरा. केसात कोंडा असेल,तर आठवड्यातून एकदा  ऍण्टी डँड्रफ शॅम्पू वापरा.

केसांच्या आरोग्यासाठी उपाय :

• आहारात केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे प्रोटीन, जीवनसत्वे, कॅल्शियम, लोह, जिंक इ. पोषकतत्वांनी भरपूर असणाऱया हिरव्या पालेभाज्या, विविध फळे, मोड आलेली कडधान्ये, दुध, अंडी, सुकामेवा विशेषतः बदाम यांचा आहारात समावेश करावा. केसांच्या आरोग्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. मासे, सोया, कॉटेज चीझ आणि डाळी यांचा आहारात समावेश करावा. संत्र, पिवळी फळे आणि भाज्यांत बीटा केराटीन आढळते. बी 1, बी6, बी 12, सी आणि ए विटॅमिन केसांसाठी पोषक असते.
• तळलेले पदार्थ, आंबट, खारट, तिखट, मसालेदार आहाराचे प्रमाण कमी करावे. हवाबंद पदार्थ, जंकफूड, फास्टफूडच्या आहारी जाणे टाळावे. कारण अशा आहारात केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे प्रोटीन, जीवनसत्वे, कॅल्शियम, लोह, जिंक इ. पोषकतत्वे नसतात.
• पुरेसे पाणी वरचेवर प्यावे. यांमुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.
• मानसिक ताणतणाव रहित रहावे.
• नियमित व्यायाम करावा. यांमुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. योग्य रक्तसंचारणामुळे केसांची मुळे घट्ट होतात. यांमुळे केस गळण्यासारख्या समस्या होत नाही.
• केसांच्या आरोग्यासाठी ‘ड’ जीवनसत्व अत्यंत उपयुक्त असते. यासाठी सकाळच्या कोवळ्या ऊन्हात काही वेळ उभे रहावे.
• व्यसनांपासून दूर राहणे केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असते. कारण धुम्रपान, मद्यपानाद्वारे अनेक विषारी घटक रक्तप्रवाहात येत असतात. त्यामुळे इतर आरोग्याच्या समस्येबरोबर केसांच्या समस्यासुद्धा उद्भवतात. धुम्रपान करणाऱया व्यक्तींचे केस लवकर पांढरे होतात.
• रासायनिक औषधे, शेंफू, कंडीस्नरचा वापर हानिकारक ठरु शकतो. यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनानेच शक्यतो यांचा वापर करावा. यापेक्षा भृंगराजतेल, मेहंदी यांचा वापर करावा.
• रात्रभर केसांना तेल लावून ठेवल्याने केस चमकदार होतात. आठवड्यातून दोनदा कोमट तेल केसांना लावा. किमान दोन तास ठेवा.
• केस गळत असतील, तर सकाळी उठल्यावर एक आवळा खाणे फायदेशीर ठरते.
• डॅन्ड्रफ, पुरळ किंवा डोक्याला खाज उठत असेल तर त्वचातज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.