घशात आग होणे (Throat burning) –
अयोग्य आहार, ऍसिडिटी यामुळे घशात आग होत असते. अशावेळी घशात जलन होण्याबरोबरच आंबट ढेकर सुद्धा येऊ शकतात.
घशात आग कशामुळे होते ..?
आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक आम्लाचे प्रमाण अधिक वाढल्यास ऍसिडिटीची समस्या निर्माण होते. ऍसिडिटीमुळे घशात तसेच छाती व पोटामध्ये आग होऊ लागते. अशावेळी आंबट ढेकर येणे, तोंडाला आंबट पाणी सुटणे, मळमळ, डोकेदुखी असे अन्य त्रास देखील होऊ शकतात.
घशात आग होण्याची कारणे –
- मसालेदार, तिखट, आंबट पदार्थ अधिक खाणे किंवा वारंवार चहा-कॉफी पिणे यामुळे घशात आग होत असते.
- तसेच ऍसिडिटी, acid reflux, अल्सर यामुळे घशात आग होते.
- तंबाखू, धूम्रपान, मद्यपान अशा व्यसनांमुळे घशात आग होते.
- डोकेदुखी व अंगदुखीच्या गोळ्या वरचेवर घेतल्यामुळे, पोटातील आम्लाचे प्रमाण वाढून घशात आग होत असते.
अशा विविध कारणांनी घशामध्ये आग होते.
घशात आग होणे यावर घरगुती उपाय –
घशात आग होत असल्यास केळे खावे. केळ्यात नैसर्गिकरीत्या Antacids असतात. त्यामुळे घशात आग होत असल्यास केळे खाल्याने आराम मिळतो.
घशात आग होत असल्यास थंड दूध प्यावे. यामुळे ऍसिडिटी कमी होऊन घशातील आग थांबते. याशिवाय मनुका दुधात घालून उकळून ते दूध थंड झाल्यावर प्यावे व मनुकाही खाव्यात.
घशात आग होत असल्यास आल्याचा तुकडा चावून खावा. यामुळे ऍसिडिटी व घशातील आग कमी होण्यास मदत होते.
जेवणानंतर बडीशेप चावून खाल्यामुळे घशात आग होण्यापासून दूर राहण्यास मदत होते. यामुळे अन्नपचनही व्यवस्थित होते.
घशामध्ये आग होत असल्यास तुळशीची काही पाने चावून खावीत.
घशात आग होऊ नये यासाठी काय करावे ..?
- उपाशीपोटी फार वेळ न राहू नये. वेळेवर जेवण घ्यावे.
- चमचमीत मसालेदार पदार्थ, आंबट पदार्थ, आंबवलेले पदार्थ, जास्त तिखट पदार्थ, लोणची, कच्चा टोमॅटो, ओलं खोबरं, पापड, अति मांसाहार, हरभऱ्याची डाळ या गोष्टी शक्यतो टाळाव्यात.
- वारंवार चहा-कॉफी पिणे टाळावे.
- स्मोकिंग, मद्यपान ह्या व्यसनांपासून दूर राहावे.
- पुरेसे पाणी म्हणजे दिवसभरात साधारण आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
- नियमित व्यायाम करावा.
- मानसिक ताण घेऊ नये.
- रात्री जागरण करू नये. तसेच दिवसा झोपू नये.
- वारंवार वेदनाशामक गोळ्या औषधे खाणे टाळावे.
अशी काळजी घेतल्यास घशात आग होत नाही.
हे सुध्दा वाचा – घशाला कोरड पडणे यावरील उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Throat burning causes and home remedies. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on March 10, 2024.
Good information