केसात खाज होण्याची कारणे व डोक्याला खाज सुटणे यावर घरगुती उपाय

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Dokyat khaj yene upay in Marathi, Hair itching problem solution in Marathi, home remedy for itchy scalp in Marathi.

डोक्यात खाज येणे :

डोक्यात होणाऱ्या खाजेमुळे सर्वचजण अगदी हैराण होतात. डोक्यात किंवा केसात अनेक कारणांनी खाज येत असते. केसातील कोंडा, इन्फेक्शन, वातावरणातील बदल किंवा सोरायसिस सारखे विशिष्ट आजार अशी अनेक कारणे याला जबाबदार असतात. याशिवाय केसांच्या मुळांच्या कोरडेपणामुळेही हा केसात खाज त्रास अधिक होत असतो.

केसात खाज होण्याच्या त्रासावर योग्यवेळीच उपाय करणे गरजेचे असते कारण डोक्यात जास्त खाजवल्यामुळे तेथील त्वचेतून रक्त येण्याची आणि इन्फेक्शन होण्याचीही शक्यता असते. तसेच यामुळे केसांची मूळंही हलतात आणि त्याचा परिणाम होऊन केसगळतीही मोठ्या प्रमाणात होते.

डोक्यात खाज होण्याची कारणे :

• डोक्याची त्वचा (स्काल्प) कोरडे पडल्यामुळे,
• केसात कोंडा (Dandruff) झाल्यामुळे,
• केसात इन्फेक्शन झाल्याने,
• केसात उवा झाल्याने,
• डोक्याच्या त्वचेला सूज आल्यामुळे (seborrheic dermatitis),
• वातावरणातील बदलामुळे जसे पावसाळ्यात भिजल्याने उन्हाळ्यात केसातील घामामुळे,
• केसांची स्वच्छता व निगा न ठेवल्याने,
• हार्मोन्समधील बदलांमुळे,
• हेअर डाय किंवा विशिष्ट तेलाच्या ऍलर्जीमुळे,
• मानसिक तणावामुळे,
• तसेच सोरायसिस, शीतपित्त, ऍलर्जी, eczema, डायबेटीस ह्या आजारांमुळेही डोक्यात खाज सुटू शकते.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा..?

एक आठवड्यापेक्षा जास्त काळ डोक्यात खाज होत असल्यास किंवा डोक्यात खाज येण्याबरोबरच त्याठिकाणी वेदना होणे, जखमा होणे, पुरळ, फोड, चट्टे येणे, सूज येणे अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांकडून निदान व उपचार करून घेणे आवश्यक आहे.

डोक्याला खाज सुटणे घरगुती उपाय :

खोबरेल तेल –
खोबरेल तेलात antimicrobial गुणांचे lauric acid मुबलक असते. यामुळे त्वचेत खोबरेल तेल सहज शोषले जाते. त्यामुळे कोरडी त्वचा असणे, eczema मुळे किंवा उवामुळे डोक्यात खाज येत असल्यास त्यावर खोबरेल तेल उपयुक्त ठरते. यासाठी केसांना खोबरेल तेलाने मालिश केल्यास खाजेची समस्या दूर होण्यास मदत होईल.

सिताफळाच्या बिया –
केसात उवा असल्यामुळे खाज आणि कोंडा होण्याची समस्या असल्यास सिताफळाच्या बियांच्या चूर्णाची पेस्ट करून रोज अर्धा तास केसांच्या मुळांशी लावावी व थोड्यावेळाने आंघोळ करताना केस धुवावेत.

कोरपडीचा गर –
अंघोळ करण्यापूर्वी 15 मिनिटे आधी केसांच्या मुळांना एलोवेरा जेल किंवा कोरपडीचा गर लावावा व थोड्यावेळाने आंघोळ करताना केस धुवावेत. असे नियमित केल्याने केसातील खाज दूर होईल.

लिंबू रस –
पाच चमचे खोबरेल तेलात एक चमचा लिंबूरस मिसळावे. हे मिश्रण आंघोळ करण्यापूर्वी केसांच्या मुळांना चांगल्या पद्धतीने लावावे. अर्ध्या तासानंतर आंघोळ करताना केस हर्बल शॅम्पूने धुवावेत. यामुळे केसात खाज येण्याची व कोंडा होण्याची समस्या दूर होईल. लिंबात अॅँटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-फंगल गुणधर्म असतात.

अॅपल व्हिनेगर –
अॅपल व्हिनेगर हे अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि सूज कमी करणाऱ्या गुणांचे असते. डोक्याची त्वचा कोरडी पडून खाज येत असल्यास, केसात कोंडा असल्यास अॅपल व्हिनेगर हे उपयुक्त ठरते. यासाठी पाऊण कप कोमट पाण्यात पाव कप अॅपल व्हिनेगर घालून केसांना मालिश केल्यास खाजेची समस्या दूर होण्यास मदत होईल.

केसात जास्त खाज येत असल्यास Salicylic acid किंवा Ketoconazole हे औषध घटक असणारे शॅम्पूचा वापर करू शकता.

हे सुद्धा वाचा..

केसातील कोंडा आणि केसात खाज होणे –
केसातील कोंडा किंवा Dandruff मुळेही केसात खाज होऊ शकते. यासाठी केसातील कोंडा दूर करण्यासाठी उपयुक्त उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Itchy scalp home remedies marathi, how do you get rid of an itchy scalp? head itching reasons in marathi, home remedy for itchy scalp.

© कॉपीराईट सुचना -
कृपया ह्या वेबसाईटमधील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. येथील माहिती कॉपी करून आपल्या नावाने प्रसिद्ध किंवा शेअर किंवा Video बनवता येणार नाही.