गर्भावस्थेत चक्कर येण्याची समस्या :
गरोदरपणात चक्कर येणे ही एक सामान्य आहे. जवळजवळ 75 टक्के गर्भवती महिलांना काही प्रमाणात याचा त्रास होत असतो. पहिल्या तीन महिन्यात, साधारण आठ आठवड्यांनंतर, रक्तदाब कमी झाल्यामुळे आपल्याला चक्कर व मळमळ येऊ शकते.
तसेच दुसर्या आणि तिसर्या तिमाहीत वाढणारे गर्भाशय हे रक्तवाहिन्यांवर दबाव आणत असये. या कारणास्तव, जर आपण बराच वेळ आपल्या पाठीवर झोपून राहत असाल तर आपल्याला चक्कर येत असते.
प्रेग्नन्सीमध्ये चक्कर येण्याची अन्य कारणे :
• पलंगावरून झोपलेल्या अवस्थेतून लवकर उठून उभे राहण्याची सवय असल्यास रक्ताला मेंदूपर्यंत पोचण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे चक्कर येऊ शकते.
• गरोदरपणात बराच वेळ झोप घेतल्याने रक्तदाब कमी झाल्यामुळे चक्कर येऊ शकते.
• गरोदरपणी बराचवेळ उपाशी राहिल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे चक्कर येऊ शकते.
• रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यास चक्कर येऊ शकते. यासाठी गर्भावस्थेत लोह व फॉलिक ऍसिडच्या गोळ्या देतात. त्या खाणे आवश्यक असते.
• उकाड्याने जास्त घाम आल्यामुळे अशक्त वाटून चक्कर येऊ शकते.
गरोदरपणात चक्कर येत असल्यास हे करा उपाय :
• पलंगावरून झोपलेल्या अवस्थेतून लवकर उठून उभे राहू नये. यासाठी थोडावेळ पलंगावर बसून सावकाश उठावे.
• गरोदरपणात चक्कर येऊ नये यासाठी उजव्या कुशीवर झोपणे उपयुक्त ठरते.
• बराचवेळ उपाशी राहू नये. वरचेवर थोडा थोडा आहार घेत राहावा.
• ऍनिमिया होऊ नये यासाठी गरोदरपणात लोह व फॉलिक ऍसिडच्या गोळ्या दिल्या जातात. त्या वेळच्यावेळी घ्याव्यात.
डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक असते..?
गरोदरपणात चक्कर येण्याबरोबरच खालील त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जावे.
• पोटात वेदना होणे,
• योनीतुन रक्तस्राव होणे,
• अतिशय डोके दुखणे,
• श्वास घेण्यास त्रास होणे,
• अस्पष्ट दिसणे,
• उलट्या होणे अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक असते.
Read Marathi language article about Dizziness and Fainting during Pregnancy. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.