दात दुखणे – Teeth pain :

दातदुखी कधीही होऊ शकते. दातदुखी होण्यासाठी अनेक कारणे जबाबदार असतात. विशेषतः दातांची योग्य काळजी न घेतल्याने दातांच्या तक्रारी होऊ शकतात. दाताचे दुखणे हैराण करून सोडत असते. तसेच दातांच्या ठिकाणी सळसळ होऊन अतिशय वेदना होत असतात. यासाठी खाली दात दुखीसाठी उपयुक्त घरगुती उपायांची माहिती दिली आहे.

दातदुखी होण्याची कारणे :

अनेक कारणांमुळे दातदुखी होऊ शकते यामध्ये,
• तोंडातील व हिरड्यातील बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे,
• दातांची मुळे सैल झाल्यामुळे,
• हिरड्यातुन रक्त येत असल्यामुळे,
• दाताच्या मुळाशी हिरड्यात जखम झाल्यामुळे,
• हिरड्यांच्या आजारांमुळे,
• दात किडल्यामुळे,
• जास्त कठीण पदार्थ चावल्यामुळे दातदुखी होत असते.

दात दुखीवर हे करा घरगुती उपाय :

हिंग –
हिंग हे दातदुखीसाठी सर्वात उपयुक्त ठरते. चिमुटभर हिंग दुखणाऱ्या दाताजवळ लावल्याने दातांचे दुखणे कमी होण्यास मदत होईल.

लवंग –
दुखणाऱ्या दाताजवळ लवंग धरून ठेवल्याने दातदुखी थांबण्यासाठी मदत होते. लवंगमधील अँटीबॅक्टेरिअल या औषधी गुणांमुळे दात आणि दाढेतील इन्फेक्शन कमी होते. याशिवाय लवंग पावडर किंवा लवंग तेलही आपण दुखणाऱ्या दातांच्या मुळाशी लावू शकता.

लसूण –
लसणाच्या दोन-तीन पाकळ्या व काही काळ्या मिऱ्या एकत्र बारीक वाटून घ्याव्यात. दुखणाऱ्या दाताच्या मुळाशी त्यातील थोडीशी पेस्ट लावावी. याशिवाय लसणाच्या दोन-तीन पाकळ्या दाताने चावून खाल्यानेही दात दुखी दूर होण्यास मदत होते.

पेरूची पाने –
पेरूची तीन चार कोवळी पाने थोडे पाणी घालून वाटून घ्यावीत. दुखणाऱ्या दाताच्या मुळाशी त्यातील थोडीशी पेस्ट लावावी. किंवा पेरूची पाने स्वच्छ धुवून तोंडात चघळत राहावे. यामुळेही दातांचे दुखणे थांबते.

कांदा –
दात दुखत असल्यास कांदा चावून खावा. यामुळे दुखणाऱ्या दातापासून आराम मिळेल.

मीठाच्या पाण्याच्या गुळण्या –
दात दुखत असल्यास कोमट पाण्यामध्ये मीठ घालून गुळण्या कराव्यात. मीठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे दातदुखी कमी होते.

दात दुखीवरील गोळी :

जर घरगुती उपायांनी दातदुखी न थांबल्यास आपल्या डेंटिस्टकडून दातदुखीवर उपचार करून घ्यावेत. आपले डॉक्टर दातदुखी सामान्य असल्यास Paracetamol आणि Ibuprofen हे घटक असणारी वेदनाशामक औषध गोळ्या देऊ शकतात. वेदनाशामक गोळीमुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो यासाठी वरील वेदनाशामक गोळीबरोबर Antacids ची गोळीही घ्यावी. वेदनाशामक गोळीमुळे दात दुखणे व दात सळसळ करणे थांबते.

दातातून रक्त येत असल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..

Written by - डॉ. सतीश उपळकर
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास येथे क्लिक करून आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल जरूर Subscribe करा.


सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.