दात किडणे – Tooth decay :
दात किडणे ही दातांची एक सामान्य समस्या असून अनेकांना याचा त्रास होत असतो. अनेक कारणांनी दात व दाढा किडत असतात. दात किडल्यामुळे किंवा दाढा किडल्याने त्याठिकाणी वेदना होणे, अन्न चावताना दुखणे, हिरड्या सुजणे ही लक्षणे असू शकतात. तसेच समोरचे दात किडल्याने चेहऱ्याच्या सौंदर्यामध्येही यामुळे बाधा निर्माण होते.
दात का किडतात व दात किडण्याची कारणे :
• दातांची योग्य काळजी न ठेवल्याने,
• नियमित दिवसातून दोनवेळा दात न घासल्याने,
• कार्बोहायड्रेट आणि साखरेचे पदार्थ, चॉकलेट्स, मिठाई, बेकरी प्रोडक्ट अधिक खाण्याच्या सवयीमुळे,
• तोंडाची स्वच्छता न ठेवल्याने किंवा दात व दाढांमध्ये अन्नाचे कण अडकून त्याठिकाणी इन्फेक्शन झाल्यामुळे दात व दाढ किडू लागतात.
दाढ किडणे आणि त्यावरील उपचार :
दात किंवा दाढ किडत असल्यास आपल्या डेंटिस्टकडून दातांची तपासणी व उपचार करून घ्या. दात किडण्याचे प्रमाण कमी असल्यास डेंटिस्ट त्याठिकाणी साफ करून पडलेली छिद्रे भरून घेतात. जास्त प्रमाणात दात किडलेले असल्यास root canal therapy चा अवलंब केला जातो. तर भरपूर खराब झालेले दात काढून त्याठिकाणी कृत्रिम दात बसवले जातात.
दात किडणे यावर हे आहेत घरगुती उपाय :
लवंग –
किडलेल्या दाताजवळ लवंग तेल कापसाच्या बोळ्याने लावल्यास दातातील इन्फेक्शन कमी होऊन दात किडणे थांबले जाते.
मोहरी तेल –
दात जास्त किडू नये म्हणून मोहरीचे तेल व मीठ एकत्र करून दात घासावे.
पेरूची पाने –
पेरूच्या पानात anti-inflammatory आणि antimicrobial हे गुण असतात. त्यामुळे हिरड्यांना आलेली सूज व इन्फेक्शन कमी होते. दात जास्त किडू नये म्हणून पेरूची पाने स्वच्छ धुवून तोंडात चघळत राहावे.
दात किडू नये म्हणून अशी घ्यावी काळजी :
• दात नियमित घासावेत. विशेषतः लहान मुलांना रोज दात घसण्याची सवय लावावी.
• दररोज दोनदा दात घासले पाहिजेत. सकाळी उठल्याबरोबर व रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासावेत.
• दात घासताना ब्रश जास्त रगडू नये तसेच 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ दात घासत बसू नये.
• दात घासताना जीभही स्वच्छ करावी. यामुळे तोंडाची दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांचं प्रमाण कमी होईल.
• जेवल्यानंतर चूळ भरावी. जेवणानंतर दातांच्या फटींमध्ये अन्नकण अडकतात. हे अन्नकण ब्रशने स्वच्छ करता येत नाहीत. या अन्नकणांमुळे दातांमध्ये बॅक्टेरियांची निर्मिती होते व दात किडू लागतात.
• माउथवॉशचा वापर करा. यामुळे दातांमध्ये अडकलेले अन्नकण बाहेर पडायला मदत होते. शिवाय तोंडाची दुर्गंधी कमी होते.
• सतत गोड पदार्थ, चॉकलेट, मिठाई, बेकरी प्रोडक्ट खाणे टाळावे. तसेच वारंवार चहा-कॉफी, कोल्ड्रिंक्स पिणेही टाळावे.
• सिगारेट, बिडी, तंबाखू यासारख्या व्यसनांपासूनही दूर राहावे.
आणि महत्त्वाचे म्हणजे सहा महिन्यातून एकदा आपल्या डेंटिस्टकडून दातांची तपासणी करून घ्यावी. यामुळे दातांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.
दात दुखत असल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..