दातांची निगा – Dental care :
तोंडाचं सर्वांगीण आरोग्य राखण्याच्या दृष्टीने दातांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. दातांची काळजी न घेतल्यास दातांच्या अनेक तक्रारी होत असतात म्हणून दातांची निगा राखणे गरजेचे असते. यासाठी दातांची काळजी कशी घ्यावी याची माहिती खाली दिली आहे.
आपल्या दातांची काळजी अशी घ्यावी :
रोज दात घासावेत..
दात नियमित घासावेत. विशेषतः लहान मुलांना रोज दात घासण्याची सवय लावावी. दररोज दोनदा दात घासले पाहिजेत. सकाळी उठल्याबरोबर व रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासावेत.
योग्य पद्धतीने दात घासावेत..
दात योग्य पद्धतीने घासले पाहिजेत. दात 45 अंशांच्या कोनात घासा. दात घासताना हातांची वर्तुळाकार हालचाल करा. दातांचा बाहेरचा, आतला आणि चावण्याचा भाग स्वच्छ झाला पाहिजे. पुढच्या दातांचा मागचा भाग वरून खाली या पद्धतीने घासा.
योग्य ब्रश वापरा..
दात घासण्याचा ब्रश फार मोठा नसेल याची काळजी घ्यावी. हा ब्रश दाताच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचला पाहिजे. ब्रशचे ब्रिसल्स मुलायम असले पाहिजे त्यामुळे हिरड्यांना त्रास होत नाही. तसेच दर तीन ते चार महिन्यांनी टूथब्रश बदला. दुसऱ्याचा ब्रश वापरू नये तसेच आजारपणात वापरलेला ब्रशही बदलावावा.
तोंडाची स्वच्छता ठेवा..
दात घासताना जीभही स्वच्छ करा. यामुळे तोंडाची दुर्गंधी निर्माण करणाच्या बॅक्टेरियांचं प्रमाण कमी होईल आणि तोंडाला दुर्गंधी येणार नाही.
माउथवॉशचा वापर करा..
जेवल्यानंतर चूळ भरायला विसरू नका. दातांच्या फटींमध्ये अन्नकण अडकतात. हे अन्नकण ब्रशने स्वच्छ करता येत नाहीत. या अन्नकणांमुळे दातांमध्ये बॅक्टेरियांची निर्मिती होते. या बॅक्टेरियांमुळे दातांची झीज होते तसंच दातात फटी पडू लागतात. यासाठी माउथवॉशचा वापर करा. यामुळे दातांमध्ये अडकलेले अन्नकण बाहेर पडायला मदत होते. शिवाय तोंडाची दुर्गंधी कमी होते.
योग्य आहार घ्या..
दातांच्या आरोग्यसाठी स्ट्रॉबेरी, संत्री, द्राक्षे, सफरचंद यासारखी विविध फळे खाणे उपयोगी ठरते. याशिवाय आहारात दुग्धजन्य पदार्थ, विविध कडधान्ये यांचाही समावेश असावा.
दातांसाठी हानिकारक पदार्थ खाणे टाळावे..
दातांच्या आरोग्यसाठी थंडगार पदार्थ, जास्त गरम पदार्थ आणि चावण्यास कठीण असणारे पदार्थ खाणे टाळावे. तसेच गोड पदार्थ सतत खाण्यामुळे दात जास्त प्रमाणात किडत असतात. यासाठी लहान मुलांना खूप गोड पदार्थ, चॉकलेट, सतत देणे टाळावे. तसेच वारंवार चहा-कॉफी पिणे टाळावे.
व्यसने टाळावीत..
व्यसनांमुळे संपूर्ण आरोग्यचं धोक्यात येते. तंबाखू, पानमसाला, सिगारेट, मद्यपान अशा व्यसनांमुळे तोंडांचे, दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य बिघडते. यासाठी दातांच्या आरोग्यासाठी व्यसनांपासून दूर राहावे.
दातांची नियमित तपासणी..
आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या डेंटिस्टकडून नियमित दातांची तपासणी करून घ्यावी. यामुळे दातांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.
दात दुखत असल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास येथे क्लिक करून आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल जरूर Subscribe करा.