दातदुखी (Teeth pain) :
दातदुखी कधीही होऊ शकते. दातदुखी होण्यासाठी अनेक कारणे जबाबदार असतात. विशेषतः दातांची योग्य काळजी न घेतल्याने दातांच्या तक्रारी होऊ शकतात. असह्य दातदुखी ही अगदी हैराण करून सोडत असते. तसेच दातांच्या ठिकाणी सळसळ होऊन अतिशय वेदना होत असतात.
दातदुखी होण्याची कारणे :
अनेक कारणांमुळे दातदुखी होऊ शकते यामध्ये,
- तोंडातील व हिरड्यातील बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे दातदुखी होते.
- दातांची मुळे सैल झाल्यामुळे,
- हिरड्यातुन रक्त येत असल्यामुळे,
- दाताच्या मुळाशी हिरड्यात जखम झाल्यामुळे,
- हिरड्यांच्या आजारांमुळे,
- दात किडल्यामुळे,
- जास्त कठीण पदार्थ चावल्यामुळे दातदुखी होत असते.
दात दुखीवर करायचे घरगुती उपाय :
1) हिंग –
हिंग हे दातदुखीसाठी सर्वात उपयुक्त ठरते. चिमुटभर हिंग दुखणाऱ्या दाताजवळ लावल्याने दातदुखी कमी होण्यास मदत होईल.
2) लवंग –
दुखत असलेल्या दाताजवळ लवंग धरून ठेवल्याने दातदुखी थांबण्यासाठी मदत होते. लवंगमधील आयुर्वेदिक अँटीबॅक्टेरिअल गुणांमुळे दात आणि दाढेतील इन्फेक्शन कमी होते. याशिवाय लवंग पावडर किंवा लवंग तेलही आपण दुखत असलेल्या दातांच्या मुळाशी लावू शकता.
3) लसणाच्या पाकळ्या –
लसणाच्या दोन-तीन पाकळ्या व काही काळ्या मिऱ्या एकत्र बारीक वाटून घ्याव्यात. दुखत असलेल्या दाताच्या मुळाशी त्यातील थोडीशी पेस्ट लावावी. याशिवाय लसणाच्या दोन-तीन पाकळ्या दाताने चावून खाल्यानेही दात दुखी दूर होण्यास मदत होते.
4) पेरूची पाने –
पेरूची तीन चार कोवळी पाने थोडे पाणी घालून वाटून घ्यावीत. दुखणाऱ्या दाताच्या मुळाशी त्यातील थोडीशी पेस्ट लावावी. किंवा पेरूची पाने स्वच्छ धुवून तोंडात चघळत राहावे. यामुळेही दातदुखी थांबते.
5) कांदा –
कांदा चावून खाल्यामुळे दातदुखी कमी होऊन आराम मिळतो.
6) मीठ –
दात दुखू लागल्यास कोमट पाण्यामध्ये मीठ घालून गुळण्या कराव्यात. मीठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे दातदुखी कमी होते.
जर घरगुती उपायांनी दातदुखी न थांबल्यास डेंटिस्टकडे जावे.
दात दुखीवरील गोळी :
दातदुखी सामान्य असल्यास Paracetamol आणि Ibuprofen हे घटक असणारी वेदनाशामक गोळी डॉक्टर देऊ शकतात. वेदनाशामक गोळीमुळे दात दुखी लगेच कमी होण्यास मदत होते.
Read Marathi language article about Teeth pain. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.