पायाला भेगा पडणे –
पायाला भेगा पडणे ही एक सामान्य समस्या असून याचा त्रास अनेकांना होत असतो. काहीजणांना पायाला भेगा पडल्यामुळे जखमा होऊन त्याठिकाणी वेदना व रक्तस्रावही होत असतो. विशेषतः हिवाळ्यात पायाला भेगा पडण्याचा त्रास अधिक प्रमाणात होत असतो.
पायाला भेगा का पडतात त्याची कारणे –
पायाला भेगा पडण्यास अनेक कारणे जबाबदार असतात. यामध्ये,
- अनवाणी चालण्याच्या सवयीमुळे पायाला भेगा पडतात.
- अधिक वेळ उभे राहण्याच्या सवयीमुळे पायाला भेगा पडू शकतात.
- आरामदायी चपला, सँडल किंवा बूट न वापरण्यामुळे पायाला भेगा पडतात.
- हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंड वातावरणामुळे पायाची त्वचा कोरडी (dry skin) झाल्यामुळे,
- जास्त गरम पाण्याने अंघोळ करण्याच्या सवयीमुळे,
- पुरेसे पाणी न पिण्याच्या सवयीमुळे,
- व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे,
- डायबेटीस, हायपो-थायरॉईडीजम, लठ्ठपणा, सोरायसिस, त्वचेचे विकार यासारखे त्रास असल्यासही पायाला भेगा पडण्याची समस्या होत असते.
पायाला भेगा पडणे यावर घरगुती उपाय –
पायाला भेगा पडल्यास तेथे औषधी मलम किंवा मॉइस्चराइजर क्रीम लावावी. यामुळे पायाच्या भेगा भरण्यास मदत होते. याशिवाय पायाच्या भेगांना मध लावणे सुध्दा फायदेशीर असते. तसेच खोबरेल तेल लावल्याने देखील पायाच्या भेगा लवकर भरून निघतात. त्याचप्रमाणे पायाच्या भेगांना कडुनिंबाचा रस किंवा हळद लावल्याने त्या भेगा कमी होण्यास मदत होते. पायाला भेगा पडल्यास हे घरगुती उपाय तुम्ही करू शकता.
पायाला भेगा पडल्यावर काय करावे..?
1) पायाच्या भेगांवर औषधी मलम लावावी.
पायाला भेगा पडल्यास त्याठिकाणी औषधी मलम किंवा मॉइस्चराइजर क्रीम लावावी. त्यामुळे भेगा पडलेली त्वचा मॉइश्चराइज होऊन डेड स्किन निघून जाते व त्वचा मऊसर होऊन भेगांचा त्रास कमी होतो. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवून त्याठिकाणी औषधी मलम किंवा मॉइस्चराइजर क्रीम लावावी. जास्त प्रमाणात पायाला भेगा पडल्यास दिवसातून दोन ते तीन वेळा मलम त्याठिकाणी लावावी. पायाला भेगा पडणे यावर अनेक चांगल्या क्रीम्स उपलब्ध आहेत.
2) पायाच्या भेगावर मध लावा.
पायाच्या भेगा भरून काढण्यासाठी मधातील अँटी-मायक्रोबियल व अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म उपयुक्त ठरतात. तसेच त्वचा मॉइश्चराइज होण्यासाठीही मध उपयुक्त ठरते. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवून त्याठिकाणी मध लावावे.
3) पायाच्या भेगांना खोबरेल तेल लावा.
खोबरेल तेलातील विशेष गुणधर्मामुळे त्वचा मॉइश्चराइज होत असते. यासाठीचं कोरड्या त्वचेसाठी खोबरेल तेल वापरले जाते. त्यामुळे पायाला भेगा पडल्यास त्यावरही खोबरेल तेल खूप उपयोगी ठरते. यामुळे भेगा भरून येण्यास व भेगा पडलेली डेड स्किन निघून जाण्यास, त्वचा मऊ मुलायम होण्यास मदत होते.
4) पायाच्या भेगावर कडुनिंबाचा रस लावा.
पायाला भेगा पडल्यास कडुनिंबाची पाने बारीक वाटून त्याचा रस काढून पायांना लावल्यास भेगा कमी होतात.
5) पायाच्या भेगावर हळद लावा.
हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे जखमा भरून येण्यास मदत होते. यासाठी हळदीमध्ये कोमट तेल टाकून मिश्रण तयार करून ते भेगांमध्ये भरल्यासही हा त्रास कमी होतो.
पायाला भेगा पडू नये म्हणून काय काळजी घ्यावी..?
- अनवाणी पायी चालणे टाळावे.
- बाहेर फिरताना तळपायाचा मातीशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी.
- तळपायाला योग्य Support देणारे व आरामदायी असणारे चपला वापराव्यात.
- पायांना जास्त टाईट होणारे बूट वापरू नयेत.
- अधिक काळ उभे राहणे टाळावे.
- दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण 8 ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीर हायड्रेट राहून त्वचा कोरडी (ड्राय स्किन) पडत नाही.
- मॉइश्चराइजिंग सॉक्स (cracked heels socks) बाजारात उपलब्ध असून त्यांचाही वापर यावर उपयोगी ठरतो.
कोणी जास्त काळजी घ्यावी..?
पायाला भेगा पडणे हा तसा सामान्य त्रास असला तरीही डायबेटीससारखा त्रास असणाऱ्या रुग्णांनी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. अशावेळी पायाला भेगा पडणे याकडे दुर्लक्ष केल्यास त्याठिकाणी जखमा वाढून डायबेटिक न्युरोपॅथी, डायबेटिक फूट अल्सर आणि इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.
त्यामुळे डायबेटिस व पायाला भेगा पडल्याचा त्रास असल्यास आपल्या डॉक्टरांकडून त्यावर उपचार घ्यावेत तसेच पायाची नियमित तपासणीही करून घ्यावी. डायबेटीसविषयी अधिक माहिती जाणून घ्या..
Read Marathi language article about Cracked heels causes and home remedies. Last Medically Reviewed on February 23, 2024 By Dr. Satish Upalkar.