मधुमेहाचे दुष्परिणाम (Diabetes complications) :
अधिक काळापर्यंत जर रक्तामध्ये साखर वाढलेल्या स्वरुपात राहिल्यास, साखरेवर नियंत्रण न ठेवल्यास रक्तवाहिन्या, चेतासंस्था (नर्व्हस सिस्टीम) यांवर गंभीर परिणाम होतो. हृदय, डोळे, किडनी, मज्जातंतू, पाय हे अवयव मधुमेहात विशेष जपावे लागतात.
याची चार प्रकारात विभागणी करता येईल.
1) हृदय आणि मेंदूवरील परिणाम
2) डायबेटिक नेफ्रोपॅथी
3) डायबेटिक रेटिनोपॅथी
4) डायबेटिक न्यूरोपॅथी
1) हृदय आणि मेंदूवरील परिणाम –
हार्ट अटॅक येण्याचा, पक्षाघाताचा (स्ट्रोक) धोका मधुमेहामुळे वाढतो. हृद्याचे विविध विकार मधुमेहामुळे उदभवतात. उच्च रक्तदाबाची समस्या, धमनीकाठिन्यता हे विकार होतात. हृदयाशी संबंधित आजाराची शक्यता मधुमेहात दुपटीने वाढते आणि 75% मधुमेहींचा मृत्यू हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आजाराने होतो.
2) डायबेटिक नेफ्रोपॅथी –
मधुमेहावर योग्य उपचारांनी नियंत्रण न ठेवल्यास किडनीच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो त्याला डायबेटिक नेफ्रोपॅथी असे म्हणतात. यामुळे किडन्या निकामी होऊन डायलिसिस किंवा किडनी ट्रांस्प्लांटेशन करण्याची गरज निर्माण होते.
3) डायबेटिक रेटिनोपॅथी –
अनियंत्रित मधुमेहामुळे डोळ्यांची प्रचंड हानी होते त्याला डायबेटिक रेटिनोपॅथी असे म्हणतात. मधुमेहामुळे डोळ्यांचे विविध गंभीर विकार उद्भवतात. मोतीबिंदू (Cataract), काचबिंदू (Glaucoma) हे डोळ्यांचे विकार होतात.
आज मधुमेह हे अंधत्व येण्याचे प्रमुख कारण ठरत आहे. बहुतांश मधुमेही रुग्णांमध्ये 15 वर्षांनंतर डायबेटिक रेटिनोपॅथी उद्भवण्याची शक्यता असते. डोळ्यांसमोर अंधारी येणं अथवा अस्पष्ट दिसणं, डोकेदुखी, चष्म्याचा नंबर बदलणं, दृष्टी कमजोर होणं ही लक्षणे डायबेटिक रेटिनोपॅथीची आहेत. यासाठी प्रत्येक मधुमेही रुग्णाने दरवर्षी न विसरता डोळ्यांची तपासणी करून घेणं आवश्यक आहे. डायबेटिक रेटिनोपॅथीविषयी अधिक माहिती जाणून घ्या..
4) डायबेटिक न्यूरोपॅथी –
मधुमेहाच्या दुष्परिणामामुळे नाड्या प्रभावित होतात. त्यामुळे डायबेटिक न्युरोपॅथी, डायबेटिक फूट अल्सर हे विकार उद्भवतात. डायबेटिक न्यूरोपॅथीमध्ये शरीरातील मज्जातंतूंची हानी होते त्यामुळे स्नायूंची ताकद कमी होते, हातापायात बधिरपणा, संवेदना कमी होणे, मुंग्या येणे, वेदना होतात, मूत्रविसर्जनावर ताबा राहत नाही. संवेदना कमी झाल्यामुळे पायाचे अल्सर होऊ शकतात, जे बरे व्हायला त्रासदायक असतात. कित्येक वेळा पाय गमवायचीसुद्धा वेळ येऊ शकते.
अनियंत्रित मधुमेहाचे शरीरावर होणारे परिणाम –
- हार्ट अटॅक येणे.
- धमनीकठिण्य, उच्च रक्तदाब समस्या निर्माण होते.
- हृदयाचे विविध विकार होतात.
- पक्षाघात (स्ट्रोक) येणे.
- अंधत्व येणे.
- मधुमेहामुळे डोळ्यांचे विविध गंभीर विकार उद्भवतात.
- किडन्या निकामी होतात.
- डायबेटिक न्यूरोपॅथी होऊन पाय गमावणे, हातापायाची शक्ती कमी होणे.
हे गंभीर परिणाम मधुमेहाकडे दुर्लक्ष केल्याने होतात. त्यासाठी प्रत्येकाने नियमित रक्तातील साखरेची तपासणी करुन घ्यावी. मधुमेह असल्यास तज्ञांद्वारा योग्य उपचार करुन घ्यावेत. जेणेकरुन रक्तातील साखर नियंत्रणात राहून वरील गंभीर दुष्परिणामापासून दूर राहता येईल.
Read Marathi language article about Diabetes complications. Last Medically Reviewed on February 22, 2024 By Dr. Satish Upalkar.