डायबेटिक रेटिनोपॅथी – Diabetic retinopathy :

डायबेटिक रेटिनोपॅथी ही स्थिती मधुमेह असलेल्या लोकांच्या डोळ्यातील रेटिनाच्या रक्तवाहिन्याचे नुकसान झाल्यामुळे उद्भवत असते. टाइप 1 किंवा 2 मधुमेह असल्यास व रक्तातील साखर आटोक्यात न ठेवल्यास प्रामुख्याने ही समस्या होत असते. डायबेटिक रेटिनोपॅथीमुळे डोळ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन दृष्टी जाण्याची म्हणजे अंधत्व येण्याची शक्यता अधिक असते. आज अनेक लोकांना अकाली अंधत्व येण्याकरिता डायबेटिक रेटिनोपॅथी हे एक प्रमुख कारण बनत आहे.

डायबेटिक रेटिनोपैथीचे प्रकार :

नॉनप्रोलिवेरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपैथी (NPDR) आणि प्रोलिएरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपैथी (PDR) असे डायबेटिक रेटिनोपैथीचे दोन प्रमुख प्रकार आहेत.

डायबेटिक रेटिनोपैथीची लक्षणे – Symptoms of diabetic retinopathy :

डोळ्याच्या आत मोठे नुकसान होईपर्यंत डायबेटिक रेटिनोपैथीची लक्षणे सुरवातीला दिसून येत नाहीत. साधारणपणे यामध्ये खालील लक्षणे जाणवू शकतात.
• डोळ्यांनी अस्पष्ट दिसू लागणे,
• धूसर दिसू लागणे,
• दृष्टी कमी होणे,
• रात्रीच्यावेळी डोळ्यांनी बघताना अडचणी येणे,
• रंग ओळखण्यात अडचणी येणे,
• दृष्टीसमोर काळा स्पॉट दिसू लागणे अशी लक्षणे यामध्ये जाणवू शकतात.

डायबेटिक रेटिनोपॅथी होण्याची कारणे – Causes diabetic retinopathy :

रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक काळापर्यंत वाढलेले असणे हे डायबेटिक रेटिनोपैथीचे प्रमुख कारण आहे. कारण रक्तातील अनियंत्रित साखर ही डोळयातील पडद्याला (म्हणजे रेटिनाला) रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचे नुकसान करते. अनियंत्रित डायबेटीस प्रमाणेच रेटिनोपैथीसाठी हाय ब्लडप्रेशरची समस्या देखील कारणीभूत ठरत असते.

मधुमेहामध्ये रक्तातील साखरवर योग्य उपचारांनी नियंत्रण न ठेवल्यास, वाढलेल्या ब्लड शुगरमुळे रेटिनाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांवर विपरीत परिणाम होतो. त्याठिकाणी लिकेज होऊन रक्तस्राव होऊ शकतो. त्याचप्रमाणे रेटिनावर सूजसुध्दा यामुळे येत असते. या सर्वांचा परिणाम रेटिनाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर होऊ लागतो.

रेटिनातील रक्तपुरवठा थांबल्याने रेटिनाच्या पेशींपर्यंत ऑक्सिजन आणि प्रोटिन्स न मिळाल्याने रेटिनाचा काही भाग निकामी होऊ लागतो. या समस्येला ‘डायबेटिक रेटिनोपैथी’ असे म्हणतात. यावर वेळीच उपचार होणे आवश्यक असते. कारण उपचार न झाल्यास पुढे कायमस्वरूपी अंधत्वही येऊ शकते.

मधुमेह रेटिनोपैथीचे निदान असे केले जाते :

डायबेटीसचा इतिहास, डोळ्यांची तपासणी आणि लक्षणे यावरून आपले डॉक्टर डायबेटिक रेटिनोपॅथीचे निदान करतील. याशिवाय निदान अधिक स्पष्ट होण्यासाठी फ्लोरोसिन अँजियोग्राफी टेस्ट, ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी (OCT) यासारख्या चाचण्या व तपासण्या केल्या जातील.

डायबेटिक रेटिनोपॅथी आणि उपचार – Diabetic retinopathy treatments :

डायबेटिक रेटिनोपॅथीमुळे झालेले डोळ्यांचे नुकसान भरून काढणे अशक्य असते. डायबेटिक रेटिनोपैथीमध्ये, रेटिनोपैथीचा प्रकार आणि तीव्रता यावर उपचार अवलंबून असतात.

डायबेटिक रेटिनोपैथीमध्ये फोटोकॉग्युलेशन या लेसर सर्जरीद्वारे अंधत्व येण्यापासून रोखण्यास मदत होऊ शकते. यामध्ये रक्तवाहिन्यातील लिकेज दूर केले जातात. याशिवाय रेटिनावरील सूज कमी करण्यासाठीही काही उपचार केले जातील. तयाचबरोबर डायबेटीस आणि हाय ब्लडप्रेशरवर नियंत्रण ठेवण्यासाठीही उपचार योजले जातात.

डायबेटिक रेटिनोपॅथीवर तातडीने उपचार करून घेणे आवश्यक असते. पुणे येथील एशियन आय हॉस्पिटलमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथीवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि अद्ययावत मशिन्स उपलब्ध आहेत.

डायबेटिक रेटिनोपॅथीपासून असा करावा बचाव – Diabetic retinopathy prevention tips :

मधुमेह रुग्णांनी योग्य ती काळजी घेतल्यास डायबेटिक रेटिनोपॅथीसारख्या समस्या होण्यापासून निश्चितच दूर राहता येणे शक्य आहे. यासाठी खालील काळजी घ्यावी.
• मधुमेह असल्यास रक्तातील साखर योग्य आहार, व्यायाम आणि उपचार यांनी आटोक्यात ठेवा.
• ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवा.
• रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित राहील याची काळजी घ्या.
• नियमित ब्लडशुगर, ब्लडप्रेशर, कोलेस्टेरॉल यांची तपासणी करून घ्या.
• नेत्ररोगतज्ज्ञांकडून वर्षातून किमान एकदा आपल्या डोळ्यांची तपासणी करून घ्या.
• स्मोकिंग सारख्या व्यसनांपासून दूर राहा.
• नियमित व्यायाम करा.

मधुमेह संबंधित खालील माहितीही वाचा..
डायबेटीसची लक्षणे, कारणे, प्रकार व उपचार
मधुमेहींसाठी आहार असा असावा
गरोदरपणातील मधुमेह म्हणजे काय?

2 Sources
• What is diabetic retinopathy?
https://aao.org/eye-health/diseases/what-is-diabetic-retinopathy
• Mayo Clinic Staff. Diabetic retinopathy –
https://mayoclinic.com/health/diabetic-retinopathy/DS00447
सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...