काजू – Cashew nuts :
काजू हे सुक्यामेव्यातील एक महत्त्वाचे फळ आहे. काजूगर गोड चवीची असून बलकारक, वातशामक, किंचित पित्त वाढवणारी असतात. काजूगरात अनेक उपयुक्त व्हिटॅमिन्स, अँटी-ऑक्सिडंट आणि खनजतत्वे असतात.
काजूगरात प्रामुख्याने व्हिटॅमिन-E, व्हिटॅमिन-K आणि व्हिटॅमिन-B6, तांबे, फॉस्फरस, झिंक, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी अनेक पोषकतत्वे असतात.
काजूगरात प्रोटिन्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे काजू खाण्यामुळे मांसपेशी बळकट होतात. याच्या सेवनाने रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल आणि triglyceride कमी होण्यास मदत होते. तसेच चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते आणि रक्तदाबही नियंत्रित राहतो. त्यामुळे हृद्याच्या आरोग्यासाठी काजू फायदेशीर असतात. यामुळे हिमोग्लोबिन वाढते, वजन आटोक्यात राहते, हाडे बळकट होतात, कॅन्सरचा धोका कमी करते, केसांचे आरोग्य सुधारते. असे अनेक फायदे काजू खाल्यामुळे होतात.
काजू खाण्याचे 10 आरोग्यदायी फायदे –
1) शारीरिक शक्ती वाढवते..
काजूमध्ये प्रोटिन्स अधिक आहेत. शाकाहारी पदार्थांचा विचार करता काजूमध्ये इतर पदार्थ किंवा धान्यांच्यामानाने प्रोटिन्स अधिक असते. प्रोटिन्समुळे मांसपेशी मजबूत होऊन शारीरिक शक्ती वाढण्यास मदत होते.
2) हार्टसाठी उपयुक्त..
काजूगरात असणाऱ्या मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन-E आणि B6 यांमुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल (LDL कॉलेस्टरॉल) आणि triglyceride चे प्रमाण कमी होण्यास मदत होते. तसेच HDL प्रकारच्या चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवते आणि रक्तदाबही नियंत्रित ठेवते. त्यामुळे हृदयविकार, हार्ट अटॅक, हाय ब्लडप्रेशर, पक्षाघात यासारख्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.
3) हिमोग्लोबिन वाढवते..
काजूगरात लोह भरपूर प्रमाणात असते त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. नियमित काजूगर खाण्यामुळे ऍनिमिया (पांडुरोग) होण्यापासून दूर राहण्यास मदत होते.
4) रक्तवाहिन्याचे कार्य सुधारते..
काजूमध्ये तांबे मुबलक प्रमाणात असल्याने रक्तातील अशुद्धी दूर होण्यास, रक्तवाहिन्याचे कार्य सुधारण्यास मदत होते.
5) कॅन्सरपासून दूर ठेवते..
काजूमध्ये असणाऱ्या Proanthocyanidine
अँटी-ऑक्सिडंट व तांबे यासारख्या घटकांमुळे कॅन्सरपासून दूर राहण्यास मदत होते.
6) डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त..
काजुमध्ये डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारे lutein आणि zeaxanthin हे अँटी-ऑक्सिडंट असतात. त्यामुळे उतारवयात येणारे अंधत्व रोखण्यास मदत होते. दररोज काजूगर खाण्यामुळे मोतीबिंदू होण्याचा धोका कमी होतो.
7) वजन कमी करते..
काजूगर खाण्यामुळे भूक कमी लागते व वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास किंवा वजन आटोक्यात ठेवायचे असल्यास इतर सुक्यामेव्याबरोबर काजूगर खाणे एक चांगला पर्याय ठरू शकतो.
8) पित्ताशयात खडे होत नाहीत..
काजूगर खाण्यामुळे पित्ताशयात खडे होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे ज्यांना पित्ताशयात खडे होण्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी काजूगर उपयुक्त आहेत.
9) त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त..
काजू नियमित खाण्यामुळे केस व त्वचा यांचे आरोग्य सुधारते. त्वचा आणि केसांसाठी काजूगर उपयुक्त असतात.
10) हाडे मजबूत होतात..
काजूत मुबलक प्रमाणात मॅग्नेशिअम आणि तांबे हे घटक असतात. त्यामुळे हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते. नियमित काजू खाण्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका कमी होतो.
काजूगर खाण्याचे नुकसान (Side effects) –
आरोग्यासाठी काजूचे फायदे अनेक असले तरीही काजू अतिप्रमाणात खाल्यास अपचन होऊ शकते. काजूगर खाण्यामुळे काही जणांना ऍलर्जी आणि पित्ताचा त्रास होऊ शकतो.
काजुचा शरीराला योग्य फायदा होण्यासाठी तळलेले किंवा खारवलेले काजूगर खाऊ नयेत. तळल्यामुळे काजुगरातील पोषकघटक कमी होतात तर मीठ लावलेल्या खारट काजूगर खाण्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात मीठ जाऊन हाय ब्लडप्रेशर सारख्या समस्या होऊ शकतात.
काजूतील पोषकघटक (Nutrition Facts) –
1 औंस किंवा 18 काजुगरातील पोषकतत्वे पुढीलप्रमाणे आहेत.
- ऊर्जा – 157 कॅलरीज
- कर्बोदके – 9 .2 ग्रॅम
- प्रथिने (प्रोटीन) – 5.1 ग्रॅम
- फॅट -12.4 ग्रॅम
- कोलेस्टेरॉल – 0%
- फायबर – 1 ग्रॅम
- व्हिटॅमिन E – 0.3 मिलीग्राम
- व्हिटॅमिन K – 9 .5 मिलीग्राम
- व्हिटॅमिन B6 – 0.1 मिग्रॅ
- कॅल्शियम – 10.4 मिलीग्राम
- सोडियम – 3.4 मिलीग्राम
- पोटॅशियम – 187 मिग्रॅ
- मॅग्नेशियम – 83 मिलीग्राम
- फॉलिक ऍसिड – 7 ug
काजुमध्ये असणारे फॅट शरीरासाठी धोकादायक असते का..?
काजुमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते. पण काजुमध्ये असणारे फॅट हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्या फॅटला Good Fat किंवा हेल्दी फॅट असे म्हणतात. शिवाय काजुमध्ये अनेक व्हिटॅमिन्स, खनिजे, क्षार आणि अँटी-ऑक्सिडंट असतात. त्यामुळे हृदयविकार, पक्षाघात, टाईप-2 डायबेटीस ह्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. तसेच काजुमध्ये फॅट असूनही वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.
हे सुध्दा वाचा – बदाम खाण्याचे फायदे जाणून घ्या..
Read Marathi language article about Health benefits and side effects of Cashew nuts. Last Medically Reviewed on March 6, 2024 By Dr. Satish Upalkar.
चांगली माहिती मिळाली
Thanks