गरोदरपणात ब्लिडिंग व स्पॉटिंग होण्याची समस्या..
अनेक प्रेग्नेंट स्त्रियांना योनीतुन रक्तस्राव होत असतो. प्रामुख्याने पहिल्या तीन महिन्यात याचे प्रमाण अधिक असते. योनीतून होणाऱ्या रक्तस्त्रावाचे स्वरूप हे हलकेसे रक्ताचे डाग (स्पॉट) किंवा अधिक प्रमाणात गुठळ्याच्या स्वरूपात रक्तस्राव होऊ शकतो. गरोदरपणात योनीतून अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्यास ते धोकादायक लक्षण असू शकते. अशावेळेस आपल्या डॉक्टरांकडून निदान व उपचार करून घेणे गरजेचे असते.
योनीतून जेंव्हा हलका रक्तस्त्राव झाल्याने रक्ताचे डाग पडत असतात अशावेळी त्याला ‘स्पॉटिंग’ असे म्हणतात. मासिक पाळीच्या अगदी सुरूवातीस किंवा शेवटी येणार्या रक्ताच्या डागांसारखेच यांचे स्वरूप असते. मात्र यात रक्ताचे प्रमाण खूप कमी असते. गर्भावस्थेत काहीवेळा लाल किंवा तपकिरी रंगाचे डाग (spotting) पडू शकतात. तसेच जर योनीतुन अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्यास त्या स्थितीला ब्लिडिंग (bleeding) असे म्हणतात. ब्लिडिंग होत असल्यास सॅनिटरी पॅड वापरण्याची आवश्यकता असते.
गरोदरपणात ब्लिडिंग व स्पॉटिंग होण्याची ही आहेत कारणे..
प्लेसेंटा विकसित होत असताना 5 ते आठ आठवड्यादरम्यान स्पॉटिंग होऊ शकते. यावेळी येणारा रक्तस्राव 3 दिवसापेक्षा अधिक दिवस येत नाही.
याशिवाय हार्मोन्समधील बदलांमुळे, यूटेरीन फाइब्राइड, सर्वाइकल पॉलिप किंवा योनीमार्गातील इन्फेक्शनमुळे स्पॉटिंग होऊ शकते.
गर्भधारणातील सुरुवातीच्या काळात होणारा रक्तस्त्राव हा गर्भपात किंवा एक्टोपिक प्रेग्नन्सी, मोलर गर्भावस्था यामुळे होऊ शकतो. गर्भपात किंवा एक्टोपिक प्रेग्नन्सीमुळे रक्तस्राव झाला असल्यास पोटात अतिशय वेदनाही होत असतात. याशिवाय गरोदरपणात पोटावर आघात झाल्यास, इन्फेक्शन किंवा हाय-ब्लडप्रेशर यांमुळेही योनीमार्गातून रक्तस्राव होऊ शकतो. शेवटच्या तीन महिन्यात गर्भाशयात वार सुटल्यास अधिक प्रमाणात ब्लिडिंग होत असते.
प्रेग्नन्सीमध्ये योनीतून ब्लिडिंग किंवा स्पॉटिंग होत असल्यास काय अशी काळजी घ्यावी :
गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात योनीतून स्पॉटिंग किंवा ब्लिडिंग होणे ही सामान्य बाब आहे. कारण साधारपणे चारपैकी एका गर्भवती स्त्रीला पहिल्या तिमाहीत रक्तस्त्राव होऊ शकतो. मात्र काहीवेळा योनीतून होणारा रक्तस्राव हा गर्भपात किंवा एक्टोपिक प्रेग्नन्सी यासारख्या गंभीर स्थितीमुळेही होऊ शकते. त्यामुळे योनीतून स्पॉटिंग किंवा ब्लिडिंग होत असल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा व दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी.
Read Marathi language article about Pregnancy bleeding and spotting. Last Medically Reviewed on April 4, 2024 By Dr. Satish Upalkar.