बालदमा म्हणजे काय, बालदमाची कारणे, लक्षणे व उपचार जाणून घ्या..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

बालदमाविषयी माहिती – बालदमा म्हणजे काय..?

बालदमा हा लहान मुलांना होणारा श्वसनसंस्थेचा एक आजार आहे. यामध्ये मुलांचे श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनते. त्यातून अधिक प्रमाणात कफाची (Mucus) निर्मिती होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास निर्माण होतो. घशात कफ साठल्याने श्वासोच्छश्वासाच्या वेळी घुरघुर किंवा साँयसाँय (Wheezing sound) असा आवाज योतो. कोणतेही काम करताना मुलाला अधून-मधून धाप लागतो. याठिकाणी बालदमाविषयी माहिती जसे बालदमा का व कशामुळे होतो, त्याची कारणे कोणती आहेत, त्यात कोणती लक्षणे असतात, बालदमा बरा होतो का आणि बालदम्यावर कोणते उपचार उपलब्ध आहेत याची माहिती सांगितली आहे.

बालदम्याची लक्षणे (Symptoms) :

दम्याचे प्रमुख लक्षण म्हणजे दम किंवा धाप लागणे हे असते. अनेकवेळा मुलास लागलेली धाप ही खेळल्यामुळे लागली असेल असे पालकांना वाटते त्यामुळे लहान मुलांमधील दमा सहजतेने लक्षात येत नाही. अनेक मुलांना थोडेसे खेळल्यावर कोरडा खोकला येतो. आलेल्या खोकल्याची उबळही भरपूर वेळ असते आणि खोकल्यानंतर श्वास घेताना शिट्टीसारखा आवाजही येऊ शकतो.

काही मुलांमध्ये सतत सर्दी होते, नाक चोंदले जाते, दम लागतो, श्वास घेताना त्रास होणे ही लक्षणे असतात. तर काही मुलांना वारंवार दम लागतो, छातीत घरघर होते, खोकला होतो, श्वास घ्यायला त्रास होतो, श्वास घेताना आवाज येतो, बोलण्यास त्रास होणे अशी लक्षणे बालदम्यात मुलांमध्ये दिसू शकतात. प्रत्येक मुलाच्या बाबतीत बालदम्याची लक्षणे वेगवेगळी असू शकतात.

बालदम्याचा त्रास केंव्हा जास्त होऊ शकतो..?

अनेकदा बालदमा असणाऱ्या मुलास धुळ, धुर, परागकण, केसाळ पाळीव प्राणी, दमट हवामान, प्रखर सुर्यकिरण, कचरा, थंडगार पदार्थ, हवेतील प्रदूषित कण यांचा संपर्क झाल्यामुळे मुलाची घुटमळ होऊ शकते. हा त्रास काही मिनिटांपासून ते काही तासापर्यंत राहू शकतो. यामुळे लहान बाळांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन बाळ निळे पडू शकते, नाडीचे ठोके बदलतात.

बालदमा होण्याची कारणे (Baladama causes) :

शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीमधील विकृती ही बालदमा होण्याचे प्रमुख कारण असते. लहान मुलांमध्ये श्वसनसंस्थेचे विविध आजारामुळे, वाढलेले हवेचे प्रदूषण, धुळ, धूर आणि ऍलर्जीमुळे बालदमा होऊ शकतो.
अनुवांशिकता हे बालदम्याचे एक कारण असू शकते. मात्र दम्याची अनुवांशिकता असलेल्या प्रत्येक लहान मुलाला बालदमा होईलच असे नाही. त्याचप्रमाणे घरात कुणालाही दमा नसला तरीही बाळाला दमा होऊ शकतो.

अन्य सहाय्यक कारणे (बालदमा ट्रिगर) –
खालिल कारणे ही बालदमा असणाऱ्या मुलांमध्ये अस्थमा अटॅक निर्माण होण्यास सहाय्यक ठरतात.
• ढगाळ वातावरण, हिवाळा व पावसाळा ह्या सारख्या आद्र वातावरणामुळे बालदम्याचा अटॅक येतो,
• ‎धुळ, धुर, धुके, माती, कचरा, बारीक तंतू, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस, पेंट्स, उग्र वास असणाऱ्या पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळे बालदम्याचा अटॅक येतो,
• ‎सिगरेट किंवा इतर प्रकारचा धूरामुळे,
• ‎शारीरीक अतिश्रमामुळे, भरपूर खेळल्यामुळे, अतिव्यायामामुळे,
• ‎वायु प्रदुषणामुळे,
• ‎ताप, सर्दी, फ्लू, घसा सुजणे, ब्राँकायटिस, खोकला यासारखे आजार उत्पन्न झाल्याने बालदम्याचा अटॅक येण्याचा धोका अधिक असतो.

बालदम्याचे निदान कसे करतात..?:

रुग्ण इतिहास, व्यक्त लक्षणे, शारीरीक तपासणीद्वारे मुलांमधील अस्थमाच्या निदानास डॉक्टर सुरवात करतात.
रुग्णाच्या परिवारामध्ये अन्य कोणास दमा आहे का, रुग्णास एलर्जिक रोग झालेला आहे का हे विचारले जाते.
• स्पायरोमेट्री टेस्ट – आपले डॉक्टर मुलाच्या फुफ्फुसांच्या कार्याची तपासणी करण्यासाठी स्पायरोमेट्री नावाची चाचणी करतील. बालदमा ओळखण्यासाठी स्पायरोमेट्री ही चाचणी करतात. त्यात डॅाक्टर मोठा श्वास घ्यायला लावून ठराविक सेकंदामध्ये तो सोडायला लावतात.
• ‎स्टेथिस्कोपद्वारे तपासणी – श्वासोच्छश्वासावेळी सीटी वाजवल्यासारखा आवाज येणे.
• ‎काही वेळा गरज पडल्यास पल्मनरी फंक्शन टेस्ट, छातीचा एक्स- रे, अ‍ॅलर्जीकरिता तपासणी, रक्ताची तपासणीही केली जाईल.

आपल्या मुलास दम्याचा अटॅक आल्यास काय करावे..?

आपण धीर धरा आणि मुलासही धीर द्या. दम्याचा अटॅक आलेल्या मुलास सरळ ताठ बसवावे त्याला झोपू देऊ नका. मुलाचे घट्ट कपडे थोडे सैल करा. डॉक्टरांनी दिलेले रिलिव्हर औषध इनहेलर्सने योग्य प्रमाणात त्वरित द्या. पाच मिनिटे वाट पहा. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास डॉक्टरांनी सल्ला दिल्याप्रमाणे रिलिव्हर औषधाची थोडी मात्रा आणखी द्या. मुलाला तरीही बरे न वाटल्यास डॉक्टरांकडे तात्काळ घेऊन जावे.

बालदम्याचा त्रास होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी..?

मुलांना अस्थमाचा अटॅक येऊ नये यासाठी करावयाचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत.
• योग्य आहार, विहार आणि औषधोपचाराद्वारे बालदम्याच्या अटॅकपासून दूर राहता येते,
• ‎ज्या गोष्टीमुळे आपल्या मुलास दमाचा त्रास जाणवतो (ट्रिगर्स) त्यापासून दूर राहिल्यास दम्याचा त्रास होणार नाही. यासाठी आपल्या मुलास धुळ, धूर, प्रदुषण, घरातील पाळीव प्राणी यांपासून दूर ठेवावे.
• ‎पावसाळा आणि हिवाळ्यात विशेष काळजी घ्यावी.
• ‎प्रखर उन्हामध्ये जाणे टाळावे.
• ‎थंड पदार्थ खाऊ नये, थंड पाणी घेऊ नये.
• ‎मुलास मोकळ्या हवेत खेळण्यास घेऊन जावे.
• ‎विटामिन A आणि D युक्त आहार द्यावा. बदाम, हिरव्या पालेभाज्या आहारात असाव्यात.
• ‎महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांनी दिलेले इनहेलर्स योग्य पद्धतीने वापरावे. अस्थमा इन्हेलर वापरल्याने कोणतेही अपाय होत नाहीत.
• ‎आपले मुल डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे नियमितपणे घेत आहे याची खात्री करा.
• ‎नियमित तपासणीसाठी मुलाला डॉक्टरांकडे घेऊन जावे.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

बालदमा आणि उपचार माहिती (Baldama Treatment) :

इनहेलरच्या योग्य प्रकारे वापराने अस्थम्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होते. रिलिव्हर्स आणि प्रीव्हेण्टर्स अशी दोन्ही प्रकारची औषधे इनहेलरमार्फत देता येतात. डॉक्टरांनी दिलेले इनहेलर्स वापरावे. अस्थम्यामध्ये उपचाराकरिता इनहेलरवाटे औषधे घेणे पूर्णपणे सुरक्षित आहे. जगभरात दम्यावर नियंत्रणासाठी सर्वमान्य पद्धती ही “इन्हेलर” प्रणालीच आहे. याचे कारण म्हणजे गोळ्या व सिरपपेक्षा इन्हेलर जास्त परिणामकारी व निर्धोक आहे. इनहेलरवाटे दिली जाणारी औषधे ही श्वासावाटे थेट फुफ्फुसामध्ये जातात ती रक्तामध्ये मिसळत नाहीत. त्यामुळे शरीरावर त्या औषधांचा दुष्पपरिणाम होत नाही.

अस्थमा संबंधित हे सुद्धा वाचा..
अस्थमा किंवा दमा म्हणजे काय व उपाय
डांग्या खोकला माहिती व उपाय
न्यूमोनिया आजार

Asthma in Children & Infants causes, symptoms, diagnosis and treatment in Marathi.