लहान मुलांमधील लठ्ठपणा मराठीत माहिती (Childhood obesity)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Childhood obesity in Marathi, child obesity causes prevention treatments in Marathi.

मुलांच्या जाडीकडे वेळीच द्या लक्ष..

आतापर्यंत लठ्ठपणा हा विकार विकसित देशांमध्येच  मोठ्या प्रमाणात आढळून येत होता; परंतु आता विकसित देशांबरोबरच भारतासारख्या विकसनशील देशामध्येसुद्धा लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. त्यातसुद्धा लहान मुलांमधील व पौगंडावस्थेतील लठ्ठपणा हा चिंतेचा विषय बनला आहे.

सध्या लहान मुलांमध्ये जाडीचं प्रमाण वाढतयं. लहान वयातील गुटगुटीतपणा जाडीकडे झुकतो आणि पालकांची चिंता वाढते कारण जाडीपोटी अनेक व्याधीही मागे लागतात. म्हणूनच मुलांच्या जाडीकडे वेळीच लक्ष द्यावे. पालक काही खबरदारी घेऊ शकतील.जाडीकडे दुर्लक्ष नको.मुलांचा आहार र्मयादित ठेवा. भूक असेल तेवढेच खायला द्या. खाण्याची जबरदस्ती करणे म्हणजे जाडीला आमंत्रण देण्यासारखे आहे.मुलांच्या खाण्याच्या वेळा नक्की करा. यात अनियमितता असल्यास जाडी वाढते. पुढील गोष्टींकडे लक्ष द्या

लहान मुलांमधील लठ्ठपणा म्हणजे नक्की काय?
सुरुवातीच्या पहिल्या दोन वर्षांत बहुतांश मुले चांगली दिसतात. हा गुटगुटीतपणा बालकांच्या अंगावर असलेल्या बाळशामुळे येतो. जसे बालकांचे वय वाढते तसे त्यांच्या शरीरावरील चरबी कमी होऊन सडपातळ दिसू लागतात. पण काही बालकांमध्ये कुमार वयोगटात प्रवेश करताना आठ ते दहा वर्षांची असताना शरीरातील चरबी कमी होण्याऐवजी वाढतच जाते व मुलांचे वजन आवश्यकतेपेक्षा जास्त वाढलेले आढळते. त्यांच्या शरीरात अतिरिक्त चरबी वाढून अशा मुलांमध्ये लठ्ठपणा येतो. अशा प्रकारे चरबी जमा होण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये आधुनिक काळामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. लठ्ठपणा हा बॉडी मास इंडेक्स (उंचीनुसार वजन) पद्धतीने मोजला जातो.हा बॉडी मास इंडेक्स विशिष्ट वयोगटात विशिष्ट पातळी ओलांडताना आढळल्यास मुलगा लठ्ठ आहे असे अनुमान निघते. मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण भारतामध्ये हळूहळू वाढत आहे. साधारणत: दहा ते पंधरा टक्के एवढ्या लहान मुलांमध्ये लठ्ठपणा आढळून येत आहे.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

लहान मुलांमधील लठ्ठपणाची कारणे :
काही विशिष्ट कारणांमुळे लहान वयातच लठ्ठपणा येतो. उदा. अनुवंशिकता. आई, वडील, आजोबा, आजी यांपैकी एकजण लठ्ठ असणे किंवा सगळेच लठ्ठ असणे, व्यायामाचा अभाव, सतत बसून राहणे, तासन्तास टीव्ही पाहणे, संगणकावर खेळणे, मोबाईलचा सतत वापर करणे, तसेच खेळण्यासाठी व व्यायामासाठी जागेची कमतरता असणे, खाण्याच्या चुकीच्या पद्धती, जास्त प्रमाणात चरबी व कर्बाेदके असलेले पदार्थ खाणे, अति उष्मांक असलेले अन्न खाणे (हाय कॅलरी फूड) उदा. पिझ्झा, बर्गर, वडापाव, समोसा, पॅटीस, आईस्क्रीम, चॉकलेट इत्यादी. आईला असलेला किंवा गर्भारपणामध्ये झालेला मधुमेह, जन्मत:च जास्त वजनाची मुले इत्यादी कारणांमुळे लहान वयातच लठ्ठपणा येतो.

लठ्ठपणामुळे होणारे आजार :
लहान मुलांमधील लठ्ठपणा हा मध्यमवयीन लठ्ठपणापेक्षा अधिक घातक असतो. कारण लहान मुलांमधील लठ्ठपणा पुढील वयातसुद्धा टिकून राहतो. लहान वयातील लठ्ठपणामुळे मुलांमध्ये कमी वयातच हृदयरोग, उच्च रक्तदाब, हाडांचे आजार आणि संधीवात होण्याची शक्यता वाढते. स्वादुग्रंथीवर ताण पडून कमी वयातच मधुमेह होण्याची शक्यता वाढते. मुलींमध्ये पाळीच्या तक्रारी, अंगावर कमी जाणे, पाळी अनियमित होणे, पाळीच न येणे किंवा कमी वयातच पाळी येणे अशी लक्षणे दिसतात. तसेच मुले आत्मविश्वास गमावतात. त्यांना समवयस्क मुले चिडवतात. तसेच त्यांना नोकरीच्या संधी मिळत नाहीत.
यासाठी पालकांनी जी मुले लठ्ठ आहेत, व्यक्तिमत्त्व विकासात मागे पडत आहेत, ज्या मुलांच्या मानेवर काळे चट्टे उमटत आहेत अशा मुलांची तपासणी करून योग्य उपाययोजना करणे आवश्यक असते.
या वयातील लठ्ठपणावर झटपट उपाययोजना नाही. हा जीवनशैलीमुळे उद्भवलेला आजार असून जीवनशैलीत बदल करणे म्हणजेच संतुलित आहार, शारीरिक हालचाल, योग्य व्यायाम या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे सर्व तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करणे आवश्यक आहे.

अनेक मुले दिवसभर फरसाण, चॉकलेटस्‌, बिस्कीटे, टोस्ट वेफर्स असे पदार्थ खातात. त्यामुळे जेवण कमी करतात. याकडेही पालकांनी लक्ष द्यायला हवे. बाजारात निरनिराळी कोल्ड्रिंक्स आणि इतर पेये आली आहेत त्यांची सवय लागू नये किंबहुना ती घेतली नाहीत काही बिघडत नाही. मिसळ, वडापाव हेही नेहमी टाळावे. मुलांमध्ये आहार संतुलित हवा, म्हणजे आहाराचे सर्व घटक योग्य प्रमाणात हवेत.