डांग्या खोकला – Whooping cough :

डांग्या खोकला हा श्वसन संस्थेचा एक गंभीर असा संसर्गजन्य आजार आहे. डांग्या खोकला या आजाराला Whooping cough किंवा पेरट्युसिस (pertussis) असेही म्हणतात. डांग्या खोकला हा बोर्डेटेला पर्ट्युसिस नावाच्या जीवाणूमुळे (बॅक्टेरियामुळे) होतो. या बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्यामुळे तीव्र आणि अनियंत्रित खोकला येतो त्यामुळे रुग्णाला श्वास घेताना अधिक त्रास होऊ लागतो.

डांग्या खोकला हा आजार कोणत्याही वयाच्या लोकांना त्रासदायक असाच असतो. परंतु त्यातही नवजात बालक आणि लहान मुलांसाठी डांग्या खोकला आजार अत्यंत घातक ठरू शकतो.

डांग्या खोकल्याची लक्षणे – Whooping cough symptoms :

डांग्या खोकल्यात सुरवातीला सर्दी होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे, खोकला येणे आणि ताप येणे अशी लक्षणे असतात.

दोन आठवड्यांनंतर कोरडा व सतत खोकला येत असतो. ज्यामुळे श्वास घेणे खूप अवघड होते. खोकल्यातून घट्ट बेडके येत असतात. उलटी होऊ शकते. सततच्या खोकल्यामुळे श्वास घेताना “हूप” असा विशिष्ट आवाज येत असतो. म्हणून या आजाराला बोलीभाषेत माकड खोकला या नावानेही ओळखले जाते. डांग्या खोकल्यात बरेच दिवस खोकल्याची उबळ येत असते.

डांग्या खोकला होण्याची कारणे – Whooping cough causes :

डांग्या खोकला हा एक संसर्गिक आजार असून तो Bordetella Pertussis या बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे होत असतो. डांग्या खोकला हा अत्यंत संसर्गजन्य असा आजार असून बाधित व्यक्तीच्या खोकला व शिंकेद्वारे याचे जीवाणू हवेत सहजपणे पसरू शकतात आणि त्यामुळे इतर व्यक्तींनाही याची लागण होऊ शकते.

डांग्या खोकल्याचे निदान व तपासणी :

डांग्या खोकल्याचे लक्षणांवरून निदान होण्यास मदत होते. याशिवाय छातीचा एक्स-रे, खोकल्यातील बेडक्याची किंवा घशातील स्रावांची तपासणी आणि रक्त तपासणी करून याचे निदान केले जाते.

डांग्या खोकल्यावर असे करतात उपचार – Whooping cough treatments :

डांग्या खोकला हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा सांसर्गिक रोग आहे. त्यामुळे डांग्या खोकल्याची लक्षणे जाणवल्यास कृपया आपल्या डॉक्टरांकडून दवाखान्यात जाऊन उपचार करून घ्यावेत. कोणतेही घरगुती उपाय करीत वेळ वाया घालू नये. डांग्या खोकला असल्यास उपचारासाठी डॉक्टर अँटिबायोटिक्स औषधे देतील. शिवाय खोकला, ताप ही लक्षणे कमी करण्यासाठीही औषधे देतील.

डांग्या खोकला प्रतिबंधात्मक उपाययोजना :

डांग्या खोकला होऊ नये म्हणून काय करावे, डांग्या खोकला होण्यापासून बचाव करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याची माहिती पुढे दिली आहे.

डीपीटी लसीकरणामुळे डांग्या खोकला होण्यापासून बचाव करणे शक्य आहे. डांग्या खोकला हा आजार होऊ नये यासाठी आपल्या लहान मुलांना डीपीटी म्हणजेचं त्रिगुणी लस टोचून घ्यावी. ही लस टोचल्यावर डांग्या खोकला हा आजार मुलांना कधीही होत नाही.

डांग्या खोकला संबंधित खालील आजारांचीही माहिती जाणून घ्या..
दमा आजाराची कारणे, लक्षणे व उपचार
क्षयरोग (TB) मराठीत माहिती


Whooping cough causes, symptoms & treatments information in Marathi

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...