तोंडाला दुर्गंधी येणे (Bad Breath) :
तोंडातून घाण वास येण्याची समस्या काहीजणांना असते. याला मुखदुर्गंधी (Halitosis) असेही म्हणतात. मुखदुर्गंधीची समस्या ही अगदी सामान्य असली तरीही यामुळे चारचौघात वावरताना अडचणी येत असतात. यासाठी खाली तोंडाला दुर्गंधी येण्याची कारणे व उपाय याविषयी माहिती दिली आहे.
तोंडाला घाण वास येण्याची कारणे :
प्रामुख्याने दात व तोंडाची व्यवस्थित स्वच्छता न ठेवल्यामुळे ही समस्या होत असते. कारण तोंडाची स्वच्छता न ठेवल्यास अन्नाचे कण दातांच्या फटीत अडकून राहतात व तेथेच ते बॅक्टेरियामुळे सडतात. त्यामुळे तोंडातून घाण वास येऊ लागतो. याशिवाय खालील काही कारणांमुळेही मुखदुर्गंधी होऊ शकते.
- बद्धकोष्ठता किंवा पोट नियमित साफ होत नसल्यामुळे,
- उग्र वास असणारे कांदा, लसूण यासारखे पदार्थ खाण्यामुळे,
- धूम्रपान, तंबाखू, गुटखा यांच्या सेवनामुळे,
- अतिप्रमाणात चहा, कॉफी पिण्यामळे,
- तोंड कोरडे पडण्याची समस्या असल्यास,
- सायनसचा त्रास, सर्दी, खोकला यांमुळे,
- डायबेटीस, किडनीचे विकार, GERD यासारख्या आजारामुळेही तोंडातून घाण वास येत असतो.
मुख दुर्गंधी येऊ नये यासाठी अशी घ्यावी काळजी :
- दात व्यवस्थित घासावेत.
- दात घासताना आपल्या तोंडाची,
- जिभेची स्वच्छता करावी. यासाठी टंग क्लीनरचा वापर करावा.
- कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात.
- रात्री झोपण्यापूर्वीही दात घासावेत.
- धूम्रपान, तंबाखू, गुटखा यासारख्या व्यसनांपासून दूर राहावे.
- वारंवार चहा, कॉफी पिणे टाळावे.
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी घरगुती उपाय :
तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी थोडे धने तोंडात ठेवून चावत राहावेत. यामुळे तोंडातून येणारा घाण वास कमी होण्यास मदत होते. याप्रमाणेच मुख दुर्गंधीसाठी उपाय म्हणून आपण लवंग, वेलची किंवा बडीशेपसुद्धा चावून खाऊ शकता. तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी हे उपाय उपयुक्त ठरतात.
तसेच तुळशीची काही पाने किंवा पेरूची पाने चावत राहिल्यामुळेही मुखदुर्गंधीची समस्या दूर होण्यास मदत होते. मुख दुर्गंधीवर वरील सर्व आयुर्वेदिक उपाय खूप उपयोगी असतात.
हे सुद्धा वाचा..
तोंडाला चव येण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घ्या.
Read Marathi language article about Bad Breath causes and home remedies. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.