आम्लपित्त होणे :
आम्लपित्ताचा त्रास अनेक लोकांना असतो. पित्त वाढवणारे आहार पदार्थ अधिक खाण्यामुळे हा त्रास होतो. आम्लपित्तामुळे छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे असे त्रास होत असतात.
आम्लपित्त का व कशामुळे होते?
अनेक कारणांमुळे आम्लपित्त होऊ शकते. त्याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
- मसालेदार भोजन, जास्त तिखट, खारट, तेलकट पदार्थ अधिक खाण्यामुळे,
- चहा-कॉफी, कोल्ड्रिंक्स वारंवार पिण्यामुळे,
- बराच वेळ उपाशी राहिल्याने,
- जेवण वेळेवर न घेणे,
- धूम्रपान, तंबाखू, मद्यपान अशी व्यसने करणे,
- मानसिक तणाव,
- जागरण,
- वेदनाशामक औषधे म्हणजे डोकेदुखी व अंगदुखीच्या गोळ्या वरचेवर घेत राहिल्याने पोटातील आम्लाचे प्रमाण वाढून आम्लपित्त होत असते.
आम्लपित्ताची लक्षणे :
आम्लपित्तामुळे छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे, मळमळ, डोकेदुखी असे त्रास व लक्षणे यामुळे जाणवतात.
आम्लपित्त झाल्यावर हे घरगुती उपाय करा :
आले –
आम्लपित्तावर आले खूप उपयुक्त ठरते. यासाठी आम्लपित्त झाल्यास आल्याचा तुकडा चावून खावा.
थंड दूध –
थंड दूध पिण्यामुळे आम्लपित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते. याशिवाय दुधात मनुका घालून उकळून ते दूध थंड झाल्यावर प्यावे व मनुकाही खाव्यात.
केळे –
केळ्यात नैसर्गिकरीत्या Antacids असतात त्यामुळे ते आम्लपित्त वर गुणकारी ठरते. त्यामुळे आम्लपित्ताचा त्रास होत असल्यास केळे जरूर खावे.
तुळशीची पाने –
तुळशीची काही पाने चावून खाल्यास जळजळ थांबते व आम्लपित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.
आम्लपित्ताच्या रुग्णांनी अशी घ्यावी काळजी :
आम्लपित्ताचा त्रास होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी याची माहिती खाली दिली आहे.
- एकावेळी भरपेट जेवणे टाळावे.
- जेवणाच्या वेळा पाळाव्यात.
- मसालेदार पदार्थ, आंबवलेले पदार्थ, जास्त तिखट पदार्थ, लोणची, कच्चा टोमॅटो, कच्चा कांदा, ओलं खोबरं, पापड, अति मांसाहार, हरभऱ्याची डाळ हे पदार्थ शक्यतो खाऊ नयेत.
- चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स वारंवार पिणे टाळा.
- मद्यपान, धूम्रपान, तंबाखू ही व्यसने करणे टाळा.
- पुरेसे पाणी म्हणजे दिवसभरात साधारण आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
- नियमित व्यायाम करावा.
- मानसिक ताण घेऊ नये.
- रात्री न जागणे व दिवसा न झोपणे.
- डाव्या कुशीवर झोपावे.
- वारंवार वेदनाशामक गोळ्या घेणे टाळावे.
हे सुद्धा वाचा – पित्तामुळे डोके दुखत असल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घ्या.
Read Marathi language article about Acidity Causes and Home remedies. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.