प्रसूतीनंतरची धोकादायक लक्षणे :
डिलिव्हरीनंतर अनेक स्त्रियांना काहीनाकाही त्रास होऊ शकतात. प्रसूतीनंतर कोणती लक्षणे किंवा त्रास जाणवत असल्यास बाळंतीणीने डॉक्टरांकडे जावे याविषयी माहिती खाली दिली आहे.
योनीतुन अतिरक्तस्राव होणे –
प्रसूतीनंतर रक्तस्त्राव होणे ही सामान्य बाब आहे. प्रसूतीनंतर साधारण 6 आठवड्यापर्यंत असा रक्तस्त्राव होत असतो. मात्र जर योनीतुन अचानक अधिक प्रमाणात रक्तस्राव होत असल्यास ते पोस्टपार्टम हेमरेजचे धोकादायक लक्षण असू शकते. यामुळे खालील लक्षणे असल्यास तात्काळ दवाखान्यात जावे.
- अचानक जास्त प्रमाणात न थांबणारा रक्तस्राव होणे,
- एका तासामध्ये एकापेक्षा जास्त पॅड बदलावे लागणे,
- येणाऱ्या स्त्रावातून रक्ताच्या गुठळ्या बाहेर येणे,
- अशक्तपणा किंवा बेशुद्धी व चक्कर येणे,
- हृदयाचे ठोके वाढणे, अशी लक्षणे असल्यास ताबडतोब दवाखान्यात जावे किंवा रुग्णवाहिका बोलावून घ्यावी.
बाळंतपणानंतर तीव्र डोकेदुखणे –
प्रसूतीनंतर तीव्र डोकेदुखी होणे हे प्री-एक्लेम्पसियाचे लक्षण असू शकते.
- त्यामुळे जर आपल्याला डोकेदुखीबरोबरच खालील त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.
- अस्पष्ट व अंधुक दिसणे
- उलट्या होणे,
- छातीत तीव्र जळजळ होणे,
- पायाच्या घोट्याजवळ सूज येणे,
प्री-एक्लेम्पसियाची लक्षणे ही प्रामुख्याने प्रसूतीच्या 72 तासांच्या आत आढळतात.
डिलिव्हरी नंतर पोटात दुखणे –
प्रसुतीनंतर अत्यंत कमी स्त्रियांना HELLP syndrome ही समस्या होऊ शकते. यामुळे पोटाच्या वरील उजव्या भागात तीव्र वेदना होणे, अशक्त वाटणे, डोकेदुखणे असे त्रास जाणवू शकतात. अशी लक्षणे जाणवू लागल्यास रुग्णवाहिका बोलवावी किंवा जवळच्या दवाखान्यात जावे.
डिलिव्हरी नंतर श्वास घेण्यास त्रास होणे –
प्रसुतीनंतर काही दिवसांनी श्वास घेताना त्रास होणे, खोकल्यातून रक्त येणे अशी लक्षणे असल्यासही त्याकडे दुर्लक्ष करू नये. पल्मनरी एम्बोलिज्ममुळे ही समस्या होऊ शकते यावरही ताबडतोब उपचार होणे आवश्यक असते.
प्रसुतीनंतर तीव्र ताप येणे –
विशेषतः 100.4 डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त ताप आल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण इन्फेक्शनमुळे जास्त ताप येऊ शकतो. तापाबरोबर तीव्र पोटदुखी, योनीतुन दुर्गंधीयुक्त स्त्राव येणे, स्तनात वेदना होणे, सिझेरियनच्या टाक्यांची जागा लाल व जास्त वेदनायुक्त होणे. त्यातून पु किंवा पाणी येणे, लघवीला जळजळ आणि वेदना होणे अशी लक्षणे असल्यास रुग्णवाहिका बोलवावी किंवा जवळच्या दवाखान्यात जावे.
बाळंतपणानंतर पायाच्या पेटऱ्या दुखणे –
प्रसूतीनंतर पायाच्या पेटऱ्याच्या ठिकाणी रक्त जमा होऊन डीप वेन थ्रोम्बोसिसची समस्या होऊ शकते. यामुळे त्याठिकाणी सूज व वेदना होऊ शकतात. असा त्रास असल्यासही डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.
बाळंतपणात इन्फेक्शन होणे –
प्रसूतीनंतर जंतुसंसर्ग किंवा इन्फेक्शन झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे अत्यंत धोकादायक ठरते. प्रसूतीनंतर इन्फेक्शन खालीलप्रमाणे होऊ शकतो.
- प्रसूतीनंतर गर्भाशयात इन्फेक्शन झाल्यास दुर्गंधीयुक्त स्त्राव योनीतुन होऊ लागतो.
- सिझेरियन झाल्यास टाक्यांची काळजी न घेतल्यास तेथे इन्फेक्शन होऊन पु धरू शकतो. यामुळे घाण पाणी किंवा पु तेथून येऊ लागतो.
- नॉर्मल डिलिव्हरीमध्ये योनी आणि गुदाच्या ठिकाणी जखम झाल्यास किंवा टाके घातलेले असल्यास योग्य काळजी न घेतल्यास इन्फेक्शन होऊन पु धरू शकतो.
- स्तनामध्ये दुधाची गाठ होऊन Mastitis मुळे इन्फेक्शन होऊन तेथे पु धरू शकतो.
त्यामुळे अशाप्रकारे इन्फेक्शनची लक्षणे दिसून येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे जावे.
बाळंतपणानंतर मानसिक ताण येणे –
डिलिव्हरीनंतर मानसिक तणाव, भीती वाटणे, नकारात्मक भावना, चिडचिड होणे किंवा राग येणे अशा मनामध्ये विविध समस्या होत असल्यास त्याकडेही दुर्लक्ष करू नये. आपल्या डॉक्टरांना मनातील समस्याही सांगा ते निश्चितच योग्य मदत करतील. प्रसूतीनंतर हार्मोनल बदलामुळे अशा मानसिक समस्या होणे स्वाभाविक असते. त्यामुळे डॉक्टरांशी आपल्या समस्याबद्दल संवाद साधा.
हे सुध्दा वाचा..
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
In this article information about After delivery health problems & Warning signs in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).
प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.