Dr Satish Upalkar’s article about Postpartum Diet Plan in Marathi.

बाळंतीणीचा आहार :

गरोदरपणात जसे आहाराचे महत्त्व असते तसेच ते बाळंतपणानंतरही असते. प्रसूती नंतर शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी पोषक आहार घेणे आवश्यक असते. तसेच बाळाचे पोषण हे आईच्या दुधावरच होणार असते. त्यामुळे आईने पोषक आहार घेतल्यास बाळाचे योग्यप्रकारे पोषण होण्यास मदत होत असते. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी बाळंतपणानंतर कोणता आहार घ्यावा, यावेळी काय खावे व काय खाऊ नये याची माहिती सांगितली आहे.

डिलिव्हरी नंतरचा आहार कसा असावा..?

बाळास स्तनपान करत असल्यामुळे आईला डिलिव्हरीनंतर आहारातून प्रोटिन्स, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स असे पोषकघटक मिळणे आवश्यक असते. यामुळे प्रसुतीमध्ये शरीराची झालेली झीज भरून निघते. तसेच स्तनपानातून बाळाचे योग्यरित्या पोषण होण्यास मदत होते.

बाळंतपणात कोणते पदार्थ खावेत..?

1) दूध व दुधाचे पदार्थ –
दूध व लोणी, तुप इत्यादि दुधाचे पदार्थ आहारात असावेत. दूध व दुधाच्या पदार्थांत बाळ आणि बाळंतीण यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त अशी अनेक पोषकघटक असतात. तसेच त्यामुळे आईचे दूध वाढण्यासही मदत होते. त्यामुळे डिलिव्हरी नंतर आईने दुग्धजन्य पदार्थ जरूर खावेत.

2) हिरव्या भाज्या –
हिरव्या भाज्यात फायबर्स, लोह आणि व्हिटॅमिन्स मुबलक असतात. बाळंतपणानंतर आहारात मेथी, पालक, शेपू आणि इतर हंगामी भाज्या असाव्यात. विशेषतः मेथीची भाजी आवर्जून खावी. यामुळे आईला पर्याप्त मात्रेत दूध येण्यास मदत होते. याशिवाय विविध फळे, फळभाज्या, शेंगभाज्या यांचा बाळंतपणात आहारात समावेश करू शकता.

3) धान्ये व कडधान्ये –
प्रसुती नंतर आहारात नाचणी, ओट, तांदूळ, गहू, बाजरी यासारखी धान्ये व मूग, मसूर ह्या सहज पचणाऱ्या डाळींचा समावेश असावा. ह्या धान्य व कडधान्यपासून बनवलेले भात, वरण, डाळ, भाकरी, पोळी, चपाती, शिरा, उपमा, खीर, रव्याची किंवा आळीवाची गंजी असे पदार्थ आहारातून खाऊ शकता.

4) सुकामेवा –
बाळंतपणात आईला दूध भरपूर येण्यासाठी आहारात डिंकाचे लाडू, मेथीचूराचे लाडू, अळीव, खारीक, खसखस, काळे तीळ, पांढरे तीळ, गूळ, खोबरे, बदाम हे पदार्थ आहारात असावेत.

5) मांसाहार –
मांसाहार करीत असल्यास बाळंतपणातील आहारात मटण, पायासूप, मासे, अंडी यांचा समावेश करू शकता. यामुळेही आवश्यक असे प्रोटिन्स, खनिजे, कॅल्शियम मिळण्यास मदत होईल.

6) पाणी –
आहाराबरोबर दररोज पुरेसे पाणी पिणेही आवश्यक आहे. पाण्यामुळे डिहायड्रेशन होत नाही, शरीरातील अशुद्धी लघवीवाटे बाहेर निघण्यास मदत होते. दिवसभरात किमान आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. यामुळे दुधाची निर्मितीही योग्य प्रकारे होण्यास मदत होते. पिण्यासाठी पाणी वापरताना ते फिल्टरचे किंवा उकळवून कोमट केलेले असावे.

जेवणानंतर घेतलेला आहार सहज पचावा यासाठी बाळंतशेपा, बडीशेप व ओवा यांचे मिश्रण अर्धा चमचा ह्या प्रमाणात जरूर खावे.

बाळंतपणात काय खाऊ नये..?

  • बाहेरचे उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत.
  • जास्त मसालेदार पदार्थ, पचनास जड असणारे पदार्थ खाऊ नयेत.
  • वारंवार मिठाई, बिस्किटे, बेकरी प्रॉडक्ट्स, तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
  • शक्यतो काही दिवस दही, वांगे, गवार, बटाटा, मटकी, मटार, लोणचे असे पदार्थ खाऊ नयेत.
  • फ्रिजमधील थंडगार पाणी व कोल्ड्रिंक्स पिऊ नयेत.

हे सुध्दा वाचा..

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

In this article information about After delivery diet tips in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).


प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...