तोंडाला चव नसणे (Anorexia) :
तोंडाला चव लागत नाही अशी अनेकांची तक्रार असते. विशेषतः एखाद्या आजारातून बरे झाल्यावर तोंडाची चव जात असते. अशावेळी जेवण जात नाही तसेच काहीही खाण्याची इच्छा होत नाही, अन्न कडू लागत असते.
तोंडाची चव जाण्याची कारणे :
- विविध आजारांमुळे तोंडाची चव जाते. जसे, सर्दी, ताप, काविळ, पोटाचे आजार, उलटी, अपचन, बद्धकोष्ठता, कृमींचा त्रास, पोटात गॅस होणे, पित्ताशयात खडे होणे (gallstone), मधुमेह अशा अनेक आजारांत तोंडाची चव जात असते.
- गरोदरपणात होणाऱ्या हार्मोन्स मधील बदलांमुळे काही स्त्रियांना तोंडाला चव लागत नाही.
- अनेक औषधांमुळेही तोंडाची चव जात असते. विशेषतः अॅण्टीबायोटिक्स, अॅण्टीफंगल्स, आणि Muscle relaxant औषधांमुळे चव लागत नाही.
- रोज तेच ते पदार्थ खाल्याने देखील कंटाळा येऊन तोंडाची चव जात असते.
- जिभेची स्वच्छ्ता न ठेवल्याने तोंडाची चव जात असते.
तोंडाची चव जाणे याची अशी वेगवेगळी कारणे असतात.
तोंडाची चव जाणे याची लक्षणे –
तोंडाची चव गेल्यास अन्न कडू लागणे, तोंड कडवट होणे, काहीही खाण्याची इच्छा न होणे, मळमळ किंवा उलटी झाल्यासारखे वाटणे अशी लक्षणे यामध्ये असतात.
तोंडाला चव येण्यासाठी हे खावे :
तोंडाला चव नसल्यास आवडीचे पदार्थ खावेत. जेवणात रोज तेचं पदार्थ असल्यास ते पदार्थ खावेसे वाटत नाहीत. अशावेळी जेवणात वेगवेगळे पदार्थ समाविष्ट करावे. तोंडाला चव येण्यासाठी विविध चटण्या, लोणची, दही यांचा आहारात समावेश करू शकता. सैंधव मीठ घालून तयार केलेली तिळाची चटणी दहीभातात घालून खाल्यास तोंडाला रुची येते.
तोंडाला चव येण्यासाठी घरगुती उपाय –
दोन ते तीन काळी मिरी आणि लवंग एकत्रित चावून खावी. यामुळे जिभेतील स्वादग्रंथी सक्रिय होऊन तोंडाला रुची येण्यास व भूक लागण्यास मदत होते.
याशिवाय हिंगापासून बनवलेलं ‘हिंग्वाष्टक चूर्ण’ हे आयुर्वेदिक औषध अन्नावरील वासना गेल्यास, तोंडाला चव येण्यासाठी खूप उपयोगी आहे. आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरमध्ये ‘हिंग्वाष्टक चूर्ण’ हे औषध उपलब्ध असते. जेवताना तूप आणि हिंग्वाष्टक चूर्ण घालून भात खाल्यास तोंडाला रुची येऊन, भूक चांगली लागते व अन्नाचे पचनही व्यवस्थित होते.
तोंडाला चव येण्यासाठी काय करावे ..?
- आवडीचा आहार घ्या.
- नियमित व्यायाम करा. व्यायामाने भूक लागत असल्याने तोंडाला चव येण्यासाठी व्यायाम उपयोगी पडतो.
- धूम्रपान, तंबाखू, मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहावे.
- चहा, कॉफी वारंवार पिणे टाळावे. यामुळे भूक कमी होते व तोंडाला चव येत नाही.
- दात घासताना जीभसुद्धा स्वच्छ करावी.
- एक दोन मिनिटे कोमट पाण्याने गुळण्या करणेही उपयुक्त असते.
हे सुद्धा वाचा – भूक लागत नसल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घ्या.
Read Marathi language article about Anorexia Causes, Symptoms, Treatments and Home remedies. Last Medically Reviewed on February 23, 2024 By Dr. Satish Upalkar.