कमी वजनाचे बाळ (Low Birth Weight) :
बाळाचे वजन कमी आल्यास त्याची काळजी अधिक वाटत असते. कारण जन्माच्या वेळेस बाळाचे वजन सामान्य असणे महत्वाचे असते. मात्र अनेक बाळांचे जन्मवेळी वजन हे खूपच कमी असते. कमी वजनाच्या बाळांची रोगप्रतिकारक शक्ती थोडी कमजोर असते. त्यामुळे अशा कमी वजनाच्या बाळांची अधिक काळजी घ्यावी लागते.
जन्मावेळी बाळाचे वजन किती असावे..?
प्रेग्नन्सीच्या 37 ते 40 आठवड्यांच्या दरम्यान डिलिव्हरी होऊन बाळाचा जन्म झाल्यास अशा बाळांचे वजन हे सामान्य असू शकते. कारण अशा बाळांची गर्भाशयात वाढ आणि विकास योग्यप्रकारे झालेला असतो. साधारणपणे जन्मावेळी अडीच किलो ते चार किलोपर्यंत बाळांचे वजन असणे आवश्यक असते.
जन्मावेळी काही बाळांचे वजन सामान्यपेक्षा कमी असू शकते. अशा बाळांना खालील प्रमाणे दोन प्रकारात विभागले जाते.
1) कमी वजनाचे बाळ – यामध्ये बाळाचे वजन हे दीड ते अडीच किलो दरम्यान असते.
2) अतिशय कमी वजनाचे बाळ – यामध्ये बाळाचे वजन हे दिड किलोपेक्षा कमी असते.
बाळाचे वजन कमी असण्याची कारणे :
काही कारणांनी 37 आठवड्यापूर्वीच डिलिव्हरी करावी लागल्यामुळे वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळांचे वजन प्रामुख्याने कमी असते.
याशिवाय गर्भाशयात बाळाला योग्यप्रकारे पोषण न मिळाल्यास जन्मणाऱ्या बाळांचे वजन कमी असते. आईने गरोदरपणात मद्यपान, धूम्रपान, तंबाखू अशी व्यसने केल्यामुळेही बाळाचे वजन कमी भरत असते.
कमी वजनाच्या बाळाची चिन्हे व लक्षणे :
जन्मलेल्या बाळाचे वजन दीड कीलोपेक्षा कमी असणे हे कमी वजनाच्या बाळाचे प्रमुख लक्षण असते. याशिवाय जन्मावेळी बाळाची ऑक्सीजन लेव्हल कमी असणे, ते दूध पिण्यास असमर्थ असणे अशी काही लक्षणे अशा बाळामध्ये असतात.
कमी वजनाच्या बाळाची काळजी कशी घ्यावी?
बाळाचे वय 0 ते 6 इतके महिने असल्यास बाळास पुरेशा प्रमाणात आईचे दूध दिले पाहिजे. आईच्या दुधात सर्व प्रकारचे पोषकघटक असतात. त्यामुळे कमी वजनाच्या बाळाला स्तनपान हे दिलेच पाहिजे. शक्य तितक्या वेळा बाळाला स्तनपान द्यावे, जेणेकरून बाळाचे वजन योग्यरित्या वाढेल.
सहा महिन्यांनंतरच्या बाळाचे वजन कमी असल्यास बाळाला योग्य तो पोषक पूरक आहार द्यावा. यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. बाळ वेळच्यावेळी आहार खाईल याकडेही लक्ष द्यावे. सहा महिन्यानंतर बाळाचा आहार कसा असावा याची माहिती जाणून घ्या..
हे सुद्धा वाचा..
नवजात बाळाचे वजन कसे वाढवावे ते जाणून घ्या..
Read Marathi language article about Low Birth Weight baby care tips. Last Medically Reviewed on March 11, 2024 By Dr. Satish Upalkar.