लहान बाळाचे आहार व पोषण :

आहाराच्या बाबतीत लहान बालकांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. बाळाच्या शारीरिक गरजेनुसार त्याला योग्य पोषक आहार मिळणे आवश्यक असते. बालकाचे योग्य प्रकारे पोषण न झाल्यास त्याच्या आरोग्याच्या अनेक तक्रारी होऊ शकतात. यासाठी येथे लहान बाळाला कोणता आहार दिला पाहिजे याविषयी माहिती दिली आहे.

बाळाचा सुरवातीचा पूरक आहार :

जन्मल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात आईचे दूध हाचं बालकाचा प्रमुख आहार असतो. बाळाला सहा महिने झाल्यावर आईच्या दुधाबरोबरचं काही पूरक आहार देणेही आवश्यक असते. या आहाराला ‘बाळाचा पूरक आहार’ असे म्हणतात. बाळाची पचनशक्ती विचारात घेऊन सुरवातीला पातळ आहार देऊन हळूहळू ठोस आहार सुरू करणे अपेक्षित असते.

बाळाला सहा महिने झाल्यावर आईचे दूध देणे का कमी करावे लागते..?

बाळ जन्मल्यानंतर सुरवातीचे सहा महिने बाळास केवळ आईचे दूध देणे आवश्यक असते. त्यावेळी बाळास आईच्या दुधातून सर्व ती पोषकतत्वे मिळत असतात. मात्र सहा महिन्यानंतर जसजसे बाळ वाढत असते, तसतसे त्यास अधिक पोषण मिळण्याची आवश्यकता असते. 

अशावेळी, केवळ आईचे दूध हे त्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुरेसे पडत नाही. त्यामुळे सहा महिने झाल्यावर बाळास हळूहळू आईचे दूध कमी करणे व इतर ठोस आहार देणे गरजेचे असते. तसेच ठोस आहार देत असताना त्याच्या जोडीला बाळ किमान एक वर्षांचे होईपर्यंत स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध देणे अधिक चांगले असते.

6 व 7 महिन्यातील बाळाचा आहार –

या वयातील बाळांसाठी दिवसातून चार ते पाचवेळा स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध द्यावे. याबरोबरचं दिवसातून दोन ते तीन वेळा पातळ आहार बाळास भरवावा. आहार चावता येत नसल्याने बाळाला दात येईपर्यंत थोडा पातळ आहार देणे आवश्यक असते. यासाठी आहारात,
• तांदूळ किंवा नाचणीपासून दूध घालून बनवलेली पौष्टिक खीर बाळाला द्यावी.
• डाळ शिजवून पातळ करून बाळास भरवावी.
• मऊ शिरा किंवा उपमा, पातळ खिचडी बाळास भरवावी.
• बटाटा, मटार, रताळे, सफरचंद यासारख्या भाज्या किंवा फळे चांगल्याप्रकारे उकडून, कुस्करून पातळ लगदा करून बाळास भरवावा.
• केळे, चिक्कू या फळांचा गर कुस्करून बाळास भरवावा.
• बाळाच्या आहारात तूप, लोणी असे दुधाचे पदार्थ समाविष्ट करावेत.
• सहा महिन्यांपासून बाळांना फिल्टरचे किंवा उकळवून थंड केलेले पाणी देऊ शकता.

8 व 9 महिन्यातील बाळाचा आहार –

या वयातील बाळांसाठी दिवसातून तीन ते चारवेळा स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध द्यावे. याबरोबरचं दिवसातून तीन ते चार वेळा मऊ आहार बाळास भरवावा.
• कुस्करलेली डाळ भात वरण, कुस्करलेली भाजी आहारात असावी.
• भात, नाचणी, ओट्स ही धान्ये व डाळी शिजवून थोडे मऊ करून बाळास भरवावे.
• दहीभात, वरणभातात तूप घालून भरवू शकता.
• मऊ शिरा किंवा उपमा, खिचडी बाळास भरवावी.
• गाजर, भोपळा, बटाटा, मटार, रताळे, सफरचंद यासारख्या भाज्या किंवा फळे चांगल्याप्रकारे उकडून, मऊ लगदा करून बाळास भरवावा.
• बाळाच्या आहारात तूप, लोणी असे दुधाचे पदार्थ समाविष्ट करावेत.
• केळे, आंबा, टरबूज, चिक्कू या फळांचा गर कुस्करून बाळास भरवावा.

10 ते 12 महिन्यापर्यंतच्या बाळाचा आहार –

या वयातील बाळांसाठी दिवसातून दोन ते तीनवेळा स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध द्यावे. याबरोबरचं दिवसातून चार ते पाच वेळा ठोस आहार बाळास भरवावा. डाळ भात वरण, भाजी, चपाती, फळे, दुधाचे पदार्थ, मऊ मांस, मासे, अंडे यांचा समावेश आहारात असावा.
• मऊ शिरा, उपमा, साबुदाणा खिचडी किंवा तांदूळ वा नाचणीची खीर भरवावी.
• दहीभात किंवा तूप घालून वरणभात, डाळभात भरवावी.
• गाजर, भोपळा, बटाटा, मटार, रताळे, सफरचंद यासारख्या भाज्या किंवा फळे चांगल्याप्रकारे उकडून, मऊ लगदा करून बाळास भरवावा.
• केळे, आंबा, टरबूज, सीताफळ, चिक्कू या फळांचा गर
• चांगले शिजलेले मांस, मासे यातील हाडे काढून मऊ भाग बाळाला भरवू शकता.

एक वर्षानंतर बाळाचा आहार –

बाळाच्या आहारात धान्ये, डाळी, मोड आलेली कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, रसदार फळे, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे, चिकन, सुकामेवा यांचा आहारात समावेश असावा. याशिवाय पुरेसे पाणीही द्यावे. मुलांना रोज एकतरी फळ खाण्यास द्यावे. दिवसातून एक ते दोन तास मोकळे खेळू द्यावे.

बाळाला काय देऊ नये..?

• तळलेले पदार्थ, वेफर्स, चॉकलेट, बिस्किटे मुलांना देऊ नयेत. या पदार्थांमुळे शरीरातील चरबीचे प्रमाण वाढून लठ्ठपणा येत असतो.
• बाहेरचे उघड्यावरील दूषित पदार्थ देऊ नयेत.
• बाळाला एकाचवेळी भरपूर खाण्यास देऊ नये. थोडे थोडे खाण्यास द्यावे.
• सफरचंद, चिकू यांसारख्या फळांच्या साली काढून फळे खाण्यास देऊ नयेत. ही फळे शक्यतो सालीसकटच खायला द्यावीत.
• जेवल्या-जेवल्या लगेच बाळाला झोपू देऊ नये.
• लहान मुलांना चायनीज पदार्थ, कोल्ड्रिंक्स, चहा कॉफी देऊ नयेत.

Diet plan for Baby information in Marathi.


प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...