गरोदरपणातील तपासणी –
गरोदरपणात दवाखान्यात जाऊन नियमितपणे डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे खूप महत्वाचे असते. नियमित तपासणी केल्याने पोटातील बाळाची वाढ योग्य प्रकारे होत आहे की नाही ते कळते. याशिवाय गर्भिणीला काही आरोग्य समस्या आहेत का ते चेकअपमधून समजते व त्यानुसार काळजी घेता येते. याठिकाणी गर्भावस्थेत गर्भवती स्त्रियांनी कोणत्या तपासण्या करून घ्याव्यात याची माहिती येथे दिली आहे.
गरोदरपणात केंव्हा-केंव्हा दवाखान्यात जाऊन डॉक्टरांकडून तपासण्या करून घ्याव्यात..?
- तिसरा महिना सुरु होण्यापूर्वी दवाखान्यात जाऊन पहिली तपासणी करून घ्यावी.
- त्यानंतरच्या चौथ्या ते आठव्या महिन्यापर्यंत दर महिन्यातून एकदा तपासणीसाठी जावे.
- शेवटच्या महिन्यात दर पंधरा दिवसाला तपासणी करून घ्यावी.
सुरवातीच्या पहिल्या तपासणीत गर्भधारणा आहे की नाही ते तपासले जाते. याशिवाय शेवटची पाळी कधी आली होती, यापूर्वीच्या गरोदरपणात व बाळंतपणात काही त्रास झाला का, या आधीच्या बाळंतपणात गर्भपात, मृत किंवा व्यंग असलेल्या बाळाचा जन्म झाला होता का, गरोदरपणाच्या आधी स्त्रीला अॅनिमिया, उच्च-रक्तदाब, मधुमेह याससारखा आजार आहे का याविषयी माहिती घेतली जाते व त्यावरून पुढील नियोजन ठेवले जाते.
प्रेग्नन्सीमध्ये दवाखान्यात ह्या तपासण्या वेळोवेळी कराव्या लागतात :
प्रेग्नन्सीमध्ये दवाखान्यात वजन, उंची, रक्तदाब, रक्तगट, हिमोग्लोबिन, रक्तातील साखर तपासणी, लघवीची तपासणी करतात. तसेच दवाखान्यात पोटाची व योनीमार्गाची तपासणी केली जाते.
वजन –
प्रत्येक तापसणीवेळी गर्भवतीचे वजन तपासले जाते. गरोदरपणी पोटात वाढणाऱ्या गर्भाच्या वजनामुळे स्त्रीचे वजन वाढत असते. मात्र जर गर्भाची वाढ खुंटली, त्याला योग्यप्रकारे पोषण न मिळाल्यास स्त्रीच्या वजनातील व पोटाच्या आकारातील होणारी अपेक्षित वाढ थांबते. याउलट जर वजन जास्त वाढले तर गरोदरपणातील मधुमेह तसेच हाय ब्लडप्रेशरचा त्रास होण्याची शक्यता असते. यासाठी गरोदरपणात प्रत्येक तपासणीत वजन किती आहे ते पाहिले जाते.
रक्तदाब तपासणी –
गरोदरपणात रक्तदाब नियंत्रित असणे महत्वाचे असते. गरोदर स्त्री दवाखान्यात तपासणीसाठी जाते, तेव्हा तिचा रक्तदाब तपासला जातो. आणि जर रक्तदाब वाढलेला म्हणजे 130/90 च्या वर असल्यास त्यावर आपले डॉक्टर वेळीच उपचार करतात. गरोदरपणातील हाय ब्लडप्रेशरची माहिती जाणून घ्या..
पोटाची तपासणी –
पोटाच्या आकारावरून आणि आईच्या वजनावरून बाळ नीट वाढते की नाही हे समजते. पोटाची तपासणी करून गर्भाची वाढ किती झाली आहे, मूल आडवे आहे की उभे, गर्भाच्या हृदयाचे ठोके व्यवस्थित पडतात की नाही, ते पाहिले जाते. पोटाची तपासणी अत्यंत महत्वाची असते.
हिमोग्लोबिन –
रक्तातील हिमोग्लोबिनची तपासणी करून हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासले जाते. हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास अॅनिमियाची स्थिती होत असते. आई आणि जन्मणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी अॅनिमिया धोकादायक असतो. यासाठी गरोदरपणात लोह, ब-12 व फोलेट पोषकतत्त्वेयुक्त आहार घेण्यास सांगतात. याशिवाय लोहाच्या गोळ्याही दिल्या जातात. त्या नियमित घेणे आवश्यक असते.
रक्तगट व RH तपासणी –
प्रेग्नन्सीमध्ये स्त्रीचा रक्तगट व RH पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आहे ते तपासणे आवश्यक असते. साधारणत: 10 टक्के स्त्रियांचा रक्तगट हा RH निगेटिव्ह असतो. जर गर्भवती स्त्रीचा रक्तगट RH निगेटिव्ह व तिच्या पतीचा रक्तगट RH पॉझिटिव्ह असल्यास गर्भावर परिणाम होऊ शकतो. यासाठी वेळीच रक्तगटाची तपासणी केल्याने RH निगेटिव्ह गर्भवती स्त्री असल्यास योग्य ती काळजी घेतली जाते.
लघवीची तपासणी –
गरोदरपणाच्या पहिल्या काही आठवड्यात गरोदर असल्याचे निदान करण्यासाठी लघवीची तपासणी उपयुक्त ठरते. याशिवाय लघवीत प्रथिनांचे प्रमाण किती आहे, लघवीत साखरेचे प्रमाण आहे का याची तपासणी केली जाते. टॉक्सीमिया या घातक आजारात लघवीतून प्रथिने अधिक जातात. तसेच लघवीत जर साखरेचे प्रमाण आढळले, तर मधुमेहाचे निदान करण्यासाठी रक्त तपासणी करून ब्लड शुगर तपासली जाते. गरोदरपणात मधुमेह असल्यास जास्त काळजी घ्यावी लागते.
सोनोग्राफी –
प्रेग्नन्सी चेकअपमध्ये सोनोग्राफी तपासणी ही अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाची तपासणी आहे. यामुळे गरोदरपणाचे निदान निश्चित होते तसेच गर्भाची वाढ गर्भाशयातच होत आहे की नाही, जुळी बालके आहेत का, गर्भाची गर्भाशयातील ठेवण कशी आहे, गर्भात जन्मजात दोष आहेत का, गर्भजल कमी किंवा जास्त आहे का याविषयी ज्ञान सोनोग्राफी तपासणीतून होते.
गरोदरपण जोखमीचे आहे का, कोणती काळजी घ्यावी लागणार अशा अनेक बाबींचे ज्ञान या सर्व तपासणीत अगोदरच समजते. अशा वेळी धोका लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेतली जाते. त्यामुळे प्रेग्नन्सीत नियमितपणे दवाखान्यात तपासणी करणे आवश्यक असते.
गरोदरपणात कोणता आहार घ्यावा याविषयी जाणुन घ्या.
Read Marathi language article about Pregnancy Check up. Last Medically Reviewed on February 15, 2024 By Dr. Satish Upalkar.