गर्भावस्थेत लघवीला जळजळ होणे :
अनेक गरोदर महिलांना गरोदरपणात लघवीला जळजळ होत असते. प्रेग्नन्सीमध्ये लघवीला जळजळ होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. कारण हा त्रास प्रामुख्याने मूत्रमार्गात संसर्ग झाल्याने होत असतो. याला यूरीनरी ट्रैक्ट इनफेक्शन (UTI) असे म्हणतात. विशेषतः मूत्रमार्गाची स्वच्छता न राखल्यास त्याठिकाणी बॅक्टेरियाचे इन्फेक्शन झाल्याने लघवीला जळजळ होत असते.
मूत्रमार्गात इन्फेक्शन (UTI) झाले असल्यास त्याचा गर्भावर परिणाम होतो का..?
मूत्रमार्गातील इन्फेक्शनचा निश्चितच परिणाम गर्भावर होऊ शकतो. गरोदरपणात यामुळे प्री-एक्लेम्पसिया, गर्भजलाची पिशवी फुटणे, बाळाचा अकाली जन्म होणे, कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, गर्भपात होणे अशा गंभीर स्थिती यामुळे निर्माण होऊ शकतात. यासाठी यावर वेळीच एंटिबायोटिक उपचार होणे आवश्यक असते.
यूटीआय (किंवा सिस्टिटिस) ची लक्षणे पुढीलप्रमाणे असतात.
- लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणे,
- लघवीच्या ठिकाणी आग व खाज होणे,
- ओटीपोटात किंवा पाठीत दुखणे,
- लघवीमध्ये थोडे रक्त येणे,
- साधारणपणे अस्वस्थ वाटणे, ताप येणे अशी लक्षणे यात असतात.
जर ही लक्षणे आढळल्यास आपण त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा व योग्य उपचार करून घ्यावेत. यूटीआय असल्यास डॉक्टर आपल्याला गर्भधारणेत सुरक्षित अशी अँटीबायोटिक्स औषध देतील. ती औषधे वेळेवर व जितक्या दिवसांसाठी दिली आहेत तितके दिवस न चुकता घ्यावीत. वेदना व ताप असल्यास पॅरासिटामॉल देऊ शकतात.
गरोदरपणात लघवीला जळजळ होऊ नये यासाठी उपाय :
- दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण 8 ग्लास पाणी प्यावे.
- लघवीला झाल्यास लघवी थांबवून ठेऊ नये.
- शौचाच्यावेळी गुदभागातील बॅक्टेरिया मूत्रमार्गात पसरू नये यासाठी शौचानंतर समोरच्या बाजूने धुवावे.
- सुती व स्वच्छ अंडरवेअर वापरावे.
सार्वजनिक शौचालयाचा वापर करताना जास्त काळजी घ्यावी. - अशावेळी टॉयलेट सीटवर बसने टाळावे. भारतीय पद्धतीचे टॉयलेट असल्यास त्याचा वापर करावा.
हे सुद्धा वाचा..
गरोदरपणात घ्यावयाची काळजी
Read Marathi language article about Urinary Tract Infections (UTI) During Pregnancy. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.