गरोदरपणातील काळजी : प्रेग्नन्सीमध्ये घ्यावयाची काळजी जाणून घ्या.. (Pregnancy Care Tips in Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

गर्भावस्थेतील काळजी (Staying Healthy During Pregnancy) :

गरोदरपणात आईने स्वतःचे आणि बाळाचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी लागते. यासाठी गर्भावस्थेच्या एकूण नऊ महिन्यात आईने आहार, स्वच्छता, विहार, व्यायाम, प्रवास, औषधे आणि विश्रांती याविषयी गरोदरपणी घ्यायची काळजी यांची माहिती येथे दिली आहे.

गरोदरपणात अशी घ्यावी काळजी :

आहार आणि गर्भावस्था –
गरोदरपणात आहाराचे खूप महत्त्व असते. कारण आई जो आहार घेईल त्यातूनच पोटातील गर्भाचे पोषण होत असते. यासाठी प्रेग्नन्सीत पोषकघटकांनीयुक्त असा आहार घेणे आवश्यक असते. गर्भवतीला आहारात प्रोटिन, लोह, कॅल्शियम व ‘बी’ जीवनसत्त्व यांची विशेष गरज असते. सामान्य स्त्रीपेक्षा अधिक आहाराची तिला गरज असते. प्रेग्नन्सीमध्ये वेळच्यावेळी आहार घ्यावा. एकाचवेळी भरपेट जेवण्यापेक्षा दिवसभरात तीन ते चार वेळा थोडे-थोडे खावे. यामुळे पचन व्यवस्थित होण्यास मदत होते. मात्र उपाशी राहू नये. गर्भवती असताना अशी आहारासंबंधी काळजी घ्यावी.

गर्भवतीच्या आहारात दुध व दुग्धजन्य पदार्थ, विविध फळे, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, डाळी, धान्ये, सुखामेवा तसेच मांस, मासे, अंडी यांचा जरूर समावेश असावा. यामुळे प्रेग्नन्सीमध्ये आवश्यक असणारे प्रोटिन्स, फायबर्स, व्हिटॅमिन्स, लोह, फॉलिक ऍसिड व विविध खनिजे शरीरास मिळण्यास मदत होते. पाणी उकळून प्यावे. दिवसभरात वरचेवर पुरेसे पाणी प्यावे. कुठेही बाहेर जाताना उकळलेल्या पाण्याची बाटली सोबत असावी. गरोदरपणी आहार कसा असावा ते जाणून घ्या..

घरगुती कामे आणि गर्भावस्था –
प्रेग्नन्सीमध्ये सारखा आराम न करता घरातील सहज करता येण्याजोगी कामे करावीत. त्यामुळे शरीर मोकळं राहते. मात्र खूप जास्त श्रमाचं काम करू नये. जड वस्तू उचलू नये. थकवा आणणारी कामे करणे टाळावे. चालताना, उठताना तोल जाऊन पडणार नाही याची काळजी घ्यावी.

आराम, झोप आणि गर्भावस्था –
प्रेग्नन्सीत पुरेशी झोप व विश्रांती घेणे आवश्यक असते. कारण प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे थकवा अधिक जाणवत असतो. यासाठी रात्रीच्या वेळी पुरेशी म्हणजे किमान आठ तास झोप घ्यावी. विनाकारण जागरण करू नये. याशिवाय दुपारीही काहीवेळ थोडी झोप घ्यावी. गरोदरपणात शक्यतो डाव्या कुशीवर झोपावे. गुडघ्यात वाकून झोपण्याची स्थिती अयोग्य असते. गर्भवतीने पायाखाली उशी ठेवून झोपल्यास खूप चांगले. झोप येत नसेल तर डॉक्टरी सल्ला घ्यावा. मनाने झोपेच्या गोळ्या घेऊ नयेत.

वैयक्तिक स्वच्छता आणि प्रेग्नन्सी –
गर्भवतीने शारीरिक स्वच्छता चांगली ठेवावी. बाहेरून आल्यावर, जेवणापूर्वी व शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. प्रेग्नन्सीमध्ये रोजच्यारोज अंघोळ करावी. यामुळे आळस, थकवा दूर होऊन फ्रेश वाटते. अंघोळीसाठी जास्त गरम किंवा थंड पाणी वापरू नये. अंगाला सुसह्य वाटेल एवढेच कडक अथवा कोमट पाणी घ्यावे. उन्हाळ्यातही गार पाण्यानं अंघोळ करू नये. अंघोळ करताना स्तनांची आणि योनी भागाची स्वच्छता करावी. आंघोळीनंतर स्वच्छ आणि थोडी सैल व हलकी असणारे कपडे घालावीत.

व्यायाम, योगासने आणि गर्भारपण –
गर्भवतीने रोज हलका व्यायाम करणे आवश्यक असते. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मनाने परस्पर व्यायाम सुरू करू नका. व्यायाम करावा की नाही किंवा कोणता व्यायाम करावा याची माहिती आपल्या डॉक्टरांकडून जरूर जाणून घ्या आणि त्यानुसार व्यायाम करा. एका जागी अधिकवेळ बसून न राहता फिरत राहावे. प्रेग्नन्सीत चालण्याचा व्यायाम करू शकता किंवा मोकळ्या हवेत फिरायला जाऊ शकता. याशिवाय प्रेग्नन्सीमध्ये करता येणारी काही सोपी योगासनेही आहेत ती तज्ञांच्या सल्ल्याने करू शकता. दीर्घ श्वसन जरूर करावं, त्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते व बाळाला ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो. मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील याकडे लक्ष द्यावं. भांडणं, कलह, टेन्शन यांपासून दूर राहावे.

प्रवास आणि गर्भावस्था –
प्रेग्नन्सीमध्ये प्रवास करताना थोडी काळजी घेणे आवश्यक असते. प्रेग्नन्सीमध्ये शक्यतो दूरचा प्रवास करू नये. विशेषतः पहिल्या तीन महिन्यात जास्त काळजी घ्यावी. कारण या काळात गर्भ हा अस्थिर असतो त्यामुळे जास्त प्रवासामुळे गर्भपात होण्याचा धोका अधिक असतो. त्याचप्रमाणे शेवटच्या तीन महिन्यातही जास्त प्रवास करणे टाळावे. कारण या काळात मुदतपूर्व प्रसुती किंवा pre-mature डिलिव्हरीचा धोका असतो. त्यामुळे नववा महिना लागल्यानंतर प्रवास टाळावा. गरोदरपणात प्रवास कसा करावा याबद्दल जाणून घ्या..

नियमित तपासणी आणि गरोदरपण –
गरोदरपणात डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घ्यावी. यामुळे गर्भाची वाढ योग्य प्रकारे होत आहे की नाही ते समजते. यासाठी तिसरा महिना सुरु होण्यापूर्वी दवाखान्यात जाऊन पहिली तपासणी करून घ्यावी. त्यानंतरच्या चौथ्या ते आठव्या महिन्यापर्यंत दर महिन्यातून एकदा तपासणीसाठी जावे. आणि शेवटच्या महिन्यात दर पंधरा दिवसाला तपासणी करून घ्यावी. गरोदरपणात काही त्रास जाणवल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रेग्नन्सीमध्ये चेकअप कधी करावे ते सविस्तर जाणून घ्या..

औषधे आणि गर्भावस्था –
गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही परस्पर औषध घेऊ नये. आपल्या डॉक्टरांनी दिलेली औषधे, कॅल्शियम, लोह, फॉलिक ऍसिडच्या गोळ्या वेळेवर तसेच दिलेल्या प्रमाणात घ्यावीत. बाळाची वाढ जास्त होऊन प्रसूती त्रासदायक होईल, ही चुकीची समजूत बाळगून औषधांची टाळाटाळ करू नये.

तसेच गरोदर होण्यापूर्वी एखादा आजार किंवा आरोग्य समस्या असल्यास व त्यावरील औषध सुरू असल्यास त्याबाबतही सांगावे. कारण औषधांचा साईड-ईफेक्ट पोटातील गर्भावर होण्याची अधिक अधिक असते. गरोदरपणात अॅलर्जी असणारी व एक्सपायरी तारीख निघून गेलेली (एक्सपायर) औषधे चुकूनही घेऊ नयेत.

व्यसने आणि गर्भावस्था –
प्रेग्नन्सीमध्ये सिगारेट, धूम्रपान, तंबाखू, मद्यपान यासारख्या व्यसनांपासून दूर रहावे. तसेच इतर व्यक्ती सिगारेट स्मोकिंग करीत असताना त्या धुराच्या संपर्कात राहू नये. प्रेग्नन्सीमध्ये व्यसनांचा अत्यंत घातक परिणाम गर्भावर होत असतो. वेळेपूर्वी बाळाचा जन्म होणे किंवा बाळ दगावण्याची शक्यताही व्यसनांमुळे वाढते.

लैंगिक संबंध आणि गर्भावस्था –
गरोदरपणी शेवटच्या महिन्यात सेक्स करणे टाळले पाहिजे. तसेच ज्या स्त्रियांमध्ये गर्भपाताची शक्यता आहे, त्यांनीही यापासून दूर राहणे आवश्यक असते. गरोदरपणात लैंगिक संबंध ठेवावे की नाही याची सविस्तर माहिती जाणून घ्या..

‘प्रेग्नन्सी मराठी’ हे उपयुक्त अँप इंस्टॉल करून घ्या..

प्रेग्नन्सीची किंवा डिलिव्हरीची कोणतीही भीती किंवा काळजी मनात बाळगू नका. प्रेग्नन्सीसंबंधित आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरे, घ्यावयाची काळजी अशी सर्व माहिती आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून आपणास उपलब्ध आहेच. याशिवाय आमचे ‘प्रेग्नन्सी मराठी’ स्मार्टफोन अँपसुद्धा आपल्या मोबाईलवर इन्स्टॉल करून घ्या. त्यामुळे आपणास प्रेग्नन्सी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन याविषयीची उपयुक्त माहिती एकचठिकाणी मिळेल. ‘प्रेग्नशी मराठी’ हे मोफत अँप गुगल प्लेमधून आजचं इन्स्टॉल करण्यासाठी येथे क्लिक करा.

Pregnancy Care Tips and Instructions in Marathi.