टॉन्सिल्स सुजणे – Tonsillitis :
टॉन्सिल हे तोंडाच्या आत जीभच्या तळाशी असतात. घातक व्हायरस आणि जीवाणू यांना शरीरात प्रवेश करण्यापासून अटकाव करण्याचे महत्त्वाचे कार्य टॉन्सिल करत असतात. अनेकदा टॉन्सिल हे बॅक्टेरिया व व्हायरसमुळे संक्रमित होतात तेंव्हा टॉन्सिलला सूज येते. या स्थितीला टॉन्सिलिटिस (Tonsillitis) असे म्हणतात.
टॉन्सिल सुजल्यामुळे त्याठिकाणी वेदना होऊ लागते, अन्न गिळताना आणि श्वास घेताना त्रास होऊ लागतो. बहुतेकवेळा टॉन्सिलिटिसचा त्रास दहा दिवसांच्या आत आपोआप कमी होतो. टॉन्सिलाईटिस कोणत्याही वयात होऊ शकतो. मात्र लहान मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते.
टॉन्सिलला सूज येण्याची कारणे (Tonsillitis causes) :
• टॉन्सिलला स्ट्रेप्टोकॉकस बॅक्टेरिया आणि व्हायरस यांचे इन्फेक्शन झाल्याने,
• सर्दी, खोकला अधिक काळ राहिल्यामुळे,
• थंड हवामानामुळे, थंडगार पदार्थ, आईस्क्रीम, फ्रिजमधील गार पाणी पिण्यामुळे टॉन्सिलला सूज येत असते.
टॉन्सिलिटिसची लक्षणे (Tonsillitis symptoms) :
• टॉन्सिलला सूज येणे.
• घशाला सूज व घशात वेदना होणे,
• घशात पांढरे चट्टे येतात,
• घसा खवखवणे,
• आवाज बसणे,
• तोंड उघडताना त्रास होणे,
• ताप येणे,
• सर्दी, खोकला येऊ शकतो,
• अंगदुखी, डोकेदुखी, कानात दुखणे.
• अन्न गिळताना व बोलताना त्रास होणे ही लक्षणे टॉन्सिल्स सुजल्यास जाणवितात.
टॉन्सिलिटिस निदान :
रुग्णात असलेली लक्षणे आणि घशाची तपासणी करून आपले डॉक्टर टॉन्सिलिटिसचे निदान करतील. याशिवाय घशातील स्त्राव व CBC ब्लड टेस्ट करून व्हायरल इन्फेक्शन झाले आहे की बॅक्टेरियल ते तपासले जाते.
टॉन्सिलिटिसवर असे करतात उपचार (treatments) :
बॅक्टेरियामुळे टॉन्सिलला सूज आल्यास उपचार करण्यासाठी आपले डॉक्टर अँटीबायोटिक्स औषधे देऊ शकतात. डॉक्टरांनी दिलेल्या अँटीबायोटिक्सचा पूर्ण कोर्स करा अगदी लक्षणे कमी झाली तरीही दिलेल्या कालावधीपर्यंत औषधे घ्या. याशिवाय ताप, टॉन्सिल्समधील सूज व वेदना कमी करण्यासाठी इब्युप्रोफेन किंवा अॅसिटामिनोफेन यासारखी वेदनाशामक औषधे दिली जातील.
वारंवार जर टॉन्सिलिटिसचा त्रास होत असल्यास किंवा यामुळे टॉन्सिल्समुळे श्वास घेण्यास, अन्न गिळण्यास अधिक त्रास होत असल्यास सर्जरी करून टॉन्सिल्स काढून टाकले जाते. ह्या सर्जरीला tonsillectomy (टॉन्सिलेक्टॉमीज) असे म्हणतात.
टॉन्सिल्स सुजल्यास हे करा घरगुती उपाय :
• पुरेसे पातळ द्रवपदार्थ प्यावेत.
• पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी.
• मीठाच्या कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात.
• अन्न गिळताना त्रास होत असल्यास मऊ पदार्थ खावेत.
• थंडगार पाणी पिणे टाळा, आइस्क्रीम, दही व इतर थंड पदार्थ खाऊ नका.
• धूम्रपान करणे टाळा, हवेच्या प्रदूषणात जाणे टाळा.
टॉन्सिलिटिसची लागण एकाकडून दुसऱ्याला होऊ शकते का..?
टॉन्सिलिटिस हा बॅक्टेरिया किंवा व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होत असतो. सुरवातीच्या 24 ते 48 तासांपर्यंत टॉन्सिलिटिसची लागण रुग्णाच्या खोकला किंवा शिंका याद्वारे दुसऱ्याला होऊ शकते. शालेय वयातील मुलांना बर्याचदा हा आजार होत असतो. त्यामुळे टॉन्सिलिटिसची लक्षणे असल्यास मुलाला शाळेत पाठवून देऊ नये.
हे सुद्धा वाचा..
• गालफुगी किंवा गुलगुंड आजाराची माहिती
• अपेंडीक्सला सूज आल्याने होणारी पोटदुखी व उपचार
Read Marathi language article about Tonsillitis symptoms, causes and treatment. Last Medically Reviewed on February 19, 2024 By Dr. Satish Upalkar.