अपेंडिक्सला सूज येणे – Appendicitis :

अपेंडिक्स हा अवयव आपल्या पोटात उजव्या बाजूला मोठ्या आतड्याशी जोडलेले असतो. या अपेंडिक्सची रचना ही एकाद्या पिशवीसारखी असते. याचे एक टोक मोठ्या आतड्याशी जोडलेले असते तर दुसरे पलीकडचे टोक मात्र बंद असते. जेंव्हा अपेंडिक्स ह्या अवयवाला सुज येते त्या स्थितीला अ‍ॅपेंडिसाइटिस (Appendicitis) असे म्हणतात.

अशा या अपेंडिक्समध्ये आतडय़ांतील अन्न काही कारणामुळे शिरते. अपेंडिक्सचे दुसरे टोक बंद असल्याने एकदा आत शिरलेले अन्न पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे ते अन्न अपेंडिक्सच्या आतच पडून राहते व त्यात कुजण्याची प्रक्रिया सुरु होते. यामुळे पुढे जंतुसंसर्ग होऊन अपेंडिक्सला सूज येते व दुखणं सुरू होते. या त्रासाला अपेंडिसायटिस असे म्हणतात. अपेंडिक्सला सूज येऊन ते फुटूही शकते त्यामुळे इन्फेक्शन पूर्ण पोटात पसरून धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. हा त्रास प्रामुख्याने 10 ते 30 वर्ष वयामध्ये अधिक आढळतो.

अपेंडिसायटिसची लक्षणे – Appendicitis symptoms :

• पोटामध्ये बेंबीच्या खाली उजव्या बाजूला तीव्र वेदना होणे,
• पोटात कळ येणे,
• ‎मळमळ व उलटी होणे,
• ‎भुक मंदावणे,
• ‎ताप येतो, अशक्तपणा जाणवितो,
• ‎शौचाला आल्यासारखं वाटतं, पण होत नाही,
• ‎पोट साफ न होणे (बद्धकोष्ठता) किंवा शौचास पातळही होऊ शकते ही लक्षणे जाणवू शकतात,

अपेंडिक्स होण्याची कारणे – Appendicitis causes :

• अपेंडिक्समध्ये आतडय़ांतील अन्न किंवा मलाचे कण जाऊन अडकल्यामुळे इन्फेक्शन होऊन अपेंडिक्सला सूज येते व वेदना सुरु होतात.
• ‎पोट साफ न होण्याच्या तक्रारीमुळे (Constipation),
• पोटातील जंतांच्या तक्रारीमुळे,
• अपेंडिक्सला पीळ पडल्यामुळे,
• ‎अयोग्य आहार खाण्याच्या सवयीमुळे. जसे वारंवार फास्टफूड, बेकरी पदार्थ, तेलकट पदार्थ खाण्याच्या सवयीमुळे,
• ‎हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या कमी खाल्यामुळे, आहारातील तंतुमय पदार्थांची कमतरता असणे ही कारणे अपेंडिसायटिस होण्यासाठी सहाय्यक ठरतात.

अपेंडिसायटिसचे निदान :

लक्षणे व शारीरिक तपासणी करून डॉक्टर याचे निदान करू शकतात. याशिवाय CBC ब्लड टेस्ट, सोनोग्राफी, एक्स रे, CT स्कॅन किंवा MRI स्कॅन यांच्या साहाय्याने याचे निदान करतात. 

अपेंडीक्सच्या पोटदुखीवर उपचार – Appendicitis treatment :

कमी प्रमाणात आजार असल्यास डॉक्टर इन्फेक्शन (जंतुसंसर्ग) थांबविण्यासाठी अँटीबायोटिक औषध देऊन वेदना कमी होण्यासाठी औषधे देतील. अपेंडिक्सवर घरगुती उपाय म्हणून पुरेशी विश्रांती घ्यावी व द्रवपदार्थ असणारा पातळ आहार सेवन करावा.

अपेंडिक्सचे ऑपरेशन असे केले जाते –
अपेंडिक्स जास्त सुजल्यास किंवा वेदना जास्त प्रमाणात होत असल्यास किंवा अपेंडिक्स फुटून इन्फेक्शन होण्याची शक्यता असल्यास अपेंडिक्स तातडीने ऑपरेशन करून काढून टाकावे लागते.

शस्त्रक्रियेमध्ये पोटाला चीर देऊन, पोट उघडून ‎अपेंडिक्स काढून टाकले जाते त्या शस्त्रक्रियेस अपेंडेटोमी (appendectomy) असे म्हणतात. शस्त्रक्रियेनंतर केवळ 12 तासांनंतर रुग्ण उठून फिरू शकतो आणि दोन ते तीन आठवड्यांत रुग्ण पूर्णपणे बरा होतो.

आत्ता अपेंडिक्स काढून टाकण्यासाठी अत्याधुनिक लॅप्रोस्कोपी तंत्र वापरले जाते. लॅप्रोस्कोपीद्वारे पोटाला भोक पाडून दुर्बीण आत टाकून अपेंडिक्स काढून टाकले जाते. यामध्ये रुग्ण लवकर बरा होतो.

अपेंडिसायटिसचा त्रास होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी..?

अपेंडिसायटिस होणे आपण टाळू शकत नाही. मात्र खालील उपायांद्वारे अपेंडिसायटिस होण्याचा धोका काही प्रमाणात कमी करता येईल.
• हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे, हातसडीचा तांदूळ यांचा आहारात समावेश करा. यामध्ये तंतुमय पदार्थ (फायबर्स) भरपूर प्रमाणात असतात.
• ‎अयोग्य आहार खाण्याच्या सवयीपासून दूर राहा. मैद्याचे पदार्थ, बेकरी पदार्थ, फास्टफूड, तेलकट पदार्थ खाणे टाळा.

हे सुद्धा वाचा..
टॉन्सिल्स सुजणे
गालगुंड किंवा गालफुगी आजार

© लेखक - डॉ. सतीश उपळकर
(महत्वाची सूचना - ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये.)