टाचेला भेगा पडणे –
अनवाणी चालणे, आरामदायी चपला न वापरणे, अधिक काळ उभे राहण्याची सवय यासारख्या अनेक कारणांमुळे टाचेला भेगा पडत असतात. टाचेला भेगा पडण्याचा त्रास अनेकांना असतो. थंडीच्या दिवसात टाचेच्या भेगांचा त्रास अधिक होत असतो.
टाचेला भेगा पडणे यावर घरगुती उपाय –
टाचेला पडल्यास तेथे औषधी मलम किंवा मॉइस्चराइजर क्रीम लावावी. यामुळे भेगा लवकर भरण्यास मदत होते. याशिवाय टाचेच्या भेगांना मध लावणे सुध्दा फायदेशीर असते. तसेच खोबरेल तेल लावल्याने देखील भेगा लवकर भरून निघतात. त्याचप्रमाणे टाचेवरील भेगांना कडुनिंबाचा रस किंवा हळद लावल्याने त्या भेगा कमी होण्यास मदत होते. टाचेला भेगा पडल्यास हे घरगुती उपाय उपयोगी पडतात.
टाचेला भेगा पडल्यावर काय करावे..?
1) टाचेवरील भेगांना मध लावा.
त्वचा नैसर्गिकरीत्या मॉइश्चराइज करण्यासाठी मध खूप उपयोगी ठरते. तसेच टाचेच्या भेगा भरून काढण्यासाठी मधातील अँटी-मायक्रोबियल व अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म उपयुक्त ठरतात. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी टाचा स्वच्छ धुवून त्याठिकाणी मध लावावे. यामुळे टाचेच्या भेगा लवकर कमी होतात.
2) भेगांवर खोबरेल तेल लावा.
खोबरेल तेलसुद्धा त्वचा मॉइश्चराइज करण्यास मदत करत असते. त्यामुळे टाचेला भेगा पडल्यास त्यावरही खोबरेल तेल खूप उपयोगी ठरते. भेगा पडलेल्या टाचेच्या ठिकाणी खोबरेल तेल रोज रात्री झोपण्यापूर्वी लावावे. यामुळे भेगा पडलेली डेड स्किन निघून जाण्यास, त्वचा मऊ मुलायम होण्यास मदत होते.
3) टाचेवरील भेगांना कडुनिंबाचा रस लावा.
टाचेला भेगा पडल्यास कडुनिंबाची पाने बारीक वाटून त्याचा रस काढून भेगा पडलेल्या टाचेला लावल्यास भेगा लवकर कमी होतात.
4) टाचेच्या भेगांवर हळद लावा.
हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे जखमा भरून येण्यास मदत होते. यासाठी हळदीमध्ये कोमट तेल टाकून मिश्रण तयार करून ते टाचेच्या भेगांवर लावावे.
टाचेला भेगा पडणे यावरील क्रीम –
टाचेला भेगा पडल्यास त्याठिकाणी औषधी मलम किंवा मॉइस्चराइजर क्रीम लावणेही फायदेशीर असते. त्यामुळे भेगा पडलेली त्वचा मॉइश्चराइज होऊन डेड स्किन निघून जाते व त्वचा मऊसर होऊन भेगांचा त्रास कमी होतो. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवून त्याठिकाणी औषधी मलम किंवा मॉइस्चराइजर क्रीम लावावी. यासाठी Himalaya FootCare Cream, Aroma Magic Foot Cream, Heelmate, Vaseline Cracked Foot Repair Cream अशा अनेक चांगल्या क्रीम उपलब्ध आहेत.
टाचेला भेगा पडू नये यासाठी काय काळजी घ्यावी..?
- बाहेर अनवाणी पायी चालू नये.
- अधिक काळ उभे राहणे टाळावे.
- बाहेर फिरताना टाचेचा मातीशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी.
- पायांचे तळवे व टाचा यांना योग्य Support देणारे व आरामदायी असणारे चपला वापराव्यात.
- पायांना जास्त टाईट होणारे बूट वापरू नयेत.
- दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण 8 ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीर हायड्रेट राहून त्वचा कोरडी (ड्राय स्किन) पडत नाही.
टाचेला भेगा पडणे हा त्रास डायबेटीसच्या रुग्णांना असल्यास त्यांनी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. अशावेळी त्यांनी आपल्या डॉक्टरांकडून यावर उपचार घ्यावेत तसेच पायाची नियमित तपासणीही करून घ्यावी.
कारण डायबेटीस असल्यास आणि टाचेला भेगा पडणे याकडे दुर्लक्ष केल्यास त्याठिकाणी जखमा वाढून डायबेटिक न्युरोपॅथी, डायबेटिक फूट अल्सर आणि इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.
Read Marathi language article about Cracked heels causes and home remedies. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on March 9, 2024.