नको असलेली गर्भधारणा – Unwanted Pregnancy :
गर्भवती होऊ नये यासाठी कंडोम, कॉपर टी, व्हजायनल रिंग, हार्मोन्सच्या गर्भनिरोधक गोळ्या असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या साधनांचा वापर करून नको असलेली गर्भधारणा रोखता येते.
गर्भधारणा होऊ नये यासाठी उपाय –
काहीवेळा योग्य ती खबरदारी न घेतल्याने म्हणजे, सेक्सच्यावेळी कंडोमचा वापर न करणे किंवा कंडोम फाटणे, गर्भनिरोधक गोळ्या खाण्यास विसरणे यामुळे नको असलेली गर्भधारणा (Unwanted Pregnancy) होण्याची शक्यता असते. अशावेळी होणारी गर्भधारणा टाळण्यासाठी इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्यांचा लवकरात लवकर वापर करू शकता.
यासाठी इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सची गोळी सेक्सनंतर शक्य तितक्या लवकर म्हणजे 72 तासांच्या आत घेणे आवश्यक असते. यामुळे नको असलेली गर्भधारणा रोखण्यास मदत होते.
सेक्सनंतर केवळ 72 तासांच्या आत ही गोळी घेतल्यासचं यांचा उपयोग होतो. मात्र जर आधीच गर्भधारणा झालेली असल्यास आणि पोटात गर्भ वाढत असल्यास या गोळ्यांचा काहीही उपयोग होत नाही.
गर्भधारणा रोखण्यासाठी आणखी काही उपाय –
गर्भधारणा होऊ नये यासाठी पुरुष किंवा स्त्रिया कंडोमचा वापर करू शकतात. याशिवाय स्त्रियांच्या गर्भाशयात कॉपर-टी (तांबी) बसवता येते, तसेच स्त्रिया यासाठी नियमित घेण्याच्या हार्मोनल गर्भनिरोधक गोळ्या घेऊ शकतात. या गोळ्या 28 दिवस घेणे आवश्यक असते.
कायमस्वरूपी गर्भधारणा होऊ नये यासाठी पुरुषांत नसबंदी शस्त्रक्रिया किंवा स्त्रियांत टाक्याचे, बिनटक्याचे ऑपरेशन केले जाते. गर्भधारणा रोखण्यासाठी असे सर्व सुरक्षित पर्याय उपलब्ध आहेत.
Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.