केस लवकर वाढवणे – Grow Hair Faster :

आपले केस काळे, दाट आणि चमकदार असावेत असे प्रत्येकालाचं वाटत असते. काही जणांचे केस लवकर लवकर वाढत असतात तर काहींचे सावकाशपणे वाढत असतात. तसेच केस गळून पातळ होण्याच्या तक्रारीही अनेकांना भेडसावत असतात. त्यामुळे केस लवकर वाढावेत अशी अनेकांची इच्छा असते. यासाठी याठिकाणी केस लवकर वाढवण्याचे उपाय दिले आहेत.

केस लवकर वाढवण्यासाठी हे करावे :

योग्य आहार घ्यावा..
केस लवकर वाढवण्यासाठी पोषक आहार घेणे आवश्यक आहे. केसांच्या आरोग्यासाठी आहारात प्रोटिन्स, व्हिटॅमिन-E, झिंक यासारखे पोषकघटक असणारे पदार्थ घेणे आवश्यक असते. यासाठी आहारात दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे, सुखामेवा (बदाम, अक्रोड इ.), मोड आलेली कडधान्ये यांचा समावेश करावा. याशिवाय आहारात पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे यांचाही समावेश असावा.

हेअर प्रॉडक्ट्सचा अतिवापर टाळावा..
केमिकलयुक्त हेअर प्रॉडक्ट, स्ट्रेटनर्स, शॅम्पू, कलर्स यांचा अतिवापरामुळे केस डॅमेज होत असतात. दररोज केसांना शॅम्पू केल्यामुळे केसांच्या मुळातील (स्कैल्पमधील) नॅचरल ऑइल निघून जात असते. वास्तविकता केसांच्या मुळात असणारे ऑइल हे केसांच्या आरोग्यासाठी खूप उपयोगी असते. त्यामुळे दररोज केसांना शॅम्पू करू नये. आठवड्यातून 3 ते 4 वेळाच शॅम्पूचा वापर करावा. तसेच शॅम्पू केल्यानंतर केस तुटू नयेत यासाठी कंडिशनर जरूर करावे.

तेल मालिश करावी..
केसांच्या मुळांशी तेल मालिश केल्याने त्याठिकाणी रक्त संचरण (blood circulation) व्यवस्थित होण्यास खूप मदत होते. तेलामुळे केसांना आवश्यक पोषकघटक मिळतात आणि केसांचं खोलवर पोषण होऊन केसांचे आरोग्य सुधारते. तेल मालिशमुळे केसांची रोमछिद्र (folicles) मोकळी होतात त्यामुळे केस लवकर वाढण्यास मदत होते. केसांची तेल मालिश करण्यासाठी खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल किंवा बदाम तेलाचा वापर करावा. यासाठी वरील कोणतेही तेल कोमट करून ते केसांच्या मुळांशी लावून मालीश करावी.

केस लवकर वाढवण्याचे हे आहेत घरगुती उपाय :

अंड्याचा हेअरमास्क –
केसांची वाढ लवकर होण्यासाठी अंड्याच्या हेअर मास्कचा वापर आठवड्यातून एकदा करावा. यासाठी दोन अंडे फोडून त्यातील पिवळा भाग काढून टाकावा. अंड्यातील पांढऱ्या भागाचा थर केसांना लावावा. 15 मिनिटांनी केस धुवून घ्यावेत यामुळे केस लवकर वाढतात तसेच ते मजबूत व घनदाट ही होतात. कारण अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये प्रोटीन, जस्त, सल्फर, लोह, फॉस्फरस आणि आयोडीन यासारखी केसांसाठी उपयुक्त असणारी पोषकतत्वे असतात.

कांद्याचा रस –
केसांची वाढ लवकर होण्यासाठी कांद्याचा रसही खूप उपयुक्त ठरतो. कांद्याचा रस केसांना लावल्याने त्याठिकाणचे रक्तसंचरण (blood circulation) सुधारण्यास मदत होते. पर्यायाने केसांचे पोषण होऊन केसांची वाढ लवकर होते. यासाठी कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावून 15 मिनिटांनी केस धुवून घ्यावेत.

खोबरेल तेल, लसूण व कांदा –
वाटीभर खोबरेल तेलात तीन चमचे एरंडेल तेल मिसळून त्यात 4-5 लसूण पाकळ्या व थोडा कांदा बारीक करून घालावा. हे मिश्रण मंद आचेवर पाच मिनिटे गरम करून घ्यावे. तेलाचे हे मिश्रण थोडे कोमट झाल्यावर केसांच्या मुळाशी लावावे. या तेलाच्या नियमित वापराने केस गळणे कमी होते, केस घनदाट होतात तसेच गळलेले केस नवीन येऊन त्यांची जलदपणे वाढ होण्यास मदत होते.

कोरपडीचा गर –
केस गळतीवर कोरपडीचा (Aloe vera) खूप चांगला फायदा होतो. त्याचप्रमाणे केस लवकर वाढण्यासाठीही, कोरपडीचा गर उपयुक्त ठरतो. कोरपडीचा गर आठवड्यातून 2-3 वेळा केसांना लावावा.

केस गळत असल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

© लेखक - डॉ. सतीश उपळकर
(महत्वाची सूचना - ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये.)