Dr Satish Upalkar’s article about Stye in Marathi.
रांजणवाडी म्हणजे काय..?
रांजणवाडी हा डोळ्यांचा एक जिवाणूजन्य आजार असून स्टेफिलोकोकस बॅक्टेरिया यासाठी जबाबदार असतात. रांजणवाडीला english मध्ये Hordeolum किंवा Stye असे म्हणतात. रांजणवाडीमध्ये डोळ्यांच्या पापणीच्या ठिकाणी बारीक पुळी येते. त्या पुळीमुळे पापणीच्या ठिकाणी सूज येणे, खाज सुटणे किंवा वेदना होणे असे त्रास सुरू होतात. रांजणवाडी येण्याची कारणे, लक्षणे व उपाय यांची माहिती या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी दिली आहे.
रांजणवाडी येण्याची कारणे –
डोळ्यांची स्वच्छता न ठेवणे हे रांजणवाडी होण्याचे प्रमुख कारण असते. त्यामुळे पापणीला स्टेफिलोकोकस बॅक्टेरियाचे इन्फेक्शन झाल्याने रांजणवाडी होते. याशिवाय यासाठी खालील कारणे सुध्दा जबाबदार असतात.
- सतत डोळे चोळल्यामुळे,
- चष्म्याचा बदलता नंबर,
- नियमितपणे चष्मा न वापरल्यामुळे,
- प्रदूषण, धूळ किंवा मेकअप यासारख्या कारणामुळेही डोळ्याला रांजणवाडी होऊ शकते.
डोळ्याला रांजणवाडी का येते ..?
वरील कारणांमुळे डोळ्यांच्या पापणीला असलेल्या केसाच्या खालचे छिद्र बंद होऊन तेथे जंतूसंसर्ग (इन्फेक्शन) झाल्याने पापणीच्या ठिकाणी रांजणवाडी येते. अशावेळी तेथे दुखणारी पुळी तयार होते. अशाप्रकारे डोळ्याला रांजणवाडी होते.
रांजणवाडीची लक्षणे –
रांजणवाडीमध्ये डोळ्यांच्या पापणीला बारीक पुळी येते. त्या पुळीमुळे पापणीच्या ठिकाणी दुखणे, तेथे सूज येणे, पू होणे अशी लक्षणे असतात.
रांजणवाडी आणि उपचार –
रांजणवाडीमध्ये पापणीला आलेला फोड आपोआप काही दिवसात निघून जातो. काहीवेळा यासाठी उपचारांची आवश्यकता भासू शकते. यासाठी पुळीवर लावण्यासाठी तुमचे डॉक्टर अँटीबायोटिक क्रीम देऊ शकतात.
रांजणवाडी आल्यास काय करावे उपाय ..?
- एरंडेल तेलात भिजलेला कापसाचा बोळा रांजणवाडीच्या ठिकाणी फिरवावा.
- लवंग पाण्यात उगाळून त्याचा लेप रांजणवाडीच्या ठिकाणी दिवसातून 2 वेळा लावावा.
- गरम पाण्यात भिजवलेली पेरूची पाने 10 मिनिटे डोळ्यांवर ठेवावी.
- कोरपडीचा गर रांजणवाडीच्या ठिकाणी लावावा.
- लसूण पाकळीचा तुकडा करून तो रांजणवाडीवर लावावा. लसणीचा उपाय जपून करावा. कारण यामुळे पूळीच्या ठिकाणी जळजळ होऊ शकते.
डोळ्याला रांजणवाडी येऊ नये यासाठी घ्यायची काळजी –
- डोळ्यांची स्वच्छ्ता ठेवावी.
- कोमट पाण्याने दररोज डोळे स्वच्छ धुवावेत.
- कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल तर ते वेळोवेळी निर्जंतुक करावेत आणि ते नियमितपणे बदलावे.
- झोपण्यापूर्वी चेहऱ्याचा व डोळ्यांचा सर्व मेकअप पाण्याने धुवून चेहरा व डोळे स्वच्छ करावेत.
- रांजणवाडी हा संसर्गजन्य आजार असल्याने रांजणवाडी आलेल्या व्यक्तीचे टॉवेल, रुमाल, मेकअप साहित्य, साबण वैगेरे वापरणे टाळावे.
अशी काळजी घेतल्यास डोळ्याला रांजणवाडी होत नाही.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा – डोळे येणे याची कारणे व उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
In this article information about Ranjanwadi or Stye Meaning, Causes, Symptoms, Treatments and Prevention tips in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.