रक्ताच्या उलट्या होणे :
अनेक कारणांमुळे रक्ताच्या उलट्या होऊ शकतात. रक्ताच्या उलट्या होणे ही दुर्लक्ष करण्यासारखी समस्या नाही. याकडे दुर्लक्ष करणे प्राणघातकही ठरू शकते. त्यामुळे जर रक्ताच्या उलट्या होत असतील तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. या त्रासावर त्वरित उपचार होणे आवश्यक असते.
रक्ताच्या उलट्या कशामुळे होतात..?
1) पचनसंस्थेतील बिघाडामुळे..
पोटातील अल्सर, ऍसिडिटी, गॅस्ट्रो, जठराला सूज येणे, स्वादुपिंडाला सूज येणे, अन्नातून विषबाधा होणे यासारख्या पचनसंस्थेतील बिघाडामुळे रक्ताच्या उलट्या होऊ शकतात.
2) यकृताच्या आजारांमुळे..
हिपॅटायटीस, यकृत निकामी होणे, यकृताचा कँसर किंवा लिव्हर सिरोसिस अशा यकृताच्या आजारांमुळेही रक्ताच्या उलट्या होऊ शकतात.
3) औषधांच्या दुष्परिणामामुळे..
एस्पिरिन किंवा इतर वेदनाशामक औषधांच्या दुष्परिणामामुळे रक्ताच्या उलट्या होऊ शकतात.
4) हृदयविकारामुळे..
उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक अशा हृदयविकारामध्येही रक्ताच्या उलट्या होऊ शकतात.
5) मद्यपानामुळे..
अधिक प्रमाणात मद्यपान (अल्कोहोल) पिण्यामुळे रक्ताच्या उलट्या होऊ शकतात.
6) ट्युमर्स आणि कॅन्सरमुळे..
अन्ननलिका कर्करोग, पोटाचा कर्करोग, स्वादुपिंड कर्करोग, यकृताचा कँसर यामुळेही रक्ताच्या उलट्या होऊ शकतात.
त्यामुळे रक्ताच्या उलट्या होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने त्याचे निदान आणि योग्य वैद्यकीय उपचार आवश्यक असतात.
रक्ताच्या उलट्या होणे याचे निदान व तपासणी :
रक्ताच्या उलट्या कशामुळे होत आहेत याचे निदान करण्यासाठी विविध निदान तपासण्या करण्यात येईल. यासाठी ब्लड टेस्ट, एंडोस्कोपी तपासणी, अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन, एमआरआय किंवा एक्स-रे यांचा वापर करावा लागू शकतो.
डॉक्टरांकडे केंव्हा जावे..?
• रक्ताच्या उलट्या अधिक प्रमाणात रक्त होणे,
• चक्कर व अशक्तपणा येणे,
• डोळ्यांनी अंधुक दिसणे,
• हृदयाचे ठोके जलद होणे,
• बेशुद्ध पडणे,
• पोटात दुखणे,
• संडासमधून रक्त पडणे,
अशी लक्षणे असल्यास तात्काळ रुग्णाला दवाखान्यात दाखल करावे. दवाखाना जवळ नसल्यास 108 ह्या क्रमांकावर डायल करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी व रुग्णाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करावे.
Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.